...म्हणून आता भारतात गरीब जनता भूकेने मरत आहे; इम्रान खान यांचा अजब दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2020 03:38 PM2020-06-07T15:38:20+5:302020-06-07T15:57:09+5:30

कोरोना व्हायरसच्या दरम्यान लॉकडाऊन लागू करण्याबाबात पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आधीपासून विरोध करत आहे. इम्रान खान यांच म्हणणं आहे की, गरीब देशांची अर्थव्यवस्था लॉकडाऊनमुळे खराब होईल. त्यामुळे इम्रान खान यांनी पाकिस्तानात स्मार्ट लॉकडाऊनचा उल्लेख करत नवीन निर्देश जारी केले आहेत. यामध्ये अनेक उद्योगधंद्यांना परवानगी देण्यात आली आहे.

इम्रान खान यांनी कोरोनाविरूद्धच्या धोरणासंदर्भात टीव्हीच्या माध्यमातून पाकिस्तानच्या कोरोना रिलीफ टायगर फोर्सला संबोधित केले. ते म्हणाले की आता पाकिस्तानला लॉकडाऊन परवडणार नाही. यावेळी त्यांनी भारतावर भाष्यही केले.

geo.tvच्या अहवालानुसार इम्रान खान म्हणाले की, पाकिस्तान दुसर्‍या लॉकडाऊनमध्ये जाऊ शकत नाही. या कारणास्तव, कोरोनाबद्दल जनजागृती करणे महत्वाचे आहे. कोरोना रिलीफ टायगर फोर्सने लोकांकडे जाऊन कोरोनाबाबत सरकारचे नियम सांगण्याचे आदेश इम्रान खान यांनी दिले आहे.

इम्रान खान म्हणाले की, कोरोना साथीच्या आजारामुळे पाकिस्तानला यापूर्वी 800 अब्ज पाकिस्तानी रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे पुढील अर्थसंकल्पात प्रचंड कपात करावी लागू शकते, असेही त्यांनी सूचित केले आहे.

पुन्हा लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला तर, त्याचा भार गरीबांवर पडेल असं इम्रान खान यांनी सांगितले. तसेच गरीबच काय जगभरात श्रीमंत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमेरिकेतही अन्नासाठी रांगा लागत आहे, असं त्यांनी सांगितले.

कोरोनाबाधितांची संख्या रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊमुळे जगात सर्वत्र दारिद्र्य वाढले आहे. तसचे ज्या देशात आधीच मोठ्या प्रमाणात गरीबी आहे, त्याठिकाणी आता अधिक लोकांचे हाल होत असल्याचे इम्रान खान यांनी सांगितले.

भारतात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनबाबत बोलताना इम्रान खान यांनी एक अजब जावा केला आहे. भारतात पूर्ण लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. त्यामुळे भारतात गरीबी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. भारतात स्थलांतरीत कामगार, मजूर आणि अन्य लोकांचा अन्न न मिळाल्यामुळे मृत्यू होत आहे. तसेच वाहतुकीवर बंदी घातल्यामुळे रस्त्यावर चालत असताना लोकांचा बळी जात असल्याचा अजब दावा इम्रान खान यांनी केला आहे.