नदीला पूर आल्याने अनेकांनी पळ काढला, पण त्याने त्याच पाण्यात सुरू ठेवलं रेस्टॉरंट अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2021 06:19 PM2021-10-08T18:19:38+5:302021-10-08T18:25:49+5:30

पूराच्या पाण्यात सुरू केलेल्या या रेस्टॉरंटमध्ये आता ग्राहकांच्या लांबच-लांब रांगा लागतात.

मुसळधार पावसामुळे किंवा नद्यांना आलेल्या पूरामुळे अनेकांचे संसार उघड्यावर पडतात. घर, दुकान आणि घरातील सामान वाहून गेल्यास मोठं नुकसान सहन करावं लागतं. पण, एका व्यक्तीने याच पूराच्या पाण्याचा मोठा फायदा उचलला आहे. थायलंडमधील एका व्यक्तीने चक्क पूराच्या पाण्यातच हॉटेल सुरू केलं. या त्याच्या अनोख्या कल्पनेला लोकांनीही प्रतिसाद दिला. आता त्याच्या हॉटेलमध्ये ग्राहकांच्या रांगा लागतात.

कोरोना महामारीमुळे रेस्टॉरंटचा व्यवसाय आधीच तोट्यात चालला होता. त्यात अचानक आलेल्या पूराने मोठी आर्थिक समस्या निर्माण झाली. पण, या परिस्थितीच खचून न जाता थायलंडमधील 'रिव्हरसाइड रेस्टॉरंट'चे मालक टिटिपॉर्न जुतिमानन यांनी या संधीचा फायदा घेत पूराच्या पाण्यातच रेस्टॉरंट सुरू ठेवलं. आता हे हॉटेल चांगल्याप्रकारचे सुरू आहे.

चाओ फ्राया नदीच्या वाढत्या पाण्यामुळे अनेक भागातील घरांमध्ये आणि दुकानांमध्ये पूराचे पाणी शिरले. पूर टाळण्यासाठी काही लोकांनी आपली दुकाने बंद केली तर काहींनी तिथेच राहण्याचा निर्णय घेतला. टिटिपॉर्नने पूर असूनही आपले रेस्टॉरंट सुरू ठेवण्याचा धाडसी निर्णय घेतला. या निर्णयाचा त्यांना चांगलाच फायदा झाला.

नदीचे पाणी कमी झाले नाही, त्यामुळे त्यांनी पाण्यातच ग्राहकांना बसण्याची व्यवस्था केली. आता लोकं रागां लावून या पाण्यातील रेस्टॉरंटमध्ये जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी येतात. अनेकवेळा नदीत धावणाऱ्या बोटीदेखील रेस्टॉरंटजवळ थांबून रेस्टॉरंटच्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत असतात. रेस्टॉरंटच्या काठावर येणाऱ्या लाटा या ठिकाणचे प्रमुख आकर्षण आहे.

बँकॉकच्या नॉन्थाबुरी येथील चाओ फ्राया नदीच्या काठावर हे रेस्टॉरंट चालवणारे टिटिपॉर्न जुतिमानन सांगतात की, पूर आल्यानंतर अनेकांनी जागा सोडली, मलाही वाटलं होतं जागा सोडावी. पण, नंतर मी याच संधीचा फायदा घेण्याचा विचार केला. ग्राहकांना नदीच्या लाटा आवडतात आणि मी याच लाटांचा फायदा घेत रेस्टॉरंट सुरू ठेवलं.

टिटिपॉर्न यांच्या रेस्टॉरंटमधील पाण्यात भिजलेल्या खुर्च्यांवर बसलेल्या ग्राहकांचा व्हिडिओ अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होत असतो. गेल्या काही आठवड्यांमध्ये, थायलंडच्या उत्तर आणि मध्य प्रांतांना पूराचा फटका बसला आहे, ज्यामुळे बँकॉकच्या नद्यांची पाणी पातळी वाढली आहे.

Read in English