बाबो! अजब-गजब वस्तू खाणारा अवलिया, दोन वर्षात खाल्लं होतं एक अख्खं विमान!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2020 03:37 PM2020-03-16T15:37:13+5:302020-03-16T15:41:13+5:30

१५ जून १९५० ला फ्रान्सच्या ग्रेनोबलमध्ये मिचेल लोटिटोचा जन्म झाला होता. लोटिटो जेव्हा १६ वर्षांचे होते तेव्हापासून असामान्य वस्तू खाऊ लागले होते.

पृथ्वीवर असे असे लोक आहेत जे त्यांच्या विचित्र गोष्टींसाठी ओळखले जातात आणि सर्वात खास बाब म्हणजे यातील अनेक लोकांचा गिनीस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवलं आहे. अशीच एक फ्रान्सची व्यक्ती म्हणजे मिचेल लोटिटो. हा माणूस विचित्र-विचित्र वस्तू खाण्यासाठी ओळखला जात होता. तो एक असामान्य व्यक्ती होता ज्याने एक पूर्ण विमान खाल्लं होतं.

१५ जून १९५० ला फ्रान्सच्या ग्रेनोबलमध्ये मिचेल लोटिटोचा जन्म झाला होता. लोटिटो जेव्हा १६ वर्षांचे होते तेव्हापासून असामान्य वस्तू खाऊ लागले होते.

त्यांच्या या आजाराला मेडिकल भाषेत पिका असं म्हणतात. हा एक असा आजार आहे ज्यात सामान्य पदार्थ पचवू शकत नाही. तर हे लोक असामान्य वस्तू खाऊन सहजपणे पचवतात.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, लोटिटो जेव्हाही केळी, उकडलेली अंडी किंवा ब्रेडसारखे सामान्य पदार्थ खात होते तेव्हा त्यांना ते पचवायला अडचण जात होती. पण एखादी धातुची वस्तू त्यांनी खाल्ली तर ती त्यांना सहज पचत होती

जगभरातील लोकांना हा आजार अजब वाटायचा, पण लोटिटो यांना असं करायला आवडत होतं. या आजारालाच त्यांनी करिअर केलं. त्यांनी १९६६ मध्ये याचं प्रदर्शन करण्यास सुरूवात केली. असे म्हणतात की, मोठ्या संख्येत लोक त्यांचा शो पाहण्यासाठी तिकिट घेऊन येत होते.

लोटिटो यांनी लोकांसमोर बसून बेडपासून ते टीव्ही सेट, कॉम्प्युटर, सायकल आणि धातुच्या कित्येक वस्तू फस्त केल्या. धातुच्या वस्तू खाण्यासाठी आधी त्या वस्तूंचे छोटे तुकडे केले जात होते. आणि ते तुकडे पाणी आणि मिनरल ऑइलसोबत खात होते.

काही खाण्याआधी ते पेट्रोल पित असत. पट्रोल पिण्यामागे त्यांनी कारण सांगितलं होतं की, याने त्यांचा घसा चोपडा होत होता, त्यामुळे धातुच्या वस्तू गिळण्यास सोपं होत होतं.

डॉक्टरांनुसार, लोटिटो यांच्या पोटातील आतड्यांमध्ये एक जाड संरक्षण थर होता. जे सामान्य मनुष्यात नसते. हेच कारण आहे की, तो धातु असो वा काच किंवा रबर ते सहजपणे पचवत होते.

मिचेल लोटिटो यांची प्रसिद्धी अधिक तेव्हा वाढली जेव्हा त्यांनी १९७८ मध्ये रेसना १५० हे विमान तुकडे तुकडे करून खायला सुरूवात केली होती. केवळ २ वर्षात म्हणजे १९८० पर्यंत त्यांनी हे संपूर्ण विमान तुकडे करून खाल्लं होतं.

एका अंदाजानुसार, १९५९ ते १९९७ पर्यंत मिचेल लोटिटो यानी साधारण नऊ टन म्हणजे ८१६४ किलो धातुचं सेवन केलं होतं. अशा विचित्र वस्तू खात असल्याने त्यांचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात आलं आहे.

२५ जून २००७ ला ते वयाच्या ५७व्या वर्षी मरण पावले. पण लोक आजही त्यांची आठवण काढतात.