शहरातील मधमाश्यांपेक्षा गावातील मधमाश्या जास्त कष्टाळू, करतात शहरी मधमाश्यांपेक्षा जास्त मेहनत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2021 08:36 PM2021-10-08T20:36:53+5:302021-10-08T21:09:08+5:30

असं म्हणतात गावातली माणसं जास्त मेहनती असतात. शेतात काबाडकष्ट करुन आपल्या मुलाबाळांची पोटं भरतात. शहरी लोकांना सुविधाही जास्त असतात. पण हे फक्त माणसांच्याच बाबतीत खरं नाही तर मधमाश्यांच्याही बाबतीत खरं आहे. बघा संशोधक काय सांगतात...

तुम्ही अनेकदा असं काही व्यक्तींबद्दल ऐकलं असेल की त्या व्यक्ती प्रचंड मेहनती आहेत. पण तीच गोष्ट कीटकांनाही लागू होते का? मधमाश्यांविषयीच्या ताज्या संशोधनात याबाबत एक विशेष माहिती समोर आली आहे.

लंडनमधील व्हर्जिनिया आणि रॉयल हॉलोवे विद्यापीठाच्या संशोधकांनी मधमाश्यांच्या २० पोळ्यांचे विश्लेषण केलं. त्यांनी या पोळ्यांमध्ये मधमाशांचं २ हजार ८०० वेळा विश्लेषण केलं.

मधमाश्या फक्त एकमेकांशी एक विशेष प्रकारचे वॅगल नृत्य सादर करून संवाद साधतात आणि वॅगल नृत्याद्वारे ते अन्नाचा ठावठिकाणा लावतात.

संशोधकांनी मधमाश्यांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवलं. संशोधनादरम्यान, संशोधकांना आढळलं की शहरांमध्ये राहणाऱ्या मधमाश्या अन्नाच्या शोधात सरासरी ४९२ मीटर अंतर प्रवास करतात.

तर खेड्यांमध्ये राहणाऱ्या मधमाश्या अन्नासाठी ७४३ मीटर पर्यंत प्रवास करतात. म्हणजेच ग्रामीण मधमाश्या शहरी मधमाश्यांपेक्षा ५० टक्के अधिक अंतर व्यापतात.

संशोधकांना असं आढळून आलं की शहरी आणि ग्रामीण दोन्ही भागात राहणाऱ्या मधमाशांनी गोळा केलेल्या मधाच्या प्रमाणात काही विशेष फरक नाही.

शहरात अनेक ठिकाणी मोठमोठे पार्क तसेच लहान बागा आहेत, शहरी मधमाश्यांना तिथून मध गोळा करण्यासाठी मदत मिळते.

संशोधक एली लीडबीटर म्हणतात की शहरी उद्याने मधमाशांसाठी हॉटस्पॉट आहेत. येथे विविध फुलांच्या अनेक जाती लावल्या आहेत.

दुसरीकडे, मधमाश्यांना शहरांपेक्षा ग्रामीण भागात त्यांचे अन्न शोधण्यासाठी अधिक मेहनत करावी लागते. यासाठी त्यांना लांबचा प्रवासही करावा लागतो.

खेड्यात दिसणाऱ्या मधमाश्या शहरी मधमाश्यांपेक्षा जास्त मेहनती असतात आणि अन्नाच्या शोधात ५० टक्के अधिक अंतर प्रवास करतात.