Maharashtra Corona Cases: अलर्ट! राज्यात कोरोना रुग्णांमध्ये २० टक्क्यांनी वाढ; गणेशोत्सवानंतर रुग्णवाढीची भीती

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2021 12:58 PM2021-09-15T12:58:28+5:302021-09-15T13:05:00+5:30

Maharashtra Corona Cases: राज्यात मंगळवारी कोरोना रुग्णांच्या आकडेवारीत तब्बल २० टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली असून ही आकडेवारी चिंता वाढवणारी आहे.

महाराष्ट्रात मंगळवारी दैनंदिन कोरोना रुग्णवाढीत तब्बल २० टक्क्यांची वाढ झाली आहे. कोरोना चाचण्यांचही प्रमाण वाढत असलं तरी वाढती आकडेवारी राज्यासाठी चिंतादायक ठरू शकते.

राज्यात मंगळवारी ३,५३० नवे रुग्ण आढळले आहेत. तर सोमवारी हाच आकडा २,७४० इतका होता. मुंबईतील आकडा देखील ३४५ वरुन ३६७ इतका नोंदविण्यात आला. याशिवाय मृत्यूंचा आकडा देखील एका दिवसात २७ वरुन ५२ इतका झाला आहे.

राज्यातील गणेशोत्सवामुळे गेल्या पाच दिवसांत कोरोना चाचणींच्या प्रमाणात घट झाली होती. त्यामुळे राज्याच्या आरोग्य विभागानं सर्व जिल्ह्यांना कोरोना चाचण्या वाढविण्याच्या सूचना दिल्या होत्या.

राज्यात सरासरी २.५ लाख कोरोना चाचण्या होत होत्या. पण गेल्या काही दिवसांमध्ये या जवळपास निम्म्यावर आल्या होत्या. १२ सप्टेंबर रोजी १.१ लाख चाचण्या झाल्या होत्या. तर १३ सप्टेंबर रोजी १.४ लाख चाचण्या झाल्या आहेत.

मुंबईतही गेल्या काही दिवसांमध्ये कोरोना चाचण्याचं प्रमाण कमी झालं आहे. दरम्यान इतर जिल्ह्यांपेक्षा आजही मुंबईत जास्त चाचण्या होत असल्याचं पालिकेच्या एका अधिकाऱ्यानं म्हटलं आहे. मंगळवारी मुंबईतील पॉझिटिव्हिटी दर १.२ टक्के इतका आढळून आला आहे.

गेल्या २४ तासांत मुंबईतील सक्रिय रुग्णांचं प्रमाण ५०३३ वरुन थेट ५३९३ वर पोहोचलं आहे. प्रवासावरील निर्बंध काही प्रमाणात शिथील केलेले असल्यानं आकडेवारीतील ही वाढ असू शकते असं मत डॉ. राहुल पंडित यांनी व्यक्त केलं आहे. राहुल पंडित हे राज्याच्या टास्क फोर्समधील सदस्य आहेत.

टेस्टिंग, ट्रेसिंग आणि ट्रिटमेंट याच त्रिसूत्रीवर राज्याचं आरोग्य विभाग भर देत असून येत्या काळात चाचण्यांमध्ये वाढ करण्याचं उद्दीष्ट असल्याचंही प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. दरम्यान, गणेशोत्सवानंतर कोरोना रुग्णांमध्ये वाढ होण्याची भीती देखील व्यक्त करण्यात येत आहे.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रवासी संख्येत वाढ झाली आहे. तसंच शहरांमध्ये अनेक ठिकाणी कोरोना प्रतिबंधक नियमांचं उल्लंघन झाल्याचंही पाहायला मिळालं आहे. याचे परिणाम गणेशोत्सवानंतर दिसू शकतात अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.

सणांचा सीझन संपेपर्यंत आपल्याला वाट पाहावी लागेल. त्यानंतरच्या आकडेवारीच सारंकाही अवलंबून आहे. रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचं त्यावेळी दिसून आलं तर चिंता वाढवणारं ठरू शकतं, असंही डॉ. पंडित म्हणाले.