नासा या लघुग्रहावर हल्ला करणार, पृथ्वीला वाचवण्यासाठी २४ तारखेला यानाचे प्रक्षेपण होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2021 11:07 PM2021-11-22T23:07:21+5:302021-11-22T23:11:26+5:30

NASA-SpaceX Dart Mission Strike Asteroids: नासा आणि स्पेसएक्स २४ नोव्हेंबर रोजी एक असे स्पेसक्राफ्ट लॉन्च करणार आहे, जे अंतराळात दूरवर असलेल्या एका लघुग्रहाच्या चंद्रावर धडक देणार आहे.

नासा आणि स्पेसएक्स २४ नोव्हेंबर रोजी एक असे स्पेसक्राफ्ट लॉन्च करणार आहे, जे अंतराळात दूरवर असलेल्या एका लघुग्रहाच्या चंद्रावर धडक देणार आहे. या टक्करीमुळे लघुग्रहाच्या चंद्राच्या दिशेमध्ये बदल होतो की नाही हे जाणून घेण्यासाठी ही टक्कर घडवली जणारा आहे. हे यान २४ नोव्हेंबर रोजी लॉन्च होणार आहे, मात्र काही कारणाने हे प्रक्षेपण टळल्यास यानासाठी लॉन्च विंडो फेब्रुवारी २०२२ पर्यंत ठेवण्यात आला आहे.

नासाने लघुग्रहावर यानाच्या मदतीने हल्ला करण्याचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार हे यान लघुग्रहावर २४ हजार १४० किमी प्रतितास वेगाने आदळेल. त्या टक्करीमुळे लघुग्रहाच्या दिशेत बदल होतो का हे पाहिले जाईल. तसेच टक्करीच्या माध्यमातून लघुग्रहावरील वातावरण, खनिजे, धूळ आणि माती यांचा अभ्यास केला जाईल.

या मोहिमेचे नाव डबल अॅस्ट्रॉइड रीडायरेक्शन टेस्ट असे आहे. त्यासाठी कायनेटिक इम्पॅक्टर टेक्निकचा वापर केला जाणार आहे. पृथ्वीच्या दिशेने येणाऱ्या लघुग्रहांवर स्पेसक्राफ्टने हल्ला करून त्यांच्या दिशेत बदल करता यावा यासाठी हे तंत्र विकसित करण्यात आले आहे.

ज्या लघुग्रहावर नासा डार्ट लघुग्रहाच्या माध्यमातून हल्ला करणार आहे. त्याचे नाव डिडिमोस आहे. त्याचा व्यास २६०० फूट आहे, तर त्याच्या भोवती फिरणारा एक चंद्रासारखा दगडही आहे. त्याचा व्याच ५२५ फूट आहे. नासा या चंद्रासारख्या दगडाला लक्ष्य करेल. त्यानंतर त्यांच्या गतीमध्ये होणाऱ्या बदलांचे निरीक्षण पृथ्वीवरील टेलिस्कोपमधून केले जाईल.

या टक्करीमधून कायनेटिक इम्पॅक्टर टेक्निकच्या क्षमतेची माहिती मिळेल, असे नासाच्या प्लॅनेटरी डिफेन्स ऑफिसर लिंडली जॉन्सन यांनी सांगितले.

लिंडली यांनी सांगितले की, डिडिमोसपर्यंत पोहोचेपर्यंत ते वेगाने जाईल. मात्र त्याच्या चंद्राला सुमारे २४ हजार किमी प्रतितास वेगाने आदळेल. अधिक वेगाने टक्कर दिल्यास डिडिमोसला होणारी टक्कर ही नियंत्रणाबाहेर असेल. त्यामुळे आधी डार्ट स्पेसक्राफ्टची गती कमी करून त्याला आधी डिडिमोसच्या चंद्रावर आदळवले जाईल. या टक्करीमुळे चंद्राच्या गतीत थोडा जरी बदल झाला तर ते डिडिमोसरवर आदळू शकते. अंतराळात एक डिग्री आणि एक किमीच्या गतीमधील बदलही मोठा परिणाम घडवून आणू शकतो. तसेच पृथ्वीवरील संभाव्य टक्कर टाळू शकतो.

डार्ट स्पेसक्राफ्टवर लक्ष ठेवण्यासाठी इटालियन स्पेस एजन्सीचे लाईट इटालियन क्युबसेट फॉर इमेजिंग अॅस्ट्रॉई़ड पाठवले जाणार आहे. ते टक्करीवेळी अॅस्ट्रॉईड जवळून जाईल, जेणेकरून टक्करीचे फोटो घेता येतील आणि त्याचे फोटो पृथ्वीवर पाठवला येतील.

अंतराळातून पृथ्वीच्या आजूबाजूने जाणाऱ्या दगडांवर नासाकडून सातत्याने लक्ष ठेवले जाते. जर कुठलाही अश्म पृथ्वीपासून १.३ अॅस्ट्रोनॉमिकल युनिटच्या अंतरावर म्हणजेच पृथ्वी आणि सूर्याच्या सध्याच्या अंतरापेक्षा १.३ पट अधिक अंतरावर आल्यास ते नासाच्या रडारवर दिसते. नासाकडे नोंद असलेल्या नियअर अर्थ ऑब्जेक्टमधील काही लघुग्रह हे ४६० फूट व्यासापेक्षा अधिकचे आहे. असा एखादा लघुग्रह अमेरिकेवर पडल्यास तो एका संपूर्ण राज्याला नष्ट करू शकतो. तसेच तो समुद्रात पडला तर त्यामधून मोठा त्सुनामी येऊ शकतो. मात्र पृथ्वीच्या चहुबाजूंनी फिरत असलेल्या अशा ८ हजार अशनींपैकी एकही पुढच्या १०० वर्षांत पृथ्वीवर आदळणार नाही, असा विश्वास नासाने व्यक्त केला आहे.