...तेव्हा बायडन म्हणाले होते, की ते भारतातूनही निवडणूक लढू शकतात; 'इंट्रेस्टिंग' आहे त्यांचे भारतीय कनेक्‍शन

By श्रीकृष्ण अंकुश | Published: November 7, 2020 12:54 PM2020-11-07T12:54:55+5:302020-11-07T13:05:34+5:30

महासत्ता अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बायडन आपले प्रतिस्पर्धक आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्‍ड ट्रम्प यांच्या पुढे आहेत. विजयापासून ते केवळ एक पाऊल दूर आहेत.

सध्या अमेरिकेत मतमोजणीवरून वाद सुरू आहे. मात्र, अमेरिकेच्या भावी राष्ट्राध्यक्षाचे चित्र स्पष्ट झाले आहे. अशात एक प्रश्न पडणे स्वाभावीक आहे, की ज्यो बायडन नेमके आहेत तरी कोन? त्यांची राजकीय कारकीर्द कशी आहे? त्यांचे नेमके भारतीय कनेक्शन काय? तर जाणून घेऊया, ज्यो बायडन यांच्या आयुष्याचे काही खास पैलू...

डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बायडन 1972मध्ये पहिल्यांदा डेवावेयर येथून सीनेटर म्हणून निवडणून आले होते. आतापर्यंत ते 6 वेळा सीनेट सदस्य झाले आहेत.

बराक ओबामा राष्ट्राध्यक्ष असताना बायडन हे अमेरिकेचे 47वे उप राष्ट्राध्यक्ष झाले होते. या निवडणुकीत त्यांनी पॉप्यूलर मतांच्या बाबतीत ओबामा यांना विक्रमी मतांनी मागे टाकले होते.

ज्यो बायडन हे अमेरिकेच्या इतिहासातील पाचवे सर्वात युवा सीनेटर होते. आता ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले, तर अमेरिकेच्या इतिहासातील ते सर्वाधिक वयाचे राष्ट्राध्यक्ष ठरतील. आता ते 78 वर्षांचे आहेत.

बायडन यांच्या कौटुंबिक जिवनाचा इतिहास अत्यंत दुःखद आहे. 1972मध्ये एका कार अपघातात त्यांची पत्‍नी आणि मुलीचा मृत्यू झाला होता. 2015मध्ये त्यांच्या मुलाचे कॅन्सरने निधन झाले. या घटनांनी त्यांच्या आयुष्याला मोठा हादरा दिला.

वरील कौटुंबिक घटनांचा परिणाम त्यांच्या जीवनावर आणि विचारांवरही झाला. यामुळेच राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत त्यांनी आरोग्य योजनांना विशेष प्राधान्य दिले. या निवडणुकीत हाच त्यांचा अजेंडा होता.

अमेरिकन राजकारणात ज्यो बायडन नावाने प्रसिद्ध असलेल्या बायडन यांचे संपूर्ण नाव फार कमी लोकांना माहीत आहे. त्यांचे पूर्ण नाव आहे, 'जोसेफ रॉबिनेट बायडन जूनियर'. त्यांचा जन्म अमेरिकेच्या पेंसिलव्हेनिया राज्‍यातील स्‍कँटनमध्ये झाला आहे. ते लहान असतानाच डेलव्हेयरला निघून गले होते.

बायडन यांचे भारतीय कनेक्शन - बायडन 2013मध्ये उपराष्ट्राध्यक्ष म्हणून भारतात आले होते. तेव्हा मुंबईमध्ये केलेल्या एका भाषणात त्यांनी, आपले भारतीय कनेक्‍शन सांगितले होते.

बायडन म्हणाले होते, की 1972मध्ये ते जेव्हा पहिल्यांदा सीनेट सदस्य झाले, तेव्हा त्यांना मुंबईतील एका बायडनचे पत्र आले होते. तेव्हा मुंबईतील बायडन यांनी त्यांना, आपल्या दोहोंचेही पूर्वज एकच असल्याचे सांगितले होते.

या पत्रात, त्यांचे पूर्वज 18व्या शतकात ईस्ट इंडिया कंपनीमध्ये काम करत होते, अशी माहितीही त्यांनी दिली होती. या वेळी बायडन यांनी निराशाही व्यक्त केली, की ते यासंदर्भात सविस्तर माहिती मिळवू शकले नाही.

बायडन यांनी 2015मध्ये वाशिंग्टन येथे झालेल्या इंडो-यूएस फोरमच्या बैठकीतही या घटनेचा उल्लेख केला होता. ते म्हणाले होते, की बहुदा त्यांच्या पूर्वजाने एका भारतीय महिलेशी विवाह केला होता. ज्यांच्या कुटुंबातील लोक अजही तेथे आहेत.

त्यावेळी मुंबईत बायडन आडनावाचे एकूण 5 लोक होते. यासंदर्भात एका पत्रकाराने त्यांना माहिती दिली होती, असेही त्यांनी सागितले होते. तेव्हा ते गमतीने म्हटले होते, की ते भारतातूनही निवडणूक लढू शकतात.

अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाच्या यावेळच्या निवडणूक प्रचारात बायडन यांनी भरपावसात एका सभेला संबोधित केले होते.