सावधान! भारताचा योद्धा येतोय; एकटाच पाकिस्तान, चीनला भारी पडणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2020 05:42 PM2020-05-15T17:42:41+5:302020-05-15T17:48:10+5:30

खरेतर हा योद्धा मे महिन्याच्या अखेरीसच येणार होता. पण कोरोना व्हायरसमुळे दोन महिने उशिराने येणार आहे. तुम्ही विचार करत असाल कोण हा नवा योद्धा.

खरेतर हा योद्धा मे महिन्याच्या अखेरीसच येणार होता. पण कोरोना व्हायरसमुळे दोन महिने उशिराने येणार आहे. तुम्ही विचार करत असाल कोण हा नवा योद्धा.

भारतासह अवघा देश चीनी कोरोना व्हायरससोबत लढत असताना भारताचे पारंपरिक शेजारी आणि शत्रू तिन्ही बाजुने कुरापती काढत आहेत. एका बाजुने पाकिस्तान घुसखोरी, शस्त्रसंधीचे उल्लंघन करत आहे. तर दुसरीकडे चीन जमीन, आकाश आणि समुद्रामध्ये भारताला आव्हान देत आहे. अशा संकटकाळात एक नवा योद्धा भारतात येण्याच्या तयारीत आहे.

होय, भारतीय हवाई दलाला मोठी ताकद मिळणार आहे. हा योद्धा आहे, राफेल लढाऊ विमान. ही विमाने पंजाबच्या अंबाला हवाईतळावर उतरविण्यात येणार आहेत.

सुरक्षा मंत्रालयाने एएनआयला दिलेल्या माहितीनुसार दोन सीट असलेली तीन प्रशिक्षण विमानांसह पहिली ४ राफेल लढाऊ विमाने थेट फ्रान्सहून उड्डाण करणार आहेत. ही विमाने आरबी सिरीजची असणार आहेत.

पहिले विमान १७ गोल्डन एरोजचे कमांडिंग ऑफिसर फ्रान्सच्या पायलटसोबत उड्डाण करणार आहे. हे विमान हवाईदलाचे प्रमुख आरकेएस भदौरिया यांच्या सन्मानासाठी झेप घेणार आहे. भदौरिया यांनी या राफेल विमानांच्या करारावेळी महत्वाची भूमिका निभावली होती.

या विमानांनी भारताकडे येण्यासाठी हवेत झेप घेतल्यानंतर फ्रान्सच्या टँकर विमानातून इंधन भरले जाणार आहे. यानंतर ही विमाने मध्य पूर्वेतील एका ठिकाणी उतरवली जाणार आहेत. यानंतर विश्रांती घेऊन पुन्हा ही विमाने भारताकडे झेपावतील. या विमानांमध्ये पुढे भारतीय आयएल-७८ टँकर विमानातून इंधन भरले जाणार आहे.

खरेतर राफेल एका झेपेतच फ्रान्स ते भारत हे हजारो मैलांचे अंतर पार करण्याची क्षमता ठेवते. परंतू, एका छोट्या कॉकपिटमध्ये १० तासांचा प्रवास करणे तणावाचे होईल, या उद्देशाने ही विमाने एका अज्ञात जागी उतरवली जाणार आहेत.

आनंदाची गोष्ट म्हणजे भारतीय हवाईदलाच्या वैमानिकांच्या पहिल्या तुकडीने यशस्वीरित्या प्रशिक्षण पूर्ण केले आहे. दोन्ही देशांमध्ये लॉकडाऊन शिथिल झाला की, दुसरी तुकडी फ्रान्सला पाठविली जाणार आहे.

राफेलसंबंधीत उपकरणांची पहिली खेप लॉकडाऊनकाळातच फ्रान्सने मालवाहू विमानाने पोहोचती केली आहे. पुढील काळात आणखी काही उपकरणे भारतात आणली जाणार आहेत.

फ्रान्समध्ये पहिली ३६ विमाने बनविली जाणार आहेत. यानंतरची विमाने भारतात बनविली जाणार आहेत.