भारतातूनच परतताच पुतिन यांच्यासाठी खूशखबर, रशियाला मिळाली मोठी ऑफर; अमेरिकेची झोप उडाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2025 10:19 IST2025-12-07T10:13:31+5:302025-12-07T10:19:26+5:30

रशियाचे राष्ट्रपती व्लादीमीर पुतिन २ दिवसीय भारत दौरा पूर्ण करून पुन्हा मायदेशी परतले आहेत. भारतातून परतताच पुतिन यांना आनंदाची बातमी मिळाली आहे. हिंद महासागरात रशियाला एक बेस मिळू शकतो. जो थेट अमेरिकेची चिंता वाढवू शकतो.

हिंद महासागरातील लाल समुद्र किनाऱ्यावर सूदान नावाचा देश आहे. सूदानच्या सैन्य सरकारने रशियासमोर एक असा प्रस्ताव ठेवला आहे जो आफ्रिकन मिडिल ईस्टच्या जियोपॉलिटिक्सला बदलू शकतो. वॉल स्ट्रीट जर्नलमध्ये हा रिपोर्ट आला आहे.

रिपोर्टनुसार, सूदानने रशियाला लाल समुद्र किनाऱ्यावर सैनिक आणि युद्धनौका तैनात करण्याचे अधिकार देण्याची मोठी ऑफर दिली आहे. सूदानने रशियाला ही ऑफर दिलीय परंतु त्याबदल्यात त्यांनाही काहीतरी हवे आहे.

या ऑफरच्या बदल्यात सूदान रशियाकडून प्रगत शस्त्रे, विमानविरोधी यंत्रणा आणि लष्करी उपकरणे मागत आहे. सरकार रशियाला नौदल सुविधा बांधण्यास परवानगी देण्यास तयार आहे असं सुदानच्या परराष्ट्र मंत्रालयाने फेब्रुवारीमध्ये संकेत दिले होते. परंतु त्यावेळी अटी स्पष्ट नव्हत्या.

आता असे समोर आले आहे की, रशियाला पोर्ट सुदान किंवा लाल समुद्रातील इतर ठिकाणी अणुऊर्जेवर चालणाऱ्या जहाजांसह ३०० पर्यंत सैन्य आणि चार युद्धनौका तैनात करण्याची परवानगी देण्याचा प्रस्ताव आहे. रशिया गेल्या पाच वर्षांपासून अशा धोरणात्मक जागेच्या शोधात आहे.

सीरियामध्ये बशर अल असद शासन संपल्यानंतर रशियाने भूमध्य सागरात सैन्याची उपस्थितीत बरीच कमी झाली होती. त्यावेळी लाल समुद्रातील जागा मिळणे रशियासाठी रणनीतीदृष्ट्या खूप फायदेशीर मानले जाते. कारण हा भाग हिंद महासागर, सुएझ कालवा आणि बाब-एल-मंडेब सामुद्रधुनीला जोडते, ज्यातून जागतिक व्यापाराचा मोठा भाग जातो.

रिपोर्टनुसार, सुदानची लष्करी स्थिती सातत्याने कमकुवत होत चालली आहे. २०२३ मध्ये सुरू झालेल्या लष्कर आणि रॅपिड सपोर्ट फोर्सेस (RSF) यांच्यातील संघर्षामुळे लाखो लोक विस्थापित झाले आहेत आणि हजारो लोकांचे प्राण गेले आहेत.

या संदर्भात सुदानी राजवट रशियाकडून लष्करी मदत घेणे अत्यंत महत्त्वाचे मानते. पाश्चात्य देश आणि युरोपियन युनियनकडून अशी शस्त्रे मिळवणे जवळजवळ अशक्य आहे, ज्यामुळे रशिया हा सर्वात व्यवहार्य पर्याय बनला आहे.

जर हा करार झाला तर रशियाला लाल समुद्रात कायमस्वरूपी लष्करी प्रवेश मिळेलच शिवाय सुदानच्या सोन्याच्या खाणी आणि इतर संसाधनांवरही सुरुवातीचे अधिकार मिळू शकतील. रशियाने आधीच आफ्रिकेतील अनेक देशांसोबत सुरक्षा सहकार्य वाढवले ​​आहे आणि या सैन्य तळामुळे ती रणनीती आणखी मजबूत होईल.

अमेरिका आणि त्यांचे मित्र राष्ट्रे या संभाव्य कराराबद्दल चिंतेत आहेत, कारण हे तेच क्षेत्र आहे जिथे चीन आधीच जिबूतीमध्ये परदेशी नौदल तळ चालवतो आणि अमेरिकेचा तळ देखील आहे. रशियाच्या एन्ट्रीमुळे या सागरी कॉरिडॉरमध्ये एक नवीन संतुलन निर्माण होऊ शकते. सध्या ही नौदल सुविधा कधी तयार होईल हे स्पष्ट नाही, परंतु युद्धाच्या दबावाखाली सुदान शक्य तितक्या लवकर रशियाशी करार करू इच्छित असल्याचे संकेत आहेत.