हत्येप्रकरणी तुरुंगवासाची शिक्षा भोगत असलेला कैदी बनला गणिततज्ज्ञ, सोडवला सर्वात कठीण प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2021 09:18 PM2021-09-05T21:18:59+5:302021-09-05T21:22:50+5:30

Jarahatke News:

हत्येच्या आरोपाखाली २५ वर्षे कारावासाची शिक्षा भोगत असलेल्या एका कैद्याने तुरुंगात राहून जी कामगिरी केली, तशी कामगिरी करणे भल्या भल्या शिक्षकांनाही शक्य झालेले नाही. या कैद्याने प्राचीन गणितामधील अशा कठीण प्रश्नाचे उत्तर शोधून काढले आहे जे उत्तर शोधण्यासाठी अनेक तज्ज्ञांना अनेक वर्षे खपवूनही यश आले नव्हते.

आश्चर्याची बाब म्हणजे खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा झालेला आरोपी ख्रिस्टोफर हेवन्सने हायस्कूलपर्यंतचेही शिक्षण घेतलेले नाही. त्यानंतरही त्याने दाखवलेले गणितामधील कौशल्य पाहून लोकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. ख्रिस्टोफर हेवन्सने तुरुंगवासाची शिक्षा भोगत असतानाच कोठडीमध्ये गणितामध्ये हे प्राविण्य मिळवले आहे.

तुम्हाला वाचून विचित्र वाटू शकते. मात्र तुरुंगामध्ये कैद्यांना पुन्हा शिक्षण घेण्यासाठी पुस्तके उपलब्ध करून दिली जातात. ती वाचून ते योग्य मार्गावर येतील, अशी अपेक्षा असते. त्याचाच फायदा घेत शिक्षा भोगत असताना हेवन्स गणितामधील एक प्राचीन गणित सोडवण्यात यशस्वी ठरला.

डीडब्ल्यू न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार ख्रिस्टोफर हेवन्सने शाळेमधूनच आपले शिक्षण सोडले होते. तसेच नोकरी न मिळाल्याने त्याला अंमली पदार्थांचे व्यसन लागले होते. हत्येच्या एका प्रकरणात दोषी ठरवण्यात आल्यानंतर गेल्या नऊ वर्षांपासून तो तुरुंगात बंद आहे. सध्या त्याचे वय ४० वर्षे एवढे आहे.

तुरुंगामध्ये शिक्षा भोगत असताना ख्रिस्टोफरने गणिताबाबत आपल्या मनात एक ओढ निर्माण केली. तसेच बेसिकपासून उच्च गणितापर्यंत प्राविण्य मिळवले. त्याला नवनवी पुस्तके वाचण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र त्यासाठी त्याने इतर कैद्यांनाही शिक्षित करावे, अशी अट त्याला घालण्यात आली आहे.

ख्रिस्टोफर हेवन्सने एनल्स ऑफ मॅथामॅटिक्सच्या काही मुद्द्यांसाठी तुरुंगामधून एका गणित प्रकाशकाला हस्तलिखित पत्र लिहिण्याचा निर्णय घेतला. तो त्या प्रश्नाचे उत्तर शोधून स्वत:ला आव्हान देऊ शकतो का, याची त्याला पडताळणी करायची होती.

मॅथामॅटिक्स सायन्स पब्लिशरच्या एका संपादकांनी त्यांच्या सहकाऱ्याला ते पत्र पाठवले आहे. ज्याने ते आपल्या वडिलांना पाठवले. त्यांनी हेवन्सच्या क्षमतेची चाचणी घेण्यासाठी एका अत्यंत कठीण प्रश्न पाठवला होता.

त्यानंतर जे काही घडले ते आश्चर्यकारक आहे. अम्बर्टोला पोस्टाच्या माध्यमातून उत्तर मिळाले. ते पत्र म्हणजे ४७ इंच लांब कागद होता. त्यावर एक लांबलचक सूत्र लिहिले होते. हेवन्सने त्या कठीण प्रश्नाचे अगदी अचून उत्तर दिले होते.