संतापजनक! वडिलांची गळाभेट घेण्यासाठी चिमुकली धावली, मागून पोलिसाने गोळी झाडली

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2021 03:35 PM2021-03-25T15:35:39+5:302021-03-25T15:40:47+5:30

Myanmar coup shot seven year old girl : म्यानमारमध्ये लष्कराने सत्तापालट केल्याने तिथे लष्कराविरोधात आंदोलने सुरू आहेत. या आंदोलनादरम्यान, सैन्याकडून केल्या जाणाऱ्या गोळीबारात अनेक आंदोलकांचा मृत्यू झाला आहे. मात्र काल या आंदोलनात जे काही झाले त्यामुळे संपूर्ण जग हादरले आहे.

म्यानमारमध्ये लष्कराने सत्तापालट केल्याने तिथे लष्कराविरोधात आंदोलने सुरू आहेत. या आंदोलनादरम्यान, सैन्याकडून केल्या जाणाऱ्या गोळीबारात अनेक आंदोलकांचा मृत्यू झाला आहे. मात्र काल या आंदोलनात जे काही झाले त्यामुळे संपूर्ण जग हादरले आहे. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एका सात वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. ही मुलगी तिच्या वडिलांना आलिंगण देण्यासाठी धावली असतानाच पोलिसांनी तिच्यावर गोळी झाडली. या गोळीबारात तिचा मृत्यू झाला.

बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार गेल्या महिन्यात म्यानमारमध्ये झालेल्या सत्तापालटानंतर सुरू झालेल्या आंदोलनात प्राण गमावणाऱ्यांमधील ही सर्वात कमी वयाची पीडिता ठरली आहे. खिन मायो चित असे या मुलीचे नाव असून, माइन शहरात राहणाऱ्या तिच्या कुटुंबीयांनी सांगितले की, पोलिसांना घरावर धाड घातली तेव्हा ही मुलगी तिच्या वडलांच्या दिशेने धावली. मात्र त्याचवेळी पोलिसांनी तिच्या दिशेने गोळी झाडत तिची हत्या केली. लष्कराने सत्तांतर केल्यापासून म्यानमारमध्ये तीव्र आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे लष्करानेही बळाचा वापर वाढवला आहे.

या घटनेबाबत राइट्स ग्रुप सेव्ह द चिल्ड्रन्सने सांगितले की, सत्तांतर झाल्यानंतर सुरू झालेल्या आंदोलनादरम्यान आतापर्यंत २० हून अधिक मुलांचा मृत्यू झाला आहे. तर या आंदोलनामध्ये आतापर्यंत १६४ लोक मारले गेले आहेत. तर असिस्टंट असोसिएशन फॉर पॉलिटिकल प्रिजनर्स अॅक्टिव्हिस्ट ग्रुपच्या दाव्यानुसार म्यानमारमध्ये सुरू असलेल्या आंदोलनात आतापर्यंत २६१ जणांचा मृत्यू झाला आहे.

दुसरीकडे लष्कराने मंगळवारी झालेल्या आंदोलकांच्या मृत्यूबाबत दु:ख व्यक्त केले आहे. तसेच देशात माजलेले अराजक आणि हिंसाचारासाठी आंदोलकांनाच दोषी ठरवले आहे. मात्र लष्कराच्या दाव्यांच्या उलट स्थानिक माध्यमांनी सुरक्षा दलांनी आंदोलकावर गोळीबाराच्या अनेक फैरी झाडल्याचा आरोप केला आहे. तसेच आंदोलकांना मारहाण करण्यात आली आणि अनेकांच्या घरांवर धाड टाकून अटकसत्र राबवण्यात आले, असा आरोप केला आहे.

खिन मायो चितच्या मोठ्या बहीणीने सांगितले की, पोलीस अधिकारी मंगळवारी दुपारी मंडलामध्ये शेजारील घरांची झडती घेत होते. त्यानंतर अखेरीस ते आमच्या घरात घुसले. त्यांनी दरवाजा उघडण्यासाठी दरवाजावर लाथ मारली. त्यांनी माझ्या वडिलांना घरात अजून कुणी लोक आहेत का अशी विचारणा केली. वडिलांनी नाही म्हटले तेव्हा त्यांनी ते खोटे बोलत असल्याचा आरोप केला. तसेच घरात शोध सूरू केला. याचवेळी खिन मायो चित ही वडिलांच्या जवळ येण्यासाठी धावली. तेव्हा पोलिसांनी तिच्यावर गोळी झाडली.