'त्या' एका घटनेमुळं बदललं आयुष्य अन् बनली आयपीएस अधिकारी!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2020 03:23 PM2020-07-01T15:23:26+5:302020-07-01T21:40:41+5:30

एखादी घटना अशी असते की, त्यामुळे आयुष्यच बदलते. अशीच घटना आयपीएस शालिनी अग्निहोत्री यांच्या बाबतीत घडली आणि त्यानंतर त्यांनी यूपीएससी परीक्षा देण्याचा निर्धार केला.

एकेदिवशी शालिनी अग्निहोत्री आपल्या आईसोबत बसमध्ये प्रवास करीत होत्या. त्यावेळी बसमधील एका सीटवर त्या आणि आई बसल्या होत्या. त्यांच्या मागील सीटवर एक व्यक्ती सीट पकडून उभा होता. तेव्हा त्यांच्या आईने त्या व्यक्तीला हात बाजूला घेण्यास सांगितले.

मात्र, त्या व्यक्तीने त्यांचे ऐकले नाही."तुम्ही कलेक्टर आहात का, जे मी तुमच्या आदेशाचे पालन करायला?", असे त्या व्यक्तीचे उलट उत्तर आले. त्यानंतर या व्यक्तीच्या या एका वाक्याने लहान असलेल्या शालिनी अग्निहोत्री यांना अनेक प्रश्न पडले.

त्यावेळी शालिनी अग्निहोत्री यांना कलेक्टर म्हणजे कोण असतं, ते माहीत नव्हते. पण, त्यांना हे नक्की समजले की, कलेक्टर एक मोठी पोस्ट आहे. त्यानंतर त्यांनी याबद्दल माहिती घेतली आणि पोलीस अधिकारी होण्याचा निर्णय घेतला.

मूळच्या हिमाचल प्रदेशच्या उना जिल्ह्यातील थाथल गावात राहणाऱ्या शालिनी अग्निहोत्री यांचे आयुष्य त्या बसमधील एका घटनेनंतर बदलले. त्यांनी यूपीएससीची तयारी सुरू केली.

शालिनी अग्निहोत्री यांचे वडील रमेश एक बस कंडक्टर आणि आई गृहिणी आहेत. अतिशय सामान्य कुटुंबातील असलेल्या शालिनी अग्निहोत्री यांनी यूपीएससीच्या तयारीसाठी खूप मेहनत घेतली आणि त्यांनी यश मिळविले.

मीडिया रिपोर्टनुसार, शालिनी अग्निहोत्री यांनी यूपीएससीसाठी कोणतेही कोचिंग घेतले नाही किंवा कुठल्याही मोठ्या शहरात गेल्या नाहीत. त्यांनी आपल्या कठोर मेहनतीच्या जोरावर यूपीएससीमध्ये 285 वा क्रमांक मिळविला आणि भारतीय पोलीस सेवा करण्याचा निर्णय घेतला.

धर्मशाला येथील डीएव्ही स्कूलमध्ये शिक्षण घेतल्यानंतर हिमाचल प्रदेशातील अॅग्रीकल्चर युनिव्हर्सिटीत शालिनी अग्निहोत्री यांनी आपले ग्रॅज्युएशन पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी यूपीएससीची तयारी सुरु केली.

दीड वर्षांच्या अभ्यासानंतर 2011 मध्ये शालिनी अग्निहोत्री यांनीयूपीएससीची परीक्षा दिली. त्यानंतर डिसेंबर 2012 मध्ये हैदराबाद येथील ट्रेनिंग सेंटरमध्ये दाखल झाल्या. सध्या कुल्लू जिल्ह्यात एसपी पदावर कार्यरत आहेत.

विशेष म्हणजे, शालिनी अग्निहोत्री यांची मोठी बहीण रजनी, या डॉक्टर आहेत. तर भाऊ आशिष हे भारतीय लष्करात आहेत.