365 राण्या असलेले 'शौकीन' महाराज अन् कंदीलाच्या प्रकाशातील त्यांच्या 'रात्रीचं राज'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2020 11:46 AM2020-03-05T11:46:01+5:302020-03-05T12:43:26+5:30

पटियालाचे राजा महाराजा भूपिंदर सिंह यांच्या श्रीमंतीचा अंदाज तुम्ही यावरून लावू शकता की, ते १७ कोटी रूपयांच्या डिनर सेटमध्ये जेवण करत होते.

भारत जेव्हा स्वतंत्र व्हायचा होता त्यावेळी भारताच्या वेगवेगळ्या प्रदेशांवर वेगवेगळ्या राजांची सत्ता होती. प्रत्येक राजाची एक वेगळी ओळख होती. पण जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा सगळे प्रदेश एक झाले. या वेगवेगळ्या राजांपैकी एक असा राजा होता ज्याला ३६५ राण्या होत्या. हा राजा आपल्या शाही जगण्यासाठी अधिक प्रसिद्ध होता. या राजाचं नाव म्हणजे महाराजा भूपिंदर सिंह.

पटियालाचे राजा महाराजा भूपिंदर सिंह यांच्या श्रीमंतीचा अंदाज तुम्ही यावरून लावू शकता की, ते १७ कोटी रूपयांच्या डिनर सेटमध्ये जेवण करत होते. इतकेच नाही तर साधारण २ हजार ९३० डायमंड असलेला हार ते घालत होते. या हाराची किंमत आज २५ मिलियन डॉलर म्हणजे १६६ कोटी रूपये इतकी आहे.

१९०० सालात वडिलांच्या निधनानंतर लहान वयात ते गादीवर बसले. बालपणापासून महाराजा भूपिंदर सिंह हे विलासी प्रवृत्तीचे होते. त्यांच्या या विलासी जगण्याचा उल्लेख त्यांच्यावर आधारित 'महाराजा' या पुस्तकात आढळतो.

जरमनी दासने या पुस्तकात लिहिले आहे की, महाराजा भूपिंदर सिंह यांनी १९०० ते १९३८ पर्यंत पटियालावर राज्य केलं. दरम्यान त्यांच्या ३६५ राण्या होत्या. इतिहासकार असे मानतात की, महाराजांना १० अधिकृत राण्यांसहीत ३६५ राण्या होत्या. या राण्यांसाठी पटियालामध्ये अनेक भव्य महाल उभारण्यात आले होते.

राजा आपल्या ३६५ राण्यांना संतुष्ट कसे करत असतील असा प्रश्न कुणाच्याही मनात येणं स्वाभाविक आहे. मात्र, यासाठी राजा दररोज महालात ३६५ लालटेन म्हणजेच कंदिल पेटवायचे. त्या कंदिलांवर त्यांच्या ३६५ राण्यांची नावे लिहिली होती. जो कंदील सकाळी सर्वातआधी विझत होता महाराज त्यावरील राणीचं नाव वाचत असे आणि त्याच राणीसोबत रात्र घालवत असे. महाराजांना त्यांच्या १० अधिकृत राण्यांकडून ८३ अपत्ये झाली होती. मात्र, त्यातील केवळ ५३ जिवंत राहू शकली.

महाराज भूपिंदर सिंह यांचा किल्ला पटियाला शहराच्या मधोमध १० एकर परिसरात परसलेला होता. या किल्ल्याची खासियत म्हणजे यात मुख्य महाल, गेस्ट हाऊस आणि दरबार हॉल आहे. किल्ल्यातील अनेक भिंतीवर पेंटिंग्स आहेत.

दीवान जरमनी दास यांचं पुस्तक 'महाराजा'मध्ये महाराज भूपिंदर सिंह यांनी त्यांच्या विसाली जगण्याचं दर्शन घडवण्यासाठी एक लीलाभवन तयार केलं होतं. हे पटनामध्ये आहे. या महालात केवळ लोक विवस्त्र होऊन प्रवेश करू शकत होते. येथील भिंतींवर कामसूत्र आणि उत्तेजक चित्र होती. इथे एक स्वीमिंग पूलही होता. ज्यात एकाचवेळी १५० पुरूष आणि महिला आंघोळ करू शकत होते.

महाराजा भूपिंदर सिंह यांच्याकडे अनेक लक्झरी कार्स तर होत्याच. पण त्यावेळी त्यांच्याकडे स्वत:चं प्लेनही होतं. तसेच त्यांच्याकडे ४४ रोल्स रॉयस कार होत्या. त्यातील २० रोल्स रॉयसचा ते रोजच्या दौऱ्यासाठी वापर करायचे.

अनेकांना हे माहीत नसेल पण महाराजा भूपिंदर सिंह आणि हिटलर यांची चांगली मैत्री होती. १९३५ मध्ये बर्लिन दौऱ्यावर असताना भूपिंदर सिंग यांनी अडॉल्फ हिटलरसोबत ओळख झाली होती. त्यावेळी हिटलरने महाराजांना एक कारही गिफ्ट केली होती.