CoronaVirus Live Updates : कोरोनाचं रौद्ररुप! महाराष्ट्रात दर 3 मिनिटाला एकाचा मृत्यू, तासाभरात 2000 जणांना लागण, धोका वाढला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2021 02:28 PM2021-04-19T14:28:58+5:302021-04-19T14:43:43+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates : राज्यात कठोर निर्बंधानंतरही कोरोनाच्या संसर्गाची तीव्रता तसूभरही कमी झालेली नाही.

देशात कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ झाली असून आता चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. देशातील रुग्णसंख्येने आतापर्यंतचा उच्चांक गाठला आहे.

गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल 2,73,810 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 1,619 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे आता भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या 1,50,61,919 वर पोहोचली आहे.

कोरोनामुळे देशात 1,78,769 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रातही कोरोनाचा धोका वाढला असून रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या ही सर्वाधिक आहे.

महाराष्ट्रात झपाट्याने वाढणाऱ्या रुग्ण संख्येने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. मास्क, सोशल डिस्टंसिंग, क्वारंटाईनच्या माध्यामातून काळजी घेतली जात आहे. मात्र तरीदेखील रुग्णसंख्येत मोठी वाढ होत आहे.

कोरोनाच्या संकटाचा सामना करत असतानाच महाराष्ट्राची चिंता वाढवणारी आणि धडकी भरवणारी माहिती समोर आली आहे. राज्यात दर तीन मिनिटाला एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू होत असल्याचं एका अहवालातून समोर आलं आहे.

राज्यात कठोर निर्बंधानंतरही कोरोनाच्या संसर्गाची तीव्रता तसूभरही कमी झालेली नाही. या उलट राज्यातील रोज दैनंदिन रुग्ण आणि मृत्यूंच्या संख्येचा उच्चांक गाठत असल्याने कोरोनाचे संकट राक्षसाचे रुप धारण करत आहे.

कोरोनावर मात करण्यासाठी राज्य सरकारने कलम 144 लागू केलं आहे. त्याचबरोबर राज्य सरकारने काही निर्बंध अधिक कठोर केले आहेत. मात्र तरीही कोरोनाग्रस्तांची संख्या वेगाने वाढतच आहे.

राज्यात रविवारी 68 हजार 631 रुग्ण आणि 503 मृत्यूंची नोंद झाली आहे, परिणामी कोरोना बाधितांची एकूण संख्या 38 लाख 39 हजार 338 असून मृतांचा एकूण आकडा 50 हजार 473 झाला आहे.

कोरोनामुळे महाराष्ट्रात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. दर 3 मिनिटाला एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू होत असल्याची आणि एका तासात दोन हजारांहून अधिक जणांना कोरोनाची लागण होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

कोरोनाची दुसरी लाट आली असून दुसऱ्या लाटेत ग्रोथ रेटही वाढत आहे. मुंबईत कोरोनाचा ग्रोथ रेट वाढून 1.53 टक्के इतका झाला आहे. ग्रोथ रेट वाढत असला तरी रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी व मृत्यू दरात काही प्रमाणात दिलासा मिळत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

सध्या राज्यात 6 लाख 70 हजार 388 रुग्ण उपचाराधीन असल्याची माहिती सार्वजनिक आऱोग्य विभागाने दिली आहे. राज्यात मागील 24 तासांत 45 हजार 654 रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत 31 लाख 6 हजार 828 बाधितांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे.

राज्यासह मुंबईत कठोर नियम लावल्यानंतरही दैनंदिन रुग्णसंख्या व मृत्यूंच्या संख्येत फरक पडलेला नाही. कोरोनाच्या संसर्गाची तीव्रता गडद होत असून, प्रशासनासमोर नियंत्रणाचे आव्हान कठीण होत चालले आहे. मुंबईत रविवारी 8 हजार 479 रुग्ण आढळले आहेत.

कोरोनाग्रस्तांचा आकडा 5 लाख 79 हजार 311 पोहोचला आहे तर रविवारी 53 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांचा आकडा 12 हजार 347 वर पोहोचला आहे. रुग्ण बरे होणाऱ्यांची संख्या 4 लाख 78 हजार 39 वर पोहोचली आहे.

आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. सोमवारी (19 एप्रिल) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत 2,73,810 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दीड कोटींवर पोहोचली आहे,

कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा एक लाख 78 हजारांवर पोहोचला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 19,29,329 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 1,29,53,821 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

Read in English