ताटात नाही भाकर अन् वाढतेय शस्त्रांची भूक! पाककडून एकाच महिन्यात तिसऱ्यांदा मिसाइलची चाचणी

By मोरेश्वर येरम | Published: February 11, 2021 07:45 PM2021-02-11T19:45:28+5:302021-02-11T19:57:13+5:30

Pakistan Again Test Fire Missile : पाकिस्तानची आर्थिक दिवाळखोरी ही काही लपून राहिलेली नाही. जीवनावश्यक वस्तूंची निकड पूर्ण करण्यासाठी पाकिस्तान सरकारला जगासमोर हात पसरावे लागत असताना दुसरीकडे शस्त्रांची भूक मात्र वाढतच असल्याचं दिसून येतंय.

पाकिस्तान सरकारला कोरोना लसीची गरज पूर्ण करण्यासाठी जगाकडे पदर पसरावा लागतोय पण दुसरीकडे या देशाकडून शस्त्रांची चाचणी मात्र काही केल्या थांबताना दिसत नाहीय.

पाकिस्तानने गुरुवारी आणखी एका मिसाईलची यशस्वी चाचणी केली. गेल्या तीन आठवड्यातील ही तिसरी चाचणी ठरली आहे.

जमीन आणि पाण्यातील शत्रूवर मारा करणाऱ्या ''बाबर मिसाईल'' या अत्याधुनिक मिसाईलची यशस्वी चाचणी केल्याची माहिती पाकिस्तानच्या लष्कराने दिली आहे.

अत्याधुनिक मल्टी ट्यूब परीक्षण वाहनाने ही मिसाईल डागण्यात आली. तब्बल ४५० किमी पर्यंतचं लक्ष्य भेदण्याची या मिसाइलची क्षमता असल्याचा दावा पाकिस्तानने केला आ

पाकिस्तानने याआधी ३ फेब्रुवारी रोजी २९० किमीपर्यंतची मारक क्षमता असलेल्या बॅलेस्टीक मिसाइलची चाचणी केली होती. तर त्याआधी २० जानेवारी रोजी बॅलेस्टीक मिसाईल शाहीन-३ ची चाचणी घेतली होती.

पाकिस्तानचे राष्ट्रपती आरिफ अल्वी, पंतप्रधान इमरान खान आणि ज्वाइंट चीफ ऑफ स्टाफ कमेटीचे अध्यक्ष जनरल जुबैर महमूद हयात यांनी पाकिस्तानच्या यशस्वी मिसाइल चाचणीबद्दल पाक लष्कराचं अभिनंद केलं.

एका बाजूला देशाच्या डोक्यावर कर्जाचं ओझं वाढत असताना दुसऱ्या बाजूला अशा महागड्या शस्त्र चाचण्या घेणं काही पाकिस्तान थांबवण्याचं नाव घेत नाहीय. यावरुन पाकिस्तानवर जागतिकस्तरावर जोरदार टीका केली जातेय.