माझे कुटुंब-माझी जबाबदारी, मुख्यमंत्र्यांनी केली तपासणी

By महेश गलांडे | Published: October 6, 2020 03:18 PM2020-10-06T15:18:23+5:302020-10-06T15:27:31+5:30

माझे कुटुंब, माझी जबाबदारी या मोहिमेने चांगलाच वेग घेतला असून आज सकाळी वांद्रे पूर्व येथे मातोश्री निवासस्थानी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एच पूर्व प्रभागातील पथकाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्री आदित्य ठाकरे यांची तसेच परिवारातील इतर सदस्यांची आरोग्यविषयक तपासणी केली.

यामध्ये त्यांनी सर्वांची ऑक्सिजन पातळी, तापमान तपासले व आरोग्याची माहिती भरून घेतली यावेळी मुख्यमंत्र्यांनी पथकाशी चर्चा करून या मोहिमेची अंमलबजावणी कशा रीतीने केली जाते त्याविषयी विचारले व सूचनाही केल्या.

राज्यात सध्या कोविड बाधित रुग्णांच्या निकट संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्यासाठी ट्रेस, ट्रॅक , ट्रीट या त्रिसूत्रीचा वापर करुन कोविडचा प्रार्दूभाव आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. राज्याच्या शहरी आणि ग्रामीण भागांमध्ये कोविड-१९ ची रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत.

त्यामुळे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून “माझे कुटुंब माझी जबाबदारी” ही मोहीम संपूर्ण राज्यात दिनांक १५ सप्टेंबर २०२० पासून राबविण्यास सुरुवात झाली आहे.

माझे कटुंब-माझी जबाबदारी” या मोहिमेअंतर्गत राज्यातील शहर, गाव, पाडे-वस्त्या, तांडे यातील प्रत्येक नागरिकांची आरोग्य तपासणी, कोमॉर्बीड आजार असल्यास उपचार आणि प्रत्येक नागरिकास व्यक्तीश: भेटून आरोग्य शिक्षण दिले जाणार आहे.

ही मोहिम १५ सप्टेंबर, २०२० ते २५ ऑक्टोंबर, २०२० या कालावधीमध्ये घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे.

या मोहिम कालावधीमध्ये गृहभेटी देण्यासाठी आरोग्य पथके तयार केली आहेत. एका पथकामध्ये १ आरोग्य कर्मचारी आणि २ स्थानिक लोकप्रतिनिधींनी दिलेले स्वयंसेवक असतील. एक पथक दररोज ५० घरांना भेटी देईल.

भेटी दरम्यान घरातील सर्व सदस्यांचे तापमान Sp०२ तपासणे तसेच कोमॉर्बीड कंडिशन (Comorbid Condition) आहे का याची माहिती घेण्यात येत आहे.

ताप, खोकला, दम लागणे, Sp०२ कमी अशी कोविडसदृष्य लक्षणे असणाऱ्या व्यक्तींना जवळच्या फिव्हर क्लिनिक (Fever Clinic) मध्ये संदर्भीत करण्यात येत आहेत. फिव्हर क्लिनिक (Fever Clinic) मध्ये कोविड-१९ प्रयोगशाळा चाचणी करुन पुढील उपचार केले जातील.

कोमॉर्बीड Condition असणारे रुग्ण नियमित उपचार घेतात का याची खात्री केली जाईल आणि आवश्यक तेथे औषधे व तपासणीसाठी संदर्भीत केले जात आहे.