Gandhi Jayanti : सर्वांच्या मनात घर करून असलेले गांधीजी नोटांवर कधीपासून आलेत? त्याआधी काय असायचं नोटांवर?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2019 11:21 AM2019-10-02T11:21:33+5:302019-10-02T11:38:06+5:30

आज २ ऑक्टोबर २०१९ ला देशभरात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची १५०वी जयंती साजरी केली जात आहे. त्यानिमित्ताने त्यांच्याबद्दल अनेक गोष्टींची चर्चा होत आहे. इतिहासाची पाने पलटून त्यांच्याबाबत जाणून घेतलं जात आहे. आज त्यांच्याबाबतची अशीच एक गोष्ट आपण जाणून घेणार आहोत.

भारतीय रूपयांच्या नोटांमध्ये गेल्या काही वर्षात अनेक बदल झालेत. पण अनेक बदल झाले असले तरी एक गोष्ट मात्र कायम आहे. ती म्हणजे महात्मा गांधी यांचा फोटो. अनेकांना प्रश्न पडत असेल की, नोटांवर छापला जाणारा गांधीजींचा फोटो आला कुठून किंवा कधीपासून नोटांवर गांधीजींचा फोटो छापला जातो?

पहिल्यांदा नोटेवर कधी आला फोटो? - .thebetterindia.com च्या एका वृत्तानुसार, सर्वात पहिल्यांदा भारतीय नोटेवर महात्मा गांधी यांचा फोटो १९६९ मध्ये छापण्यात आला होता. हे त्यांचं शताब्दी वर्ष होतं. तेव्हा ५ आणि १० रूपयांच्या नोटांवर गांधीजींचा फोटो छापण्यात आला होता. पहिल्यांदा १९६९ मध्ये जेव्हा गांधीजींचा फोटो नोटेवर छापण्यात आला होता, तेव्हा त्या फोटोत त्यांच्या मागे सेवाग्राम आश्रमही होतं. हा फोटो नंतर बदलण्यात आला.

आता दिसतो तो फोटो कुठे काढला? - आता बापूंचा जो फोटो आपण नोटांवर पाहतो, तो व्हाइसरॉय हाऊस(आताचं राष्ट्रपती भवन) मध्ये १९४६ मध्ये काढण्यात आला होता. हा फोटो नोटांवर १९८७ पासून घेण्यात आला. त्यावेळी बापू म्यानमार आणि भारताचे ब्रिटीश सेक्रेटरी म्हणून कार्यरत असलेले फ्रेडरिक पेथिक लॉरेन्स यांची भेट घेण्यासाठी गेले होते. तिथे काढण्यात आलेला फोटो पोट्रेट रूपात नोटांवर घेण्यात आला. हा फोटो कोणत्या फोटोग्राफरने काढला याची काही माहिती उपलब्ध नाही.

आधी नोटांवर काय असायचं? - महात्मा गांधी यांचा फोटो नोटांवर घेण्याआधी नोटांवर अशोक स्तंभाचा फोटो असायचा. आरबीआयने १९९६ मध्ये नोटांच्या डिझाइनमध्ये बदल केला. तेव्हा अशोक स्तंभाच्या जागी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या फोटोला स्थान देण्यात आलं आणि अशोक स्तंभ नोटेच्या खालच्या भागात घेण्यात आला.

अशोक स्तंभाआधी नोटेवर काय असायचं? - अशोक स्तंभ आणि महात्मा गांधी यांच्या फोटोंआधी भारतीय रूपयावर किंग जॉर्ज यांचा फोटो छापला जात होता. किंग जॉर्ज यांचा फोटो असलेल्या नोटा १९४९ पर्यंत चलनात होत्या. त्यानंतर अशोक स्तंभ आला.