ढगांवर साऊंड व्हेवच्या माऱ्याने अधिक पाऊस पडणार, दुष्काळाची समस्या मिटणार; तज्ज्ञांनी लावला शोध

By बाळकृष्ण परब | Published: February 9, 2021 03:28 PM2021-02-09T15:28:40+5:302021-02-09T15:35:30+5:30

Rain News : ध्वनी तरंगांमुळे ढग सक्रिय होतात आणि त्यामध्ये कंपन सुरू होते. त्यामुळे पावसाची शक्यता वाढते

कमी पर्जन्यमान ही जगातील अनेक देशांमधील समस्या बनलेली आहे. दरम्यान, या समस्येवर मात करण्यासाठी चिनी तज्ज्ञांनी काही मार्ग काढला असल्याचे समोर आले आहे.

डेली मेलच्या रिपोर्टनुसार अध्ययनामध्ये लेखक, प्राध्यापक वांग गुआंगकिआन यांनी सांगितले की, ध्वनी तरंगांमुळे ढग सक्रिय होतात आणि त्यामध्ये कंपन सुरू होते. त्यामुळे पावसाची शक्यता वाढते.

चीनमधील काही तज्ज्ञांनी सांगितले आहे की, ढगांवर जर लो फ्रिक्वेंसी साऊंड व्हेवचा मारा केला तर अधिक पाऊस पडू शकतो. तसेच दुष्काळाच्या समस्येवरही कायमचा तोडगा निघू शकतो. बीजिंगमधील सिंघुआ विद्यापीठाच्या तज्ज्ञांनी प्रयोगादरम्यान, ढगांवर ५० हर्ट्झच्या फ्रिक्वेंसीच्या साऊंड व्हेवचा १६० डेसिबलच्या स्तरावर वापर करून मारा केला.

अध्ययनादरम्यान दिसून आले की, एक खास यंत्रामधून ध्वनी तरंगांचा ढगांवर मारा केल्यानंतर ढगांमध्ये जलबिंदूंच्या पातळीत वाढ झाली होती. दुष्काळ प्रभावित भागांमध्ये या तंत्राच्या वापरामुळे फायदा होऊ शकतो.

दरम्यान तिबेटच्या पठारावर जेव्हा साऊंड व्हेव टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला तेव्हा १७ टक्के अधिक पाऊस झाल्याचे दिसून आले. चीनच्या वायूमंडळामध्ये वॉटर लेव्हर पुरेशा प्रमाणात आहे. मात्र त्याच्यापैकी केवळ २० टक्केच पाणी जमिनीपर्यंत पोहोचते.

Scientia Sinica Technologica या जर्नलमध्ये प्रकाशित लेखामध्ये चिनी तज्ज्ञांनी सांगितले की, साऊंड एनर्जीवाले तंत्रज्ञान, क्लाऊड फिजिक्सला बदलत आहे. प्राध्यापक वांग यांनी हे सुद्धा सांगितले की, या तंत्राच्या वापरामुळे कुठल्याही प्रकारचे रासायनिक प्रदूषण होत नाही.