एकनाथ शिंदेंची चतुर खेळी! उद्धव ठाकरेंना डिवचलं; शिवसेनेला सूचक संदेश, आमदारही झाले खुश

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2022 09:17 AM2022-08-10T09:17:58+5:302022-08-10T09:22:47+5:30

Maharashtra Political Crisis: नव्या सरकारच्या मंत्रिमंडळात संजय राठोडांचा समावेश केल्याने विरोधकांनी टीकेची झोड उठवली असली, तरी एकनाथ शिंदेंनी स्मार्ट खेळी करत एका दगडात दोन पक्षी मारल्याची चर्चा आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शपथ घेऊन ३८ दिवस झाल्यानंतर अखेर मंत्रिमंडळ विस्तार झाला. यात भाजपच्या ९ आणि शिंदे गटातील ९ आमदारांनी शपथ घेतली. मात्र, पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी मागील मंत्रिमंडळातून राजीनामा द्याव्या लागलेल्या संजय राठोड यांना नव्या सरकारने पुन्हा एकदा मंत्री केले आहे. यावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांसह अनेकांनी या निर्णयावरून नव्या शिंदे-भाजप सरकारवर टीकेची झोड उठवली.

राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारावरून एकनाथ शिंदे यांनी एक चतुर खेळी करून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना डिवचल्याचे बोलले जात आहे. यातून एकाच दगडात दोन पक्षी मारण्याची चाल यशस्वी ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्याचे सांगितले जात आहे. एकीकडे या स्मार्ट खेळीने शिवसेनेला सूचक संदेश दिला गेला आणि दुसरीकडे शिंदे गटातील आमदारांची मने जिंकत आपले वर्चस्व पुन्हा दाखवून दिल्याचे म्हटले जात आहे.

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री म्हणून महाविकास आघाडीची सूत्रे हातात घेताना कधी नव्हे ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी केली होती. त्यामुळे दुखावलेला भाजप याचा वचपा काढणार असल्याचे उद्धव ठाकरे यांना चांगलेच ठाऊक होते. त्यामुळे सरकार चालवताना गैरव्यवहार अथवा भ्रष्टाचाराचे शिंतोडे उडू नयेत यासाठी त्यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांवर करडी नजर ठेवली होती, असे राजकीय विश्लेषक सांगतात.

मात्र, वनमंत्री संजय राठोड यांच्यावर एका तरुणीच्या आत्महत्येच्या प्रकरणात आरोप होताच उद्धव ठाकरे अस्वस्थ झाले. राठोड यांच्या राजीनाम्यासाठी विरोधकांच्या दबावाबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही आग्रह धरल्याने उद्धव ठाकरेंची चांगलीच अडचण झाली. अशातच एकनाथ शिंदे हे संजय राठोड यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. तसेच राजीनामा घेऊ नये यासाठी उद्धव ठाकरे यांच्याकडे टोकाचा आग्रह धरला.

संजय राठोड यांच्या पाठिशी मोठ्या प्रमाणात बंजारा समाज तर आहेच; पण विरोधकांपुढे झुकण्याऐवजी आपण आपल्या मंत्र्याच्या मागे ठामपणे उभे राहायला हवे, असे शिंदे आग्रहाने सांगत होते, असे राजकीय तज्ज्ञ मंडळी सांगतात. मात्र, शिवसेनेतीलच काही नेत्यांनी मात्र शिंदे यांचा हा आग्रह मोडत उद्धव ठाकरे यांच्यावर दबाव आणला.

संजय राठोड यांना वाचविण्यात शिंदे यांना यश आल्यास त्यांच्यामागे उभ्या राहणाऱ्या आमदारांची संख्या आणखी वाढेल, असे या नेत्यांना वाटत होते. त्यामुळे राठोड यांचा केवळ राजीनामा घेऊन ठेवला जाईल, राज्यपालांना तो सुपूर्द केला जाणार नाही, अशी शिंदे यांची समजूत काढण्यात आली.

त्यानंतर संजय राठोड यांचा राजीनामा राज्यपालांना देण्यात आला. त्यावर, पक्षप्रमुखांनी मला फसवले आहे. माझ्याकडे शिवसेनेची सूत्रे नसल्यानेच राठोड यांचा बळी गेला. सूत्रे माझ्याकडे असती तर मी हे कधीच होऊ दिले नसते, असे शिंदे यांनी काही मोजक्या आमदारांना सांगितले होते. त्यावर यातील बहुसंख्य आमदारांनी आम्ही तुमच्यासोबत आहोत, असे सांगत त्यांना पाठिंबा दिला होता.

या घडामोडींनंतर एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांना हाताशी धरून अभूतपूर्व ऐतिहासिक बंड केले. उद्धव ठाकरेंसाठी प्रचंड मोठा धक्का होता. राजकीय सत्ता संघर्ष पराकोटीला गेल्यानंतर भाजपने शिंदे गटाला पाठिंबा देत सरकार स्थापन केले. आता मंत्रिमंडळाच्या विस्तारात राठोड यांना संधी देत शिंदे यांनी आमदार वा मंत्र्यांना कसे सांभाळायचे असते हे उद्धव ठाकरे यांना दाखवून दिलेच, पण त्याचबरोबर दिलेला शब्द खरा करून दाखवत इतर आमदारांचीही मने जिंकण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे.

राज्य मंत्रिमंडळात संजय राठोड यांची वर्णी लावत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, आपल्यासोबत काम करणाऱ्या मंत्र्याकडून काही चुका झाल्या तरी त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहायचे असते, असा थेट संदेशच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिल्याचे बोलले जात आहे.

दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळात गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे पाटील, रवींद्र चव्हाण यांचा समावेश करीत दिल्लीतील आपले वजन तसूभरही कमी झाले नसल्याचा संदेश राज्यातील भाजपच्या मंडळींना दिल्याची चर्चा रंगली आहे.