"Modi फोन उचलत नाहीत, Biden फोन करत नाहीत;" Imran Khan यांना मरियम नवाज यांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2021 12:36 PM2021-10-18T12:36:22+5:302021-10-18T12:42:34+5:30

Maryam Nawaz Imran Khan Pm Modi Joe Biden: पाकिस्तानच्या प्रमुख विरोधी पक्षाच्या नेत्या मरियम नवाज शरीफ यांनी इम्रान खान यांच्यावर साधला निशाणा.

ISI प्रमउखांच्या नियुक्तीवरून पाकिस्तान लष्कराशी भिडलेल्या पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर आता विरोधीपक्षानंही निशाणा साधला आहे. पाकिस्तानचा प्रमुख विरोधी पक्ष पीएमएलएनच्या नेत्या मरियम नवाज शरीफ यांनी ISI प्रमुखांच्या मुलाखती घेण्याच्या वृत्तांवरून इम्रान खान यांना घेरलं आहे.

परराष्ट्र धोरणांमध्ये इम्रान खान अयशस्वी ठरले असल्याचा आरोपही मरियम यांनी यावेळी केला. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी इम्रान खान यांचा फोन उचलत नाही, तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हे फोनही करत नाही. अमेरिकेतील वाहिनीवर लोकांनी इम्रान खान हे इस्लामाबादच्या मेयर पेक्षा मोठे नाहीत, अशा प्रतिक्रिया दिल्याचं म्हणत त्यांनी हल्लाबोल केला.

इम्रान खान सरकराला सत्तेतून बाहेर काढण्यासाठी जनतेनं मदत करावी असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. मरियम यांच्या जोरदार शाब्दिक हल्ल्यानंतर इम्रान खान यांची पूर्वाश्रमिची पत्नी रेहम खान यांनीदेखील टोला लगावला.

फैसलाबाद येथील धोबीघाट मैदानात झालेल्या भाषणादरम्यान मरियम यांनी इम्रान खांच्यावर हल्लाबोल केला. इम्रान खान यांनी एकच आश्वासन पूर्ण केलं आहे आणि ते म्हणजे प्रत्येक व्यक्तीला रडवण्याचं. आज संपूर्ण देश अश्रू ढाळत आहे, असंही त्या म्हणाल्या.

नुकत्याच लिक झालेल्या पँडोरा पेपर लिक प्रकरणामध्ये पाकिस्तानातील इम्रान खानयांच्या पीटीआयला पहिला क्रमांक देण्यात आल्याचा त्या म्हणाल्या. यानंतर इम्रान खान यांचं नाव त्यात नसल्याचं देशाला सांगण्यात आल्याचं त्यांनी नमूद केलं.

यावेळी मरियम यांनी भारतासोबतच्या संबंधांवरही भाष्य केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इम्रान खान यांच्या फोनला उत्तरही देत नाहीत, तर जो बायडेन यांनी आतापर्यंत आपल्या पंतप्रधानांना फोनही केला नाही. इम्रान खान सत्तेत आल्यापासून ते इस्लामाबादच्या महापौरांपेक्षा अधिक नसल्याची टीकाही अमेरिकन वाहिन्यांवर केली जात असल्याचं त्यांनी सांगितलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्याशी संवाद साधावा असे प्रयत्न सत्तेत आल्यापासून इम्रान खान यांच्याकडून सुरू आहेत. परंतु अद्यापही ते झालेलं नाही. तर जो बायडेन यांनीदेखील त्यांच्याशी संवाद साधलेला नाही.

इम्रान खान यांनी आजवर अनेकदा प्रत्यक्षरित्या यावर वक्तव्य केलं आहे. यापूर्वी तर पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मोइद युसुफ यांनी हास्यास्पद वक्तव्य करत अमेरिकेलाच थेट धमकी दिली होती. यानंतर इम्रान खान यांनी बायडेन यांना फोन करत स्पष्टीकरण दिलं होतं.

दरम्यान, आपण बायडेन यांच्या फोनची वाट पाहत नसून आपल्याकडे अन्य पर्यायही उपलब्ध आहेत अशी प्रतिक्रिया इम्रान खान यांनी युसुफ यांच्या वक्तव्यानंतर दिली होती.