Navneet Kaur Rana: दाक्षिणात्य अभिनेत्री ते खासदार; पाहा, थेट शिवसेनेशी पंगा घेणाऱ्या नवनीत राणांची कारकीर्द

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2022 07:24 PM2022-04-22T19:24:33+5:302022-04-22T19:31:11+5:30

Navneet Kaur Rana: मॉडेलिंग आणि अभिनय क्षेत्रात लोकप्रियता मिळवल्यानंतर नवनीत राणा शिवसेनेच्याच आनंदराव अडसूळ यांचा पराभव करून खासदार झाल्या.

काही झाले तरी मातोश्री बाहेर हनुमान चालीसा पठण करणारच अशी ठाम भूमिका घेतलेल्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे आमदार पती रवी राणा पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. अपक्ष म्हणून निवडून आलेल्या नवनीत राणा अनेक मुद्द्यांमुळे कायम चर्चेत असतात. (Navneet Kaur Rana)

राज्यातील राजकीय परिस्थितीवर टीका करताना खासदार नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. इतकेच नाही तर शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी आपल्याला धमकी दिल्याचा आरोपही खासदार राणा यांनी केला. एक अभिनेत्री म्हणून आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या नवनीत राणा यांचा खासदारकीपर्यंतचा प्रवास जाणून घेऊया...

नवनीत राणांचा जन्म मुंबईतील आहे. बारावीनंतर त्यांनी शिक्षण सोडले आणि मॉडलिंगला सुरूवात केली. त्यानंतर त्यांना चित्रपटाची ऑफर मिळाली. नवनीत राणा यांनी आतापर्यंच कन्नड, मल्याळम आणि पंजाबी चित्रपटात काम केले आहे.

कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना २०१४ साली नवनीत राणा यांनी आपल्या राजकीय करिअरला सुरूवात केली. सर्वसामान्य माणसांशी आपुलकीने बोलणे आणि घरी आलेल्या प्रत्येक व्यक्तीला मदत करणे या कारणांमुळे खासदार राणा या मध्यमवर्गीयांचे नेहमीच जवळच्या खासदार बनल्या.

नवनीत राणा यांनी 'चेतना' (२००५), 'जगपति' (२००५), 'गुड बॉय' (२००५), आणि 'भूमा' (२००८) या तेलुगू चित्रपटांमध्ये काम केले. या चित्रपटांनी नवनीत राणा यांना लोकप्रियता मिळवून दिली. नवनीत राणा मराठी, पंजाबी, हिंदी, तेलुगू आणि इंग्रजी भाषा येतात.

नवनीत राणा या बाबा रामदेव यांच्या शिष्या आहेत. बाबा रामदेव यांच्याकडे नेहेमी जात असताना त्यांची भेट बाबा रामदेव यांचे शिष्य असणाऱ्या बडनेराचे आमदार रवी राणा यांच्याशी झाली. बाबा रामदेव यांच्या आशीर्वादाने नवनीत कौर आणि आमदार रवी राणा यांनी लग्न करण्याचे ठरविले.

सन २०११ मध्ये आमदार रवी राणा यांच्याशी लग्नगाठ बांधली. नवनीत राणा यांचा विवाह सोहळा खास होता. अमरावतीत २,१०० जोडप्यांसह सामूहिक विवाहात दांपत्य जीवनाला सुरुवात केली. या विवाहसोहळ्याला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि बाबा रामदेव उपस्थित होते.

नवनीत राणा यांना २०१४ मध्ये प्रथम राष्ट्रवादी काँग्रेसने तिकिटावर लोकसभेसाठी निवडणुकीच्या मैदानात उतरवले. त्या निवडणुकीत नवनीत यांचा पराभव झाला मात्र त्यांनी जनसंपर्क कायम ठेवला. राजकारणात प्रवेश केल्यानंतर चित्रपटसृष्टीला त्यांनी अलविदा केला.

सन २०१९ मध्ये नवनीत राणा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे समर्थन मिळवून खासदार झाल्या. लोकसभेत जाताच त्यांनी पुन्हा केंद्रातील सत्ताधारी भाजपला पाठिंबा दिला. नवनीत राणा यांनी शिवसेना नेते आनंदराव अडसुळ यांचा पराभव केला.

नवनीत राणा गेल्या वर्षी मार्च महिन्यात चर्चेत आले. जेव्हा त्या संसदेत मास्क घालून आल्या. कोरोना काळात मास्कविषयी त्यांनी जनजागृती केली. तसेच संसदेत खासदारांचा स्क्रिनिंगला जोर दिला.

मोदी सरकारच्या अनेक योजनांचे कौतुक नवनीत राणा यांनी केले आहे. राज ठाकरे यांचा हनुमान चालीसा पठणाचा मुद्दा पुढे नेत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थासमोर हनुमान चालीसा पठणाचा निर्धार केला.

नवनीत राणा यांचे पती रवी राणा हेही आमदार असून, महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारविरोधात त्यांनी अनेकदा भूमिका घेतलेली आहे.