मशरूमच्या आकाराचा ढग दिसला, लोकांना वाटलं अणुबॉम्ब फुटला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2020 07:47 PM2020-06-23T19:47:23+5:302020-06-23T20:36:40+5:30

लोकांना आकाशामध्ये विशालकाय मशरूमच्या आकाराचा ढग दिसला. हा ढग म्हणजे अणुबॉम्बच्या स्फोटामुळे तयार झाला असावा, अशी भीती लोकांना वाटली. त्यामुळे संपूर्ण शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.

सध्या जगात अण्वस्रसंपन्न् देशांची संख्या वाढलेली असल्याने संपूर्ण जगावरच अणुयुद्धाची टांगती तलवार नेहमीच असते. तसेच विविध ठिकाणी अणऊर्जानिर्मितीसाठी वापर होत असल्याने अपघाताची भीती असते.

दरम्यान, यापूर्वी झालेल्या अणुदुर्घटनांमुळे अणुबॉम्बच्या स्फोटाची भीती लोकांच्या मनात तयार झालेली आहे. तसेच विविध व्हिडिओ आणि चित्रपटांमधील दृष्यावरून अणुस्फोटाचे एक कल्पनाचित्र लोकांच्या मनात तयार झाले आहे. अणुबॉम्बबाबतच्या या भीतीमुळे एका शहरात धक्कादायक प्रकार घडला आहे.

युरोपमधील युक्रेन या देशाची राजधानी असलेल्या किव्ह येथे लोकांना आकाशामध्ये विशालकाय मशरूमच्या आकाराचा ढग दिसला. हा ढग म्हणजे अणुबॉम्बच्या स्फोटामुळे तयार झाला असावा, अशी भीती लोकांना वाटली. त्यामुळे संपूर्ण शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. अखेरीस प्रशासनामधील अधिकाऱ्यांनी हा ढग अणुस्फोटांमुळे नव्हे तर नैसर्गिकरीत्या तयार झालेला ढग आहे, असे सांगत लोकांच्या मनातील भीती कमी केली.

मात्र अधिकाऱ्यांनी या घटनेबाबत स्पष्टीकरण देण्यापूर्वीच लोकांनी या ढगाचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केले होते. अखेरीस युक्रेनच्या स्टेट एमर्जंसी सर्व्हिसनेदेखील हा फोटो शेअर केला आणि त्याखाली जे घाबरले आहेत, त्यांनी कबूल करावे, अशी कॅप्शन दिली.

रशियातील चेर्नोबिल येथे १९६८ मध्ये झालेल्या अणुदुर्घटनेवेळी अशाच मशरूमच्या आकाराचा ढग ६० किमी अंतरावर दिसला होता. त्या अपघातात सुमारे १०० जणांचा मृत्यू झाला होता. तर त्यावेळी झालेल्या किरणोत्साराचा प्रभाव दीर्घकाळापर्यंत दिसत होता. त्यामुळे या भागात राहणाऱ्या लोकांचे आयुर्मानही घटले होते.

दरम्यान, या नैसर्गिक घटनेबाबत अधिकाऱ्यांनी सांगितले की, किव्ह, ओब्लास्ट, टेरनोपिल ओब्लास्ट आणि विन्नित्साच्यावर ढग दिसून आले एनविल क्लाऊडचे शास्रीय नाव क्यु्म्यलोनिम्बस इनकस आहे. वेगवान हवेमुळे जेव्हा पाण्याची वाफ वरच्या दिशेने घेऊन जाते, तेव्हा अशा प्रकारचा ढग बनतो.

बहुतांश वेळा असा ढग हा आवळ्याच्या आकाराचा दिसतो. मात्र जेव्हा ढग संघटित रूपात बनतो तेव्हा तो मशरूमसारखा दिसतो. अशा ढगांमध्ये वीज निर्माण करण्याची क्षमता असते. तसेच ते वावटळ आणि गारपीटीसाठी कारणीभूत ठरू शकतात.