देनेवाला जब भी देता, देता छप्पर फाड के! कोरोना महामारीत सौदी अरेबियाला सापडला मोठा खजिना

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2020 01:19 PM2020-08-31T13:19:58+5:302020-08-31T13:22:21+5:30

कोरोना विषाणूच्या महामारीत सौदी अरेबियाला मोठा खजिना हाती लागला आहे. सौदी अरेबियाची सरकारी तेल कंपनी सौदी अरामको यांना किंगडमच्या उत्तर भागात तेल व वायूचे दोन नवीन साठे सापडले आहेत. सौदीचे ऊर्जामंत्री प्रिन्स अब्दुल अजीज यांनी अधिकृत प्रेस एजन्सी (एसपीए) च्या माध्यमातून रविवारी ही माहिती दिली.

अल-जऊफ भागात स्थित गॅस साठ्याचे नाव हदाबत अल-हजरा गॅस फील्ड असे ठेवले गेले आहे आणि उत्तर सीमावर्ती भागाच्या तेलाचा साठा अबरक अल तालुल असं नाव दिलं आहे. प्रिन्स अब्दुल अजीज यांनी प्रेस एजन्सी एसपीएला सांगितले की, प्रतिदिन १६ दशलक्ष घनफूट नैसर्गिक गॅस हदाबत अल-हजरा क्षेत्रातील अल सरारा जलाशयातून बाहेर पडला आहे आणि १९४४ बॅरल काढण्यात आले आहेत.

त्याच वेळी, अबरक अल-तालुलमधून दररोज सुमारे ३,१८९ बॅरेल सुपर लाइट क्रूड काढलं जात आहे. तसेच १.१ दशलक्ष घनफूट गॅस काढला जाऊ शकतो

अरामको गॅस आणि तेल क्षेत्रात आढळलेल्या तेल, वायू आणि कंडेन्सेटच्या गुणवत्तेची चाचणी सुरू करेल. प्रिन्स अब्दुल अजीज म्हणाले की, तेल आणि वायूच्या साठ्यांचे क्षेत्रफळ आणि आकार अचूकपणे शोधण्यासाठी आणखी विहीर खोदल्या जातील. देशाची भरभराट झाल्याबद्दल प्रिन्सने देवाचे आभार मानले.

सौदी अरामको ही जगातील सर्वात मोठी तेल कंपनी आहे आणि जगात दररोज तेलाच्या उत्पादनात आघाडीवर आहे. त्याची सर्वात मोठी बाजारपेठ आशिया आहे जिथे कोरोना महामारीपूर्वी ७० टक्के निर्यात केली जात होती.

व्हेनेझुएलानंतर सौदी अरेबियात सर्वाधिक खनिज तेलाचा साठा आहे. जगभरातील साठ्यांमध्ये सौदीचा वाटा १७.२ टक्के आहे. तथापि, सौदीत तेलापेक्षा गॅस साठा कमी आहे आणि जागतिक गॅस साठ्यात केवळ ३ टक्के वाटा आहे.

सौदी अरेबिया देशातील पहिला पवन उर्जा प्रकल्प उभारण्याचे काम करीत आहे. ही नवीन फील्ड सौदीच्या त्याच पवन कॉरिडोरमध्ये आहेत. सौदीच्या उत्तरेकडील भागात अल-जऊफमध्ये सकाका पॉवर प्लांट तयार केला जात आहे, ज्याची किंमत ३०२ अब्ज डॉलर आहे.

सौदी अरेबिया आपल्या महत्वाकांक्षी योजनेत उत्तर भागात नियोम नावाचं स्मार्ट शहर उभारत आहे ५०० अब्ज डॉलर्सचा खर्च त्यासाठी येणार आहे. हे शहर जॉर्डन व इजिप्तच्या सीमेला लागून असेल. या शहरात भविष्यातील अनेक महत्त्वपूर्ण उर्जा प्रकल्पांवर कामही होणार आहे. गेल्या महिन्यातच येथे ५ अब्ज डॉलर्सचा ग्रीन हायड्रोजन प्रकल्प उभारण्याची घोषणा करण्यात आली. अशा परिस्थितीत तेल आणि वायूचा साठा मिळणे ही सौदीच्या पॉवर ग्रीडसाठी दिलासा देणारी बातमी आहे. जगातील सर्वात मोठी तेल निर्यात करणार्‍या कंपनीने आपल्या देशांतर्गत गरजा पूर्ण करण्यासाठी अपारंपरिक गॅस साठ्यांच्या अंदाज घेण्याचा शोध सुरू केला आहे.

याच महिन्यात, तुर्कीला काळ्या समुद्रामध्ये उर्जेचा एका साठा आढळून आला. तुर्कीचे अध्यक्ष रेचॅप तैय्यप आर्दोवान यांनी याला तुर्कीच्या इतिहासातील सर्वात मोठा नैसर्गिक वायू शोध असल्याचं म्हटलं होतं. इस्तंबूल येथे पत्रकार परिषद घेताना अर्दोवान म्हणाले होते की, तुर्कीच्या फतेह नावाच्या ड्रिलिंग जहाजाला टूना -1 विहिरीत ३२० अब्ज घनमीटर नैसर्गिक वायूचा साठा सापडला आहे. आमचे लक्ष्य काळ्या समुद्रापासून गॅस काढणे आणि २०२३ पर्यंत त्याचा वापर करणे आहे असं ते म्हणाले होते.

अर्दोवान म्हणाले की, तुर्की पूर्वेच्या भूमध्य भागातून "आनंदाची" अपेक्षा करीत आहे. तुर्की देखील या भागात गॅस शोधत आहे.