गंगेत वाढतेय डॉल्फिन माशांची संख्या, कसरती पाहून तुम्हीही व्हाल अवाक्!, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2020 11:47 AM2020-10-04T11:47:27+5:302020-10-04T12:05:21+5:30

बिहारच्या भागलपूरमधून वाहत असलेल्या गंगा नदीत सध्या अनोखा नजारा पाहायला मिळत आहे. गंगेत डॉल्फिन्सचा वावर वाढल्यानं लोक या अनोख्या दृश्याचा आनंद घेताना दिसून येत आहे. गंगेच्या पाण्यात उड्या मारत इकडून तिकडे जात असलेले डॉल्फिन्स आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले आहेत. पाण्यात खेळणारे आणि सुर्यनमस्कार करणारे डॉल्फिन्स पाहण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. विशेष म्हणजे गंगेत डॉल्फिन्सच्या संख्येत वाढ झालेली दिसून येत आहे.

गंगेची गाय मानल्या जात असलेल्या गांगेय डॉल्फिन्सचे महत्व दिवसेंदिवस वाढत आहे. शंकर टॉकिज ते मानिक सरकार घाटपर्यंत डॉल्फिन्स पाहण्याचा आनंद लोक सध्या घेत आहेत. ९० च्या दशकारत बिहार सरकारने सुल्तानगंज ते बटेश्वर पर्वतापर्यंत गंगा नदीच्या ७० किलोमीटर क्षेत्रात विक्रमशिला गांगेय डॉल्फिन सेंचुरी म्हणून घोषित केले होते.

त्यानंतर या भागात गंगा नदीजवळ पर्यटनाचा विकास होत गेला. गांगेय डॉल्फिनला २००९ मध्ये भारत सरकारकडून राष्ट्रीय जलचर जीव घोषित करण्यात आले. बक्सर ते बटेश्वर या परिसरातील गंगेत जवळपास ५०० पेक्षा जास्त डॉल्फिन्स आहेत.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी गंगा नदीत दिसून येत असलेल्या डॉल्फिनला राष्ट्रीय जलचर जीव घोषित केले होते. स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही देशाला संबोधित करताना 'डॉल्फिन प्रोजेक्ट' सुरू करण्याची घोषणा केली होती.

नदी आणि समुद्री डॉल्फिन या दोन्हींवर लक्ष केंद्रीत करणार असून पर्यटन व्यवसाय विकसित करण्यासाठी आणि रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. (Image credit- New Scientist)