अग्गो बया... 'ही' मांजर होणार २०० मिलियन डॉलर्सची मालकीण?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2019 12:16 PM2019-02-22T12:16:55+5:302019-02-22T12:21:53+5:30

फॅशन विश्वात सध्या शोककळा पसरली आहे. कारण आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रसिद्ध डिझायनर कार्ल लेजरफिल्स यांचं निधन झालं. त्यांच्या जाण्याने सर्वांना दु:खं तर झालंच, पण यात सर्वात जास्त चर्चा होतीये ती त्यांच्या आवडत्या मांजरीची.

शूपेत असं या मांजरीची नाव असून ही मांजर कार्ल यांची आवडती होती. या मांजरीवर त्यांचं खूप प्रेम होतं. आता कार्ल यांच्या निधनानंतर अशी चर्चा रंगली आहे की, शूपेत ही त्यांची मांजर त्यांच्या संपूर्ण संपत्तीची मालक होईल.जर असं झालं तर शूपेत ही जगातली सर्वात श्रीमंत मांजर ठरेल.

शूपेत ही काही सामान्य मांजर नाहीये. ती स्वत: एक फॅशन आयकॉन आहे. या मांजरीच्या नावाने इन्स्टाग्रामवर एक पेज सुद्धा असून तिचे लाखो फॉलोअर्स आहेत. तिचं हे पेज डिजिटल मार्केटिंगचे एक्सपर्ट ऐशली ट्सक्यूडिन हे मॅनेज करतात.

इतकेच नाही तर शूपेतवर एक पुस्तकही लिहिण्यात आलं आहे. ' Choupette- The Private Life of a High-Flying Fashion Cat' असं या पुस्तकाचं नाव आहे. शूपेतचे फोटो अनेक प्रसिद्ध मॉडेल्ससोबत बघितले जाऊ शकतात.

कार्ल यांचं शूपेटवर भरपूर प्रेम होतं. या मांजरीची काळजी घेण्यासाठी त्यांनी काही नोकर आणि सुरक्षेसाठी बॉडीगार्डही ठेवले होते.

कार्ल यांचं शूपेतबाबतचं प्रेम अनेकदा समोर आलं आहे. एका मुलाखतीत त्यांनी सांगितलं होतं की, सध्या जनावरांशी लग्न करण्याचा काही कायदा किंवा सोय नाहीये, नाही तर मी शुपेतसोबत लग्न केलं असतं. शूपेत आणि माझं नातं फार वेगळं आहे. आम्ही केवळ डोळ्यांनी एकमेकांचं बोलणं समजून घेतो.

आता कार्ल यांच्या जाण्यानंतर शूपेतचं काय होईल याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे. पण रिपोर्टनुसार, कार्ल यांच्यानंतर शूपेतची काळजी ब्रॅड आणि त्यांचा मुलगा हडसन घेणार आहेत. ब्रॅड एक मॉडल आहे आणि तो कार्ल लेजरफील्डला गॉडफादर मानत होता.

असं नाही की, आता कार्लची संपत्ती शूपेतला मिळेल. जर कायद्याने पाहिलं तर हे इतकं सोपं नाही. यूकेच्या कायद्यानुसार, जर एखादी व्यक्ती मरण्याआधी त्याची संपत्ती पाळीव प्राण्यासाठी लिहून गेला, तर ती संपत्ती पाळीव प्राण्याला मिळत नाही.

जर हा पैसा एखाद्या ट्रस्टला दिला गेला तर हा ट्रस्ट पाळीव प्राण्याची काळजी घेऊ शकतो. तशी तर शूपेतला लेजरफील्डची २०० मिलियन डॉलरची संपत्ती मिळू शकते आणि जर असं झालं तर शूपेत जगातली सर्वात श्रीमंत मांजर ठरेल.