एकनाथ शिंदेंचा आणखी एक मास्टरप्लॅन; उद्धव ठाकरेही मैदानात, आमदार फुटले, आता...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2022 08:35 PM2022-06-24T20:35:25+5:302022-06-24T20:40:45+5:30

शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला. विधिमंडळातील दोन तृतीयांशहून जास्त आमदार शिंदे यांच्या गटात सहभागी झाले आहेत. मात्र शिंदेंच्या बंडखोरीमुळे महाविकास आघाडी सरकारवर टांगती तलवार आहे.

त्यात आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक, आमची खरी शिवसेना असं सांगत शिंदे यांनी थेट पक्षालाच आव्हान दिले आहे. त्यामुळे शिवसेना नक्की कुणाची? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. आता राज्यभरात शिंदे विरुद्ध ठाकरे असं चित्र निर्माण झाले आहे.

अनेक ठिकाणी उद्धव ठाकरेंच्या समर्थनार्थ बॅनर्स लावले आहेत तर काही ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेला पाठिंबा देणारे बॅनर्स झळकले आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वालाच एकनाथ शिंदे यांनी हादरा दिला आहे.

आमदारांच्या बंडखोरीनंतर आता शिंदे पुढे काय करणार? असं विचारलं जात आहे. त्यात विधिमंडळ पक्षातच नव्हे तर मूळ पक्षातही फूट पडल्याचं दाखवण्याचं बंडखोर शिंदे गटाचा प्लॅन असल्याची माहिती पुढे येत आहे.

राज्यातील महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद सदस्य शिंदे यांच्या गटात सहभागी होण्याची शक्यता आहे. राज्यातील तब्बल ४०० हून अधिक नगरसेवकांची यादी शिंदे गटाने तयार केलीय. त्यात ठाणे, मुंबई, कल्याण डोंबिवली, भिवंडी, वसई विरार, पनवेल, उल्हासनगर, पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक यांचा समावेश आहे.

नगरसेवकांसोबतच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्य फोडण्याचेही प्रयत्न पुढच्या टप्प्यात होऊ शकतात. काँग्रेस-राष्ट्रवादीची साथ सोडा असा आग्रह बंडखोर आमदारांनी धरला आहे. सत्तेसाठी बाळासाहेबांच्या हिंदुत्वाशी प्रतारणा करू शकत नाही असं शिंदे यांनी म्हटलं आहे.

दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या मनसुबे उधळण्यासाठी शिवसेनेनेही डॅमेज कंट्रोल सुरू केले आहे. मुंबईतील विभागप्रमुखांची बैठक घेतल्यानंतर आता जिल्हाप्रमुख, संपर्कप्रमुखांची बैठक उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे.

आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेत नाराजीची लाट पसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याचा परिणाम महापालिकेवर होऊ नये यासाठी शिवसेना नेत्यांच्या बैठका सुरू झाल्याची माहिती आहे.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्यासह फुटलेल्या गटाला कुठल्यातरी रजिस्टर पक्षात विलीन व्हावं लागेल. मूळ पक्षाचं शिवसेना हे नाव वापरता येणार नाही. भाजपा किंवा बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेत विलीन व्हावं लागेल. शिवसेना नाव त्यांना मिळणार नाही. चिन्हही मिळणार नाही असं नेत्या नीलम गोऱ्हे म्हणाल्या आहेत

निवडणूक आयोगाच्या नियमानुसार, शिवसेनेची घटना आहे. त्यावर कार्यकारणीचे सदस्य असतात. विधिमंडळ पक्ष आणि मूळ पक्ष वेगळा आहे. धनुष्यबाण चिन्ह मिळवण्यासाठी निवडणुकीत ४-६ टक्के मते मिळवावी लागतात. चिन्ह सहज बदलत नाही. बहुमत आमच्याकडे आहे. कार्यकारणीत एकमत आहे. उद्धव ठाकरे अध्यक्ष आहेत असं नीलम गोऱ्हेंनी सांगितले.