Coronavirus : 'या' देशाने रचला इतिहास; तीन महिन्यात कोरोनाला दिली मात, लोकांमध्ये जल्लोष!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2020 10:40 AM2020-06-08T10:40:46+5:302020-06-08T10:49:38+5:30

आता न्यूझीलंडमध्ये कोरोनाचा एकही रूग्ण नाही. अॅक्टिव केसेस एकही राहिलेली नाही. त्यानंतर येथील लोकांनी याचा जल्लोष सोशल मीडियातून केला.

कोरोना व्हायरसचं थैमान अजूनही थांबायचं नाव घेत नाहीये. अनेक देश अजूनही कोरोनामुळे हैराण आहेत. अशात न्यूझीलंडने इतिहास रचलाय. देशाची सीमा बंद केल्यावर तीन महिन्यांनंतर न्यूझीलंडने देशातून कोरोना व्हायरस नष्ट झाल्याची घोषणा केली आहे.

आता न्यूझीलंडमध्ये कोरोनाचा एकही रूग्ण नाही. अॅक्टिव केस एकही राहिलेली नाही. त्यानंतर येथील लोकांनी याचा जल्लोष सोशल मीडियातून केला.

सोमवारी न्यूझीलंडने शेवटचा कोरोना रूग्ण बरा झाल्याची घोषणा केली. गेल्या 17 दिवसांमध्ये या देशात कोरोनाचा एकही नवा रूग्ण समोर आलेला नाही.

न्यूझीलंडमध्ये कोरोनाच्या शेवटच्या रूग्णाचं वय 50 वर्षापेक्षा अधिक होतं. ऑकलॅंडमध्ये राहणाऱ्या महिलेमध्ये गेल्या 48 तासांमध्ये कोणतंही लक्षण दिसलं नाही. त्यानंतर सेंट मार्गारेट हॉस्पिटलने तिला घरी सोडले.

सोमवारी तीन वाजता पंतप्रधान जेसिंडा अर्डेर्न देशातील लोकांशी बोलल्या. यावेळी देशात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये काही सूट देण्याची घोषणा केली.

न्यूझीलंडचे डायरेक्ट जनरल ऑफ हेल्थ एशली ब्लूमफील्ड म्हणाले की, शेवटचा रूग्ण बरा झाल्यावर देशात आता एकही अॅक्टिव केस नाही. 28 फेब्रुवारीनंतर पहिल्यांदाच असं झालंय. ते म्हणाले की, ही बाब फार उल्लेखनीय आहे. पण कोरोनाबाबत अजूनही सतर्क राहण्याची गरज आहे.

न्यूझीलंडची लोकसंख्या साधारण 49 लाख आहे. 28 फेब्रुवारीला पहिली केस समोर आली होती. त्यानंतर न्यूझीलंडमध्ये कोरोनाच्या एकूण 1504 केसेस समोर आल्या होत्या. यातील 22 लोकांचा मृत्यू झाला होता.

Read in English