पुतीन यांची गर्लफ्रेंड होती रॉ ची एजंट, संसद हल्ल्यावरील पुस्तकातून झाला धक्कादायक गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2020 05:16 PM2020-08-18T17:16:35+5:302020-08-18T17:39:55+5:30

८० च्या दशकामध्ये भारतीय गुप्तहेर संघटना रॉ ने रशियातील दोन व्यक्तींना आपले सिक्रेट एजंट बनवले होते. रॉ च्या या दोन्ही सिक्रेट एजंटचा तत्कालीन गोर्बाचेव्ह सरकारमधील परराष्टमंत्री एडवर्ड एम्ब्रोसिएविच शेवार्डनाड्झे आणि रशियाचे सध्याचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांच्याशी निकटचा संबंध होता.

आजच्या घडीला जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती म्हणून रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांचं नाव घेतलं जातं. आपल्या जीवनाच्या सुरुवीतीच्या काळात पुतीन यांनी केजीबीसाठी गुप्तहेर म्हणून काम पाहिले होते. दरम्यान, याच काळातील एका धक्कादायक घटनेचा आता गौप्यस्फोट झाला आहे.

८० च्या दशकात भारताची गुप्तहेर संघटना असलेल्या रॉ ने रशियाच्या केजीबी या गुप्तहेर संघटनेवर मोठी आघाडी घेतली होती. RAW, history of Indies covert operations या नव्या पुस्तकामधून याबाबतची माहिती समोर आली आहे. लेखक यतीश यादव यांनी या पुस्तकामधून रॉ च्या एका गुप्त मोहिमेबाबत अनेक गौप्यस्फोट या पुस्तकामधून केले आहेत.

८० च्या दशकामध्ये भारतीय गुप्तहेर संघटना रॉ ने रशियातील दोन व्यक्तींना आपले सिक्रेट एजंट बनवले होते. रॉ च्या या दोन्ही सिक्रेट एजंटचा तत्कालीन गोर्बाचेव्ह सरकारमधील परराष्टमंत्री एडवर्ड एम्ब्रोसिएविच शेवार्डनाड्झे आणि रशियाचे सध्याचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांच्याशी निकटचा संबंध होता.

या पुस्तकामध्ये यतीश यादव यांनी रॉचे एक अधिकारी अशोक खुराना (कोडनेम) यांच्याबाबत माहिती दिली आहे. खुराना यांनी सुमारे दशकभर चाललेल्या गुप्त मोहिमेसाठी रशियाच्या दोन गुप्तहेरांना तयार केले होते. मात्र या पुस्तकामध्ये कुठल्याही व्यक्तीच्या खऱ्या नावाचा उल्लेख करण्यात आलेला नाही. तर सर्वांचा कोडनेमनेच उल्लेख करण्यात आला आहे. मात्र असे असले तरी प्रस्तुत लेखकाने पुस्तकातून जे संकेत दिले आहेत. त्यामधून एक एजंट हा एडवर्ड शेवार्डनाड्झे यांचा भाऊ आणि दुसरी एजंट ही व्लादिमीर पुतीन यांनी गर्लफ्रेंड असल्याचे स्पष्ट होत आहे.

या सर्व प्रकाराची सुरुवात १९८८ मध्ये झाली होती. तेव्हा सोव्हिएट युनियनचे राष्ट्रपती मिखाइल गोर्बाचेव्ह हे भारताच्या दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यााबाबत यादव लिहितात की, या दौऱ्यादरम्यान रॉ चे अशोक खुराना यांची ओळख अलेक्झँड्रे नावाच्या व्यक्तीशी झाली. ही व्यक्ती रशियाच्या एका बड्या नेत्याचा भाऊ होता. तोही गोर्बाचेव्ह यांच्यासोबत आला होता.

काही महिन्यांनंतर अशोक खुराना यांच्या संपर्कात अलेक्झँड्रे यांच्याशिवाय अनास्तानिया कोर्किया हीसुद्धा होती. अनास्तानिया त्यावेळी एलेक्साला डेट करत होती. एलेक्सी त्यावेळी एफएसबीमध्ये उच्चपदावर काम करत होता. पुस्तकातील उल्लेखानुसार अशोक खुराना अलेक्झँड्रे आणि अनास्तानिया दोघांसोबतही संपर्कात होते.

१९८९ च्या शेवटच्या सहा महिन्यांमध्ये अलेक्झँड्रे आणि अनास्तानिया हे दोघेही रॉ चे एजंट म्हणून काम करण्यास तयार झाले होते. जून १९९० मध्ये बर्लिनची भिंत पडण्यापूर्वी काही महिने आधीच खुराना यांनी अमेरिका आणि सोव्हिएटने युनायटेड जर्मनीसाठी बनवलेला रोडमॅप तयार केला होता. त्यानंतर ऑपरेशन Azalea ला सुरुवात झाली होती.

या मोहिमेमुळे रॉ ला खूप मह्त्त्वपूर्ण आणि गुप्त माहिती मिळाली. अमेरिका-सोव्हिएटचा जर्मनी रीयूनिफिकेशनचा प्लान, अणुचाचणीबाबत रशियाची योजना, दहशतवादाविरोधातील योजना आणि रशियाचे चीन आणि पाकिस्तानबाबत धोरण यासारखी महत्त्वाची माहिती यामध्ये होती.

यादव यांनी आपल्या पुस्तकात अनास्तासिया कोर्किया या महिलेच्या ज्या बॉयफ्रेंडचा उल्लेख केला. तो एफएसबीमध्ये कुठल्यातरी मोठ्या पदावर कार्यरत होता. २००० मध्ये पदोन्नती होण्यापूर्वी तो १९९मध्ये रशियाच्या बाबींचे संचलन करत होता. हा कालावधी रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांच्या कारकीर्दीशी मिळता जुळता आहे. पुतीन हे १९९८-९९ मध्ये एफएसबीचे प्रमुख होते. १९९९ मध्ये ते रशियाचे पंतप्रधान बनले आणि २००० मध्ये त्यांनी राष्ट्रपतीपदाचा पदभार स्वीकारला होता.

रॉचे ऑपरेशन Azalea २००१ मध्ये बंद झाले. अशोक खुराना यांच्यासाठी ही मोहीम मोठ्या प्रमाणावर यश आणि अपयश अशा संमिश्र रीतीने समाप्त झाली. या पुस्तकात यादव यांनी ही मोहीम समाप्त झाल्यानंतर काही वर्षांनी खुराना आणि अलेक्झँड्रे यांच्यात २००४ मध्ये झालेल्या मुलाखतीचाही उल्लेख केला आहे.

पुस्तकातील उल्लेखानुसार अलेक्झँड्रे आले आणि त्यांनी खुराना यांची पाठ थोपटली. त्यांना पाहून मी थोडा आनंद आणि काहीसा ओशाळलो. त्यानंतर अलेक्झँड्रे यांनी माझ्या कानात सांगितले की, आपण २००१ मध्ये संसदेवर झालेला हल्ला रोखू शकलो असतो. त्यांच्या म्हणण्याचा अर्थ होता की, ते जर अजूनही रॉसाठी काम करत राहिले असते तर २००१ मध्ये भारतीय संसदेवर झालेला हल्ला रोखता आला असता.

याबाबत खुराना यांचे म्हणणे आहे की, अशा घटना आपल्याला भूतकाळात झालेल्या चुकांची आठवण करून देतात. १३ डिसेंबरला आमच्या शूर सुरक्षा कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली देताना प्रत्येकवेळी त्यांचे शब्द मला व्यथित करतात.