जगावर मोठं संकट! ४० वर्षांतला सर्वात मोठा धोका; माणसाची ताकद माणसावरच उलटणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2021 07:25 PM2021-09-27T19:25:04+5:302021-09-27T19:28:17+5:30

माणसानं स्वत:च्या सुरक्षेसाठी ज्या शस्त्रांची निर्मिती केली, तीच शस्त्र आता त्याच्यावर उलटण्याची भीती

गेल्या दीड-दोन वर्षांपासून संपूर्ण जग कोरोना संकटाचा सामना करत आहे. कोरोनानं जगभरात लाखो जणांचा बळी घेतला. लाखो लोकांना कोरोनाची लागण झाली. मात्र आता याहून मोठा जगासमोर आहे.

स्वत:ला सुरक्षित ठेवण्यासाठी माणसानं इतरांवर हल्ले करण्यासाठी नवीन शस्त्रास्त्रं विकसित केली. शत्रूला संपवण्यासाठी मानवानं तयार केलेल्या अण्वस्त्रांमुळे आता माणूसच संकटात सापडला आहे. त्यामुळे माणूस आता ४० वर्षांमधील सगळ्यात मोठ्या संकटाचा सामना करत आहे.

जगभरातील अण्वस्त्रांमुळे माणूस ४० वर्षांतील सर्वात मोठ्या संकटात सापडला असल्याचं मत संयुक्त राष्ट्राचे महासचिव एंटोनियो गुटेरेस यांनी व्यक्त केलं. आंतरराष्ट्रीय अण्वस्त्र उच्चाटन दिवसानिमित्त ते बोलत होते. अण्वस्त्र संपवून जगाच्या शांततेसाठी एका नव्या वाटेनं जाण्यासाठी आताची वेळ सर्वात उत्तम असल्याचं ते म्हणाले.

जग अण्वस्त्र मुक्त करण्याचा विषय संयुक्त राष्ट्राच्या स्थापनेपासूनच अजेंड्यावर होता. १९४६ मध्ये संयुक्त राष्ट्राच्या महासभेत त्यासाठी प्रस्ताव आणला गेला. नरसंहार करण्यासाठी निर्माण करण्यात आलेली शस्त्रास्त्रं संपवण्याचं आव्हान त्यावेळी करण्यात आलं होतं, याची आठवण गुटेरेस यांनी करून दिली.

गेल्या काही दशकांत अण्वस्त्रांची संख्या कमी झाली. पण आजही जगात जवळपास १४ हजार अण्वस्त्रं आहेत. त्यामुळे जगासमोर अण्वस्त्र हल्ल्याचं खूप मोठं संकट आहे, याकडे गुटेरेस यांनी लक्ष वेधलं.

अनेक देश त्यांच्याकडे असणाऱ्या अण्वस्त्रांमध्ये सुधारणा करत आहेत. अण्वस्त्रांची गुणवत्ता आणखी उत्तम कशी होईल यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे जगात नवी स्पर्धा सुरू होत असल्याचे संकेत मिळू लागल्याची भीती गुटेरेस यांनी व्यक्त केली.

अण्वस्त्र तंत्रज्ञान असलेल्या देशांना व्यापक अण्वस्त्र प्रतिबंध करारावर स्वाक्षरी करण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. यावर आतापर्यंत १८५ देशांनी स्वाक्षरी केली आहे. ८ देशांनी यावर अद्याप स्वाक्षरी केली नसल्याचं गुटेरेस यांनी सांगितलं.

अण्वस्त्र प्रतिबंध करारावर स्वाक्षरी न करणाऱ्या देशांमध्ये चीन, इजिप्त, भारत, इराण, इस्रायईल, उत्तर कोरिया, पाकिस्तान आणि अमेरिकेचा समावेश आहे. अण्वस्त्र स्पर्धा संपावी आणि जगात शांतता नांदावी यासाठी प्रयत्न आवश्यक असल्याचं गुटेरेस म्हणाले.