Devendra Fadanvis: दंगल, भ्रष्टाचार, भोंगळ राज्यकारभार, देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे सरकारवर चौफेर प्रहार, भाषणातील प्रमुख १० मुद्दे

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2021 06:23 PM2021-11-16T18:23:57+5:302021-11-16T18:30:28+5:30

Devendra Fadanvis News: आज झालेल्या BJPच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये विरोधी पक्षनेते Devendra Fadanvis यांनी राज्यातील सत्ताधारी Mahavikas Aghadi सरकारवर जोरदार टीका केली. दंगल, भ्रष्टाचार, भोंगळ राज्यकारभार या मुद्य्यांवरून फडणवीसांनी ठाकरे सरकारवर चौफेर प्रहार केले. फडणवीस यांच्या आजच्या भाषणातील १० प्रमुख मुद्दे पुढीलप्रमाणे.

आज झालेल्या भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. दंगल, भ्रष्टाचार, भोंगळ राज्यकारभार या मुद्य्यांवरून फडणवीसांनी ठाकरे सरकारवर चौफेर प्रहार केले. फडणवीस यांच्या आजच्या भाषणातील १० प्रमुख मुद्दे पुढीलप्रमाणे.

आज महाराष्ट्रावर विश्वासार्हतेचे मोठे संकट आले आले. आज राज्याच सरकार कुठे आहे, हे विचारण्याची वेळ आली आहे. राज्याला एक मुख्यमंत्री आहेत. पण त्यांना कुणी मानायला तयार नाही. प्रत्येक मंत्री स्वतःला मुख्यमंत्री समजतो आणि जनतेचे मात्र हाल होत आहेत.

सध्या राज्यात असलेल्या सरकारचे राज्य म्हणजे कायद्याचे राज्य नाही तर ‘काय दे‘ चे राज्य आहे. राज्यात सत्ताधाऱ्यांची नुसती वाटमारी चालली आहे आणि शेतकऱ्यांकडे मात्र कुणी पाहायला तयार नाही

राज्यात नेत्यांचे दहशतवाद्यांशी व्यावसायिक संबंध आहेत. अवैध रेती, अवैध दारू आणि सट्टा गावोगावी. महाराष्ट्राची अशी अवस्था कधीच झाली नव्हती

राज्यातील काही शहरांमध्ये ज्या काही दंगली घडल्या त्या एक षडयंत्र होत्या. त्याला कव्हर फायरिंग म्हणून नवाब मलिक यांनी मैदानात उतरून भाजपावर आरोप केले. अमरावतीत जे घडले ती कोणती घटना नाही तर एक प्रयोग आहे. सावध व्हा. अमरावतीत SRP च्या 7 तुकड्या होत्या. पण त्यांना कोणते आदेश दिले गेले नाही. आझाद मैदानात जे झाले तो सेम पॅटर्न अमरावतील राबवला गेला. पोलिसांवर हल्ले करणाऱ्यांना अटक नाही. आमचे पोलिस काय मार खाण्यासाठी आहेत आहे का, असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला.

एकेकाळी विचारांचा नक्षलवाद होता. मात्र आता विचारांचा नक्षलवाद राहिला नाही. आता तो दहशतवाद्यांशी निगडित आहे, असे विधान देवेंद्र फडणवीस यांनी केले.

आमचे एकेकाळचे हिंदुत्त्ववादी मित्र आता अजान स्पर्धा घेतात. बाळासाहेबांचा उल्लेख जनाब असा करतात. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जवळ आली आहे. त्यात शिवसेनेला अमराठी वा मराठी कुठलीही मते मिळणार नाही. आता केवळ अल्पसंख्याक मतांवर त्यांचा डोळा आहे.

एका मुलीवर ४०० लोक बलात्कार करतात, महाराष्ट्रात हे काय चालले आहे. सरकार म्हणते आम्ही शक्ती कायदा करू. पण शक्ती, युक्ती काही नाही तर सरकारमध्ये केवळ ‘भक्ती‘ उपक्रम चालू आहे

केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलवर कर कमी केले. त्यानंतर देशातील २५ विविध राज्यांनी तेथील व्हॅट कमी करत त्यात भर घातली. मात्र महाराष्ट्र सरकारने तोही कमी केला नाही. हे सरकार काहीच करायला तयार नाही.

छोटी-छोटी राज्य रडत नाही तर लढतात. महाराष्ट्रात मात्र रोज सकाळी मा. नरेंद्र मोदींचे नाव घेऊन रडतात. बिल्डरांना सवलती देताना यांना GST आठवत नाही, गरिबांना, शेतकऱ्यांना पैसे द्यायचे म्हटले की, जे पैसे टप्प्याटप्प्याने मिळत आहेत आणि मिळत राहतील त्या GSTचे रडगाणे गातात, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.

महाविकास आघाडीचे सरकार हे महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात भ्रष्ट सरकार आहे. या महाविकास आघाडी सरकारने सर्वांसोबत विश्वासघात केला आहे. सामान्य माणसाची ताकद आता दाखविण्याची वेळ आली आहे. जनतेसाठी, त्यांच्या कल्याणासाठी लढायला मैदानात उतरण्याची वेळ आली आहे, असे आवाहनही देवेंद्र फडणवीस यांनी केले.