कम्युनिस्ट मेनिफेस्टोची ऑर्डर केली अन् घरी पोहोचली भगवद्गीता

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2020 04:24 PM2020-06-15T16:24:54+5:302020-06-15T18:41:16+5:30

ऑनलाइन ई-कॉमर्स वेबसाइट्सवरून शॉपिंग केल्यानंतर अनेकदा अशा घटना घडल्या आहेत की, ग्राहकांनी ऑर्डर दिलेल्या वस्तूंऐवजी दुसऱ्याच वस्तू त्यांच्या घरी पोहोचल्या आहेत. अशाच प्रकार कोलकाता येथे राहणारे सुथिरथो दास यांच्या बाबतीत घडला आहे.

सुथिरथो दास यांनी ऑनलाइन वेबसाइट अमेझॉनवरून शॉपिंग करताना Communist Manifesto पुस्तकाची ऑर्डर दिली. मात्र, ज्यावेळी या ऑर्डरची होम डिलीव्हरी आली. त्यावेळी त्यांनी डिलीव्हरीचे पॅकेट उघडून पाहिले असता त्यांना भगवद्गीता पाठविण्यात आल्याचे दिसून आले.

सुथिरथो दास यांनी सोशल मीडिया फेसबुकवर याबाबतची माहिती शेअर केली आहे. त्यांनी लिहिले की, बुधवारी Communist Manifesto पुस्तकाची ऑर्डर दिली. या ऑर्डरची पुष्टीही त्यांना मिळाली होती.

ज्यावेळी शनिवारी ते आपल्या ऑफिसमध्ये होते, तेव्हा त्यांना एका महिलेचा फोन आला आणि पार्सल घेऊ नका असे सांगितले. कारण, त्यात चुकीचे पुस्तक आहे. मात्र, सुथिरथो दास घरी नसल्याने हे करू शकले नाहीत.

जेव्हा सुथिरथो दास ऑफिसहून घरी परत आले, तेव्हा त्यांनी ते पॅकेट पाहिले. पॅकेटवर Communist Manifesto पुस्तकाचा उल्लेख होता, परंतु त्यामध्ये भगवद्गीतेचे पुस्तक होते.

गेल्या काही दिवसांपूर्वी अशाच प्रकार जोश सॉफ्टवेयरचे सह-संस्थापक आणि संचालक गौतम रेगे यांच्या बाबतीत घडला आहे.

गौतम रेगे यांनी अमेझॉनवरून 300 रुपयांच्या स्कीन लोशनची मागणी केली, परंतु त्यांची जागा 19 हजार रुपयांच्या बोस कंपनीचे हेडफोन्स आले आहेत. याबाबतची माहिती त्यांनी ट्विटरवरुन दिली आहे.

विशेष म्हणजे, अमेझॉनवरून चुकीने आलेले हेडफोन्स परत करण्यासाठी गौतम रेगे यांनी अ‍ॅमेझॉन कस्टमर केअरशी संपर्क साधला. मात्र, अमेझॉनने त्यांना ते हेडफोन्स स्वत:कडे ठेवण्यास सांगितले. गौतम रेगे यांना ती वस्तू “नॉन-रिटर्नेबल” आहे, असे उत्तर अमेझॉनचे आले आहे.