काय सांगता? अफगाणिस्तानी नागरिकांवर 'पैशांचा पाऊस' पडणार; जबरदस्त प्लानिंग सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2021 06:06 PM2021-10-08T18:06:13+5:302021-10-08T18:12:43+5:30

अफगाणिस्तानच्या नागरिकांवर पैशांचा पाऊस पडणार; योजनेवर काम सुरू

अफगाणिस्तानात तालिबानचं सरकार येऊन दोन महिने पूर्ण झाले आहेत. मात्र देश चालवताना तालिबानना समस्यांचा सामना करावा लागत आहे. सर्वात मोठी समस्या देशाच्या अर्थव्यवस्थेची आहे.

अफगाणिस्तानातील लाखो लोकांना घरातील सामान विकून उदरनिर्वाह करावा लागत आहे. संयुक्त राष्ट्राच्या एका अहवालानुसार अफगाणिस्तानातील ९७ टक्के जनता २०२२ च्या अखेरपर्यंत दारिद्र्य रेषेखाली जाऊ शकते.

अफगाणिस्तानातील जनतेला मदत करण्यासाठी पाश्चिमात्य देशांचे प्रयत्न सुरू आहेत. पण या देशांना तालिबानच्या हाती पैसा द्यायचा नाही. त्यामुळेच काही आंतरराष्ट्रीय अधिकारी अफगाण जनतेच्या मदतीसाठी एक अजब योजना आखत आहेत.

रॉयटर्सनं दिलेल्या वृत्तानुसार, काही अधिकारी कॅश एअरलिफ्ट करण्यासाठी योजना तयार करत आहेत. आकाशातून पैशांचा पाऊस पाडण्याची योजना अधिकाऱ्यांकडून आखली जात आहे. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसांत अफगाणी नागरिकांवर हेलिकॉप्टर्सच्या माध्यमातून पैसे टाकले जाऊ शकतात.

अफगाणी नागरिकांसाठी पाठवली जाणारी आर्थिक मदत थेट त्यांच्याच हाती जावी यासाठी या योजनेवर विचार सुरू आहे. अफगाणिस्तानी लोकांसाठी पाठवलेले पैसे तालिबानीच्या हाती पडू नयेत यासाठी ही योजना आखली जात आहे.

अफगाणिस्तानला दान देऊ इच्छिणारे देश तिथल्या नागरिकांचे हाल टाळण्यासाठी आकाशातून पैसे पाठवण्यासोबतच एका ट्रस्ट फंडची निर्मितीदेखील करू शकतात. या माध्यमातून लोकांना पगार, रुग्णालय आणि शाळांना निधी दिला जाईल.

पाश्चिमात्य देशांचे काही राजदूत अफगाणिस्तानची मदत करण्याच्या प्रयत्नात आहेत. संयुक्त राष्ट्राच्या जागतिक अन्न अभियानाच्या माध्यमातून अफगाणिस्तानला १ लाख १० हजार डॉलर्सची मदत दिली जाते. ही मदत थेट रोख रकमेच्या स्वरुपात नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आहे. या पैशांचा वापर करून नागरिक थेट अन्नपदार्थ करू शकतील.

अफगाणिस्तानच्या अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठीदेखील प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी बँकेत पैसा पोहोचवला जाईल. तो संयुक्त राष्ट्राच्या संस्था आणि बिगर सरकारी संस्थांच्या कर्मचाऱ्यांचे पगार काढण्यासाठी वापरला जाईल.

अफगाणिस्तानवर तालिबाननं कब्जा केल्यापासून जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि अमेरिकन मध्यवर्ती बँकेकडून मिळणारा निधी रोखला गेला आहे. त्यामुळे अफगाणिस्तानातील लोकांची आर्थिक स्थिती दयनीय झाली आहे.