PM मोदींची UNSC मध्ये पंचसुत्री; रशियाने मानले भारताचे आभार, व्लादिमीर पुतिन म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2021 11:45 AM2021-08-10T11:45:46+5:302021-08-10T11:51:09+5:30

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी UNSC बैठकीबाबत भारत आणि PM मोदींचे आभार मानले आहेत. काय म्हणाले पुतिन? जाणून घ्या...

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत (UNSC) सागरी सुरक्षेवरील खुल्या चर्चेच्या अध्यक्षस्थानी भूषविले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'समुद्री सुरक्षेला चालना: आंतरराष्ट्रीय सहकार्याची गरज' विषयावर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदे च्या हायलेव्हल ओपन डिबेटमध्ये भाष्य केले.

समुद्र हा आपला वारसा आहे. समुद्री मार्ग आंतरराष्ट्रीय व्यापाराची लाइफ लाइन आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे, समुद्र आपल्या पृथ्वीसाठी सर्वात महत्वाचा आहे. पण, आज आपल्या या समुद्राला अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे, असे त्यांनी यावेळी बोलताना नमूद केले. तसेच सागरी सुरक्षिततेबाबतची पंचसुत्री मांडली.

सागरी सुरक्षा सहकार्याचा जागतिक आराखडा ज्या आधारे तयार करता येऊ शकेल, अशी सागरी व्यापारातील अडथळे दूर करणे आणि वादांबाबत शांततापूर्ण तोडगा काढणे यांसह पाच तत्त्वे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विषद केली.

यावेळी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (vladimir putin) यांच्यासह अन्य देशांचे प्रतिनिधी सहभाही झाले होते. या क्षेत्रात (सागरी सुरक्षा) खरे यश मिळवण्यासाठी, सर्व इच्छुक देशांचे प्रयत्न, तसेच संयुक्त राष्ट्र आणि सुरक्षा परिषदेच्या मध्यवर्ती समन्वय भूमिकेसह आंतरराष्ट्रीय संस्था, प्रादेशिक संरचना एकत्र करणे आवश्यक आहे.

सागरी सुरक्षेमध्ये आंतरराष्ट्रीय कायदेशीर सुव्यवस्था जपण्यासाठी आणि मजबूत करण्यासाठी रशिया खूप काही करत आहे. रशिया दहशतवादविरोधी कारवाया, गुन्हेगारी प्रतिबंध, शोध आणि समुद्री क्षेत्रातील गुन्हेगारी रोखण्यासाठी आपला अनुभव सांगण्यास तयार आहे.

सार्वभौमत्वाचा आदर करणे, अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप न करणे, चर्चेद्वारे वाद मिटवणे यासारख्या संयुक्त राष्ट्रांच्या अंतर्भूत असलेल्या आंतरराष्ट्रीय कायद्याच्या मुख्य निकषांचे आणि तत्त्वांचे काटेकोर पालन रशियातर्फे करण्यात येत आहे.

ही बैठक आयोजित करण्यासाठी आमच्या भारतीय मित्रांचे आभार मानतो, आणि भारताने या महिन्यात संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या अध्यक्षांची कामे यशस्वीपणे पार पाडली पाहिजेत अशी माझी इच्छा आहे, असे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी म्हटले आहे.

दरम्यान, चाचेगिरी आणि दहशतवादासाठी समुद्री मार्गांचा दुरुपयोग होत आहे. अनेक देशांमध्ये समुद्री सीमेवरुन वाद सुरू आहे, तर हवामान बदलामुळेही या समुद्रावर मोठा परिणाम पडत आहे. आपण वैध सागरी व्यापारामधील अडथळे दूर केले पाहिजेत.

आपल्या सर्वांची समृद्धी सागरी व्यापाराच्या सक्रिय प्रवाहावर अवलंबून आहे. यामधील अडथळे संपूर्ण जागतिक अर्थव्यवस्थेसाठी आव्हान ठरू शकतात. सागरी वाद शांततेने आणि आंतरराष्ट्रीय कायद्याच्या आधारावर सोडवायला हवे.

परस्पर विश्वास आणि धैर्यासाठी हे आवश्यक आहे. जागतिक शांतता आणि स्थिरता सुनिश्चित करण्याचा हा एकमेव मार्ग आहे. आपण नैसर्गिक आपत्ती आणि समुद्री धोक्यांना सामोरे जायला हवं. भारताने या विषयावर प्रादेशिक सहकार्य वाढवण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत.

आम्ही अनेकदा चक्रीवादळ, त्सुनामी आणि प्रदूषणाशी संबंधित सागरी आपत्तींचा सामना केला आहे. सागरी पर्यावरण आणि सागरी संसाधने जपायची आहेत. आपण जबाबदार सागरी कनेक्टिव्हिटीला प्रोत्साहन दिले पाहिजे.

आपल्याला माहीत आहे की, महासागराचा वातावरणावर थेट परिणाम होतो आणि म्हणूनच आपल्याला आपले सागरी पर्यावरण प्लास्टिक आणि तेल गळतीसारख्या प्रदूषणापासून मुक्त ठेवायचे आहे. सागरी व्यापार वाढवण्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण करणे आवश्यक आहे, परंतु अशा पायाभूत प्रकल्पांच्या विकासासाठी देशांची वित्तीय स्थिरता आणि शोषण क्षमता विचारात घ्यावी लागेल, अशी ५ मूलभूत तत्त्वे PM मोदींनी यावेळी सांगितली.