भारतातील एक रहस्यमय मंदिर, जिथे तंत्र-मंत्र शिकण्यासाठी परदेशातून येतात लोक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2021 03:56 PM2021-10-22T15:56:25+5:302021-10-22T16:07:49+5:30

चौसष्ठ योगिनी मंदिरच्या प्रत्येक रूमध्ये शिवलिंग आणि देवी योगिनीची मूर्ती होत्या. ज्यामुळे या मंदिराला चौसष्ठ योगिनी मंदिर नाव पडलं.

भारताला मंदिरांचा देश म्हटलं जातं. इथे अनेक प्राचीन आणि चमत्कारिक मंदिरे आहेत. इथे अनेक रहस्यमय मंदिरे आहेत ज्यात एक आहे मध्य प्रदेशातील चौसष्ठ योगिनी मंदिर. भारतात चार चौसष्ठ योगिनी मंदिरं आहेत. ओडीशात दोन आणि मध्य प्रदेशात दोन. भारतातील सर्वच चौसष्ठ योगिनी मंदिरांपैकी हे एकमेव मंदिर सुस्थितीत आहे. मुरैना येथील हे मंदिर तंत्र-मंत्रासाठी जगभरात प्रसिद्ध आहे. या मंदिराला तांत्रिक यूनिव्हर्सिटीही म्हटलं जातं. चला जाणून घेऊ या खास मंदिराबाबत...

मध्य प्रदेशातील प्राचीन चौसष्ठ योगिनी मंदिर गोलाकार आहे आणि यात ६४ रूम आहेत. या सर्वच ६४ रूममध्ये भव्य शिवलिंग आहेत. मितावली गावात असलेलं हे रहस्यमय मंदिर जगभरात प्रसिद्ध आहे.

या अद्भुत मंदिराचं निर्माण साधारण १ हजार फूट उंचीवर करण्यात आल आहे आणि डोंगरावरील हे गोलाकार मंदिर एखाद्या तबकडीसारखं दिसतं. या मंदिरात पोहोचण्यासाठी २०० पायऱ्या चढाव्या लागतात. मंदिराच्या मधोमध एका खुल्या मंडपाचं निर्माण करण्यात आलं आहे. ज्यात एक विशाल शिवलिंग आहे. असं सांगितलं जातं की, हे मंदिर ७०० वर्ष जुनं आहे.

या मंदिराचं निर्माण कच्छप राजा देवपालने १३२३ मध्ये केलं होतं. या मंदिरात ज्योतिष आणि गणिताचं शिक्षण दिलं जात होतं. त्याचं हे मुख्य केंद्र होतं. असं सांगितलं जातं की, हे भगवान शिवाचं मंदिर आहे, ज्यामुळे लोक इथे तंत्र-मंत्र शिकायला येत होते.

चौसष्ठ योगिनी मंदिरच्या प्रत्येक रूमध्ये शिवलिंग आणि देवी योगिनीची मूर्ती होती. ज्यामुळे या मंदिराला चौसष्ठ योगिनी मंदिर नाव पडलं. पण काही मूर्ती चोरी झाल्या. त्यामुळे शिल्लक राहिलेल्या मूर्ती दिल्लीच्या संग्रहालयात ठेवण्यात आल्या आहेत.

असंही सांगितलं जातं की, ब्रिटीश आर्किटेक्ट एडविन लुटियंनने मुरैना येथील चौसष्ठ योगिनी मंदिराच्या आधारावरच भारतीय संसदेची इमारत तयार केली होती. भारतीय संसदेची इमारत या मंदिरासारखी तर दिसतेच सोबतच येथील खांबही मंदिरातील खांबांसारखेच दिसतात.

स्थानिक लोकांचा समज आहे की, आजही हे मंदिर भगवान शिवाच्या तंत्र साधनेच्या कवचाने झाकलेलं आहे. या मंदिरात रात्री कुणालाही थांबण्याची परवानगी नाही.

अशी मान्यता आहे की, मां काली चौसष्ठ योगिनी मातेचा अवतार आहे. घोर नावाच्या राक्षसासोबत युद्ध करत असताना माता आदिशक्ती कालीने हे रूप धारण केलं होतं. हे रहस्यमय मंदिर इकंतेश्वर महादेव मंदिर नावानेही ओळखलं जातं.

Read in English