Omicron Variant : कोरोनाचा हाहाकार! Delta की Omicron, कोणता व्हेरिएंट आहे सर्वाधिक घातक?; तज्ज्ञांनी दिलं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2021 04:52 PM2021-12-08T16:52:19+5:302021-12-08T17:08:07+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. डेल्टा, डेल्टा प्लसनंतर आता ओमायक्रॉनमुळे चिंतेत भर पडली आहे.

कोरोना व्हायरसने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. रुग्णांच्या संख्येने तब्बल 26 कोटींचा टप्पा पार केला असून एकूण रुग्णसंख्या ही 267,530,013 आहे. तर कोरोनामुळे आतापर्यंत 5,289,855 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

लाखो लोकांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. आतापर्यंत जगभरातील 240,978,930 जण बरे झाले आहेत. याच दरम्यान कोरोनाचा नवा व्हेरिएंट असलेल्या ओमायक्रॉनने प्रशासनाची चिंता वाढवली आहे.

वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. डेल्टा, डेल्टा प्लसनंतर आता ओमायक्रॉनमुळे चिंतेत भर पडली आहे. डेल्टा पेक्षा ओमायक्रॉन जास्त खतरनाक आहे का? याबाबत आता तज्ज्ञांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

अमेरिकेचे टॉप शास्त्रज्ञ डॉ. अँथनी फाउची यांनी ओमायक्रॉनबाबत महत्त्वाती माहिती दिली आहे. कोरोना व्हायरसचा ओमायक्रॉन व्हेरिएंट हा आधीच्या डेल्टा व्हेरिएंटच्या (Delta Variant) तुलनेत जास्त गंभीर नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

ओमायक्रॉन व्हेरिएंट वेगाने पसरत आहे परंतु सुरुवातीचे संकेत सूचित करतात की तो डेल्टा व्हेरिएंटपेक्षा कमी घातक आहे. भारतासह जगातील अनेक वैद्यकीय तज्ज्ञांनी म्हटलं आहे की जरी ओमायक्रॉन व्हेरिएंट वेगाने पसरत असला तरी तो फारसा घातक नाही.

डॉ. अँथनी फाउची यांनी रविवारी सीएनएनच्या स्टेट ऑफ द युनियन कार्यक्रमात सांगितलं की, ओमायक्रॉनच्या गांभीर्याबद्दल निष्कर्ष काढण्यापूर्वी वैज्ञानिकांना अधिक माहिती गोळा करणं आवश्यक आहे.

ओमायक्रॉन व्हेरिएंटचा पहिला रुग्ण जगात पहिल्यांदा दक्षिण आफ्रिकेत नोंदवला गेला. दक्षिण आफ्रिकेतून मिळालेल्या वृत्तात असं म्हटलं आहे, की लोकांचं रुग्णालयात दाखल होण्याचं प्रमाण वेगाने वाढलेलं नाही.

फाउची म्हणाले की, बायडन प्रशासन अनेक आफ्रिकन देशांमधून इथे येणाऱ्या इतर देशांतील नागरिकांच्या प्रवेशावर लादलेले प्रवासी निर्बंध उठवण्याचा विचार करत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

आम्हाला आशा आहे की आम्ही वेळेत बंदी उठवू शकू. केवळ दक्षिण आफ्रिकाच नाही तर इतर आफ्रिकन देशांना ज्या अडचणींचा सामना करावा लागत आहे त्याबद्दल आम्हाला खूप वाईट वाटतं असं देखील फाउची यांनी म्हटलं आहे.

कोरोना नियमावलीचं पालन करणं अत्यंत गरजेचं आहे. तसेच मास्क, सोशल डिस्टंसिंगसारख्या गोष्टी आवश्यक आहेत. निष्काळजीपण हा जीवघेणा ठरू शकतो त्यामुळे काळजी घ्या असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

हवेतून ओमायक्रॉन व्हेरिएंट पसरत असल्याचा धक्कादायक खुलासा रिपोर्टमधून करण्यात आला आहे. हाँगकाँगमधील एका हॉटेलमध्ये क्वारंटाईनमध्ये असूनही दोन रुग्णांमध्ये ओमायक्रॉनचा संसर्ग पसरला आहे. हॉटेलमध्ये समोरा-समोर खोलीत राहणाऱ्या दोन प्रवाशांना ओमायक्रॉनची लागण झाली आहे.

चिंतेची बाब म्हणजे दोन्ही प्रवाशांना कोरोना लसीचे सर्व डोस मिळाले होते. ओमायक्रॉनचा संसर्ग हवेतूनही पसरत असल्याचा यावरून दावा केला जात आहे. त्यामुळेच हाय म्युटेशन असलेल्या या व्हेरिएंटने चिंता वाढवली आहे,

जर्नल इमर्जिंग इन्फेक्शियस डिसीजमध्ये याबद्दल माहिती प्रकाशित करण्यात आली आहे. या दोन रुग्णांवर केलेल्या स्टडीनुसार, 13 नोव्हेंबरला एक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळला, त्याला कोणतीही लक्षणे दिसत नव्हती. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले.

रुग्णाला नंतर हॉटेलमध्ये वेगळे ठेवले गेले, तर दुसऱ्या रुग्णामध्ये 17 नोव्हेंबर रोजी सौम्य लक्षणे दिसली आणि तो SARS-CoV-2 पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. इमर्जिंग इन्फेक्शियस डिसीज या जर्नलमध्ये शुक्रवारी प्रकाशित झालेल्या अभ्यासात, हाँगकाँग विद्यापीठातील संशोधकांनी माहिती दिली.

सीसीटीव्ही कॅमेरा फुटेजमध्ये असे दिसून आले आहे की, दोन्ही रुग्णांनी त्यांची खोली सोडलेली नाही किंवा त्यांचा एकमेकांशी संपर्कही झालेला नाही. फक्त अन्न पदार्थ घेण्यासाठी किंवा कोरोना चाचणीसाठी दरवाजे उघडले गेले होते. त्यामुळे हा संसर्ग हवेतून पसरत असल्याचे अभ्यासातून दिसून येत आहे.