बारावीच्या परीक्षेला झाली सुरूवात

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2018 04:27 PM2018-02-21T16:27:39+5:302018-02-21T16:32:35+5:30

राज्य माध्यमिक व उच्च शिक्षण माध्यमिक मंडळाकडून घेतल्या जाणाऱ्या 12 वी परीक्षेसाठी 14 लाख 85 हजार विद्यार्थी प्रविष्ठ झाले आहे . आजपासून (दि. 21) बारावीच्या लेखी परीक्षेला सुरुवात झाली आहे.

राज्यात 2 हजार 822 केंद्रांवर ही परीक्षा पार पडणार आहे. राज्य मंडळाकडे 9 हजार 486 कनिष्ठ महाविद्यालयांनी नोंदणी केली आहे अशी माहिती राज्य मंडळाच्या अध्यक्ष शंकूतला काळे यांनी दिली.

विद्यार्थ्यांनी वेळेवर परीक्षेला यावे अशी आठवण मंडळाकडून विद्यार्थ्यांना देण्यात आली आहे. वेळेत न येणा-या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू दिलं जाणार नाही, याची प्रत्येक विद्यार्थ्याने खबरदारी घ्यावी असं मंडळाने स्पष्ट केलं आहे.

सोलापूरच्या तांबेवाडी येथील वसंत महाविद्यालयाच्या परिसरातील काही जणांच्या मोबाईलमध्ये ही प्रश्नपत्रिका आढळून आली. पण पेपर फुटला असला तरी ही प्रश्नपत्रिका परीक्षा हॉलमधून बाहेर कशी आली, याचा खुलासा झालेला नाही. सेक्शन ए, बी आणि सी या प्रश्नपत्रिका लीक झाल्या आहेत.

बारावीचा इंग्रजीचा पेपर परीक्षा सुरु असतानाच तो बार्शीच्या वसंत महाविद्यालय तांबेवाडी येथून व्हॉट्स अ‍ॅपवर व्हायरल झाल्याची तक्रार प्राप्त झाली आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षणाधिकारी, गटशिक्षण अधिकारी यांना त्या ठिकाणी चौकशीसाठी तातडीने पाठविण्यात आले आहे. त्याबाबतचा अहवाल लगेच देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती पुणे विभागीय मंडळाचे सचिव बबन दहिफळे यांनी दिली.