Monkeypox Virus: कोरोनानंतर 'मंकीपॉक्स व्हायरस'ने वाढवली चिंता; WHO ने बोलाववी तातडीची बैठक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2022 07:46 PM2022-05-20T19:46:16+5:302022-05-20T19:49:49+5:30

Monkeypox Virus: मे महिन्याच्या सुरुवातीला ब्रिटेन, स्पेन, बेल्जियम, इटली, ऑस्ट्रेलिया आणि कॅनडासह अनेक देशात या विषाणूचे रुग्ण आढळले आहेत.

Monkeypox Virus: कोरोनानंतर आता काही देशांमध्ये मंकीपॉक्स विषाणूच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचे आढळून आले आहे. या वाढत्या रुग्णांमुळे इतर देशांची चिंता वाढली आहे. दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) या विषयावर चर्चा करण्यासाठी तातडीची बैठक बोलावली आहे.

रशियन मीडियाने ही माहिती दिली आहे. या व्हायरसच्या प्रसाराची कारणे आणि माध्यमांवर चर्चा करणे हा या बैठकीचा मुख्य अजेंडा असेल. एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, समलैंगिक लोकांमध्ये हा विषाणू पसरण्याचा धोका जास्त आहे.

रशियाच्या स्पुतनिक वृत्तसंस्थेने शुक्रवारी ही माहिती दिली. मे महिन्याच्या सुरुवातीला ब्रिटन, स्पेन, बेल्जियम, इटली, ऑस्ट्रेलिया आणि कॅनडासह अनेक देशांमध्ये मंकीपॉक्स विषाणूची प्रकरणे आढळून आली.

यूके हेल्थ एजन्सीने 7 मे रोजी इंग्लंडमध्ये मंकीपॉक्स विषाणूच्या पहिल्या प्रकरणाची पुष्टी केली. बाधित रुग्ण नायजेरियातून परतला होता. तर, 18 मे रोजी कॅनडाहून आलेल्या एका व्यक्तीला अमेरिकेत या विषाणूची लागण झाली होती.

शास्त्रज्ञांच्या मते मंकीपॉक्स चेचक विषाणूंच्या कुटुंबाशी संबंधित आहे. हा फारसा गंभीर नसला तरी काळजी घेण्याची गरज आहे. त्याच्या सुरुवातीच्या लक्षणांमध्ये ताप, डोकेदुखी, सूज, पाठदुखी, स्नायू दुखणे आणि सामान्य सुस्ती यांचा समावेश आहे.

एकदा ताप आला की संपूर्ण शरीरावर पुरळ उठू शकते. हे पुरळ अनेकदा चेहऱ्यावर सुरू होतात, नंतर शरीराच्या इतर भागात पसरतात. सहसा हाताचे तळवे आणि पायांच्या तळव्यावर. संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आल्याने मंकीपॉक्स होऊ शकतो.

हा विषाणू त्वचा, श्वसनमार्ग किंवा डोळे, नाक किंवा तोंडातून शरीरात प्रवेश करू शकतो. माकडे, उंदीर आणि खारुताई यांसारख्या संक्रमित प्राण्यांच्या संपर्कात आल्याने किंवा व्हायरसने दूषित झालेल्या वस्तू, जसे की गादी आणि कपडे यांच्या संपर्कातूनही त्याचा प्रसार होऊ शकतो.