नेमकं किती तास झोपायचं ? झोपेचं योग्य प्रमाण काय ?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2018 09:41 PM2018-02-14T21:41:46+5:302018-02-14T21:47:16+5:30

झोपेचं आपल्या आरोग्यात अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे, हे एव्हाना आपल्या साºयांनाच माहीत आहे. झोप तर प्रत्येकाला आवश्यक, पण किती तास झोपायचं? झोपेचं योग्य प्रमाण काय, हे मात्र फारसं कुणालाच माहीत नसतं.

यामुळेच यासंदर्भात शास्त्रज्ञांनी नुकतंच एक संशोधन केलं आणि शोधून काढलं नेमकं किती तास झोपायचं ते! कमी आणि जास्त झोपेमुळे आपल्या आरोग्यावर नेमका काय परिणाम होतो ते! काय आहे हे संशोधन?

मुळात आपली झोप का उडते हे पाहणंदेखील आवश्यक आहे. अनेक कारणं. कोणाची टेन्शनमुळे झोप उडते, कुणाची अति कामामुळे झोप उडते तर कुणाची प्रेमात पडल्यामुळे. याउलट परिस्थिती म्हणजे अनेकांना झोपेची इतकी आवड असते की तासन्तास ते झोपू शकतात. त्यांची ही कुंभकर्णी झोप त्यांना कितीही महत्तवाचं काम असलं तरी त्याच्या आड येत नाही.

शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे, तुम्ही कमी झोपत असाल तरीही ते तुमच्या आरोग्यासाठी वाईट आणि जास्त झोपत असाल तरीही ते वाईटच. त्यासाठी त्यांचा सल्ला आहे, प्रत्येकानं रोज सात ते नऊ तास एवढी झोप घेतली पाहिजे. त्यापेक्षा फार कमीही नको आणि जास्तही नको. महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जास्त किंवा कमी झोपत असलात, तरी त्यामुळे तुमच्या शरीरावर होणारे दुष्परिणाम जवळपास सारखेच आहेत. पण जे कमी झोपतात, त्यांच्यावर होणा-या दुष्परिणामांची तीव्रता मात्र जास्त आहे. ‘द सेंटर फॉर डिसिज कंट्रोल अ‍ॅण्ड प्रिव्हेन्शन’ (सीडीसी) या संस्थेनं या संदर्भात व्यापक अभ्यास केला.

काय आहेत कमी आणि जास्त झोपेचे दुष्परिणाम? झोपेच्या अनियमिततेमुळे आणि कमी-जास्त झोपेमुळे सर्वात महत्त्वाचा त्रास होतो तो हृदयाला. त्यामुळे हृदयविकार बळावतो. हार्ट अ‍ॅटॅक येण्याची शक्यता वाढते, डायबेटिस तुमच्या शरीरात घर करू शकतो, याशिवाय लठ्ठपणा, वजनवाढ आणि मानसिक त्रासानंही तुम्ही त्रस्त होऊ शकता. त्यामुळे शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे, आपली झोप ‘योग्य’ तेवढीच ठेवा आणि आपलं आरोग्यही सुदृढ राखा.