Republic Barbados: ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून तब्बल ४०० वर्षांनी ‘या’ देशाला मिळाले स्वातंत्र्य; महिलेच्या हाती राष्ट्राची धुरा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2021 06:52 PM2021-11-30T18:52:39+5:302021-11-30T18:59:26+5:30

Republic Barbados: स्वातंत्र्य मिळाल्यानंतर बार्बाडोसच्या हजारो नागरिकांनी राजधानीतील चेंबरलिन ब्रिजवर मध्यरात्री प्रचंड मोठा आनंदोत्सव साजरा केला.

ब्रिटिशांच्या गुलामगिरीच्या विळख्यातून तब्बल ४०० वर्षांनी एक देश स्वतंत्र झाला असून, विशेष म्हणजे नव्या राष्ट्राची धुरा चक्क एका महिलेच्या हाती देण्यात आली आहे. ब्रिटनची सत्ता उलथवून टाकत आणि ब्रिटनची महाराणी एलिजाबेथ यांना 'राष्ट्राध्यक्ष' पदावरून हटवत या देशाने स्वत:ला प्रजासत्ताक देश म्हणून घोषित केले आहे.

कॅरेबियान देश असलेल्या या देशाचे नाव बार्बाडोस आहे. ब्रिटनचे पहिले जहाज दाखल झाल्यानंतर तब्बल ४०० वर्षांनी बार्बाडोस या देशाने आपले वसाहतवादी संबंधही तोडले आहेत. वसाहतवादातून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, बार्बाडोसच्या हजारो नागरिकांनी राजधानी स्थित चेंबरलिन ब्रिजवर मध्यरात्री आनंदोत्सव साजरा केला.

बार्बाडोस देश स्वतंत्र झाल्यानंतर २१ तोफांची सलामी देऊन नागरिकांनी आपला आनंद व्यक्त केला. प्रचंड समुदायाने भरलेल्या हिरोज स्क्वेअरमध्ये देशाचे राष्ट्रगीत निनादले.

बार्बाडोसच्या नागरिकांनी परंपरागत नृत्य आणि संगीत वाजवत आपले स्वातंत्र्य साजरे केले. या कार्यक्रमाला बार्बाडियन गायिका रिहाना हिला 'राष्ट्र नायिका' म्हणून घोषित करण्यात आले.

विशेष बाब म्हणजे स्वतंत्र बार्बाडोस या उत्सव सोहळ्यात ब्रिटनचे राजकुमार चार्ल्स उपस्थित राहिले होते. बार्बाडोसच्या राष्ट्रगीताला प्रिन्स चार्ल्स यांनीही उभे राहून मान दिला. या संवैधानिक बदलानंतरही ब्रिटन आणि बार्बाडोसचे संबंध कायम राहतील, असा विश्वास प्रिन्स चार्ल्स यांनी व्यक्त केला आहे.

स्वतंत्र बार्बाडोसच्या पहिल्याच राष्ट्राध्यक्षपदाची जबाबदारी एका महिलेच्या हाती सोपवलीय. सांद्रा मसोन यांनी देशाच्या पहिल्या राष्ट्राध्यक्ष म्हणून जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली असून, गेल्या आठवड्यात संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीत मसोन यांची निवड करण्यात आली होती.

भूतकाळ मागे सोडण्याची आता वेळ आली आहे, अशी पहिली प्रतिक्रिया पहिल्या राष्ट्राध्यक्ष सांद्रा मसोन यांनी दिली. देशाच्या व्यक्तीनेच बार्बाडोसची धुरा सांभाळावी, अशी इच्छा स्थानिकांकडून व्यक्त करण्यात आली होती, असे त्या म्हणाल्या.

हा क्षण व्यावहारिकऐवजी अत्यंत भावूक करणारा ऐतिहासिक, सांकेतिक निर्णय आहे, अशी प्रतिक्रिया 'अलजजीरा'च्या लॅटिन अमेरिका एडिटर न्युमैन यांनी बार्बाडोसच्या स्वातंत्र्यावर दिली आहे.

बार्बाडोसचे स्वातंत्र्य हा अजूनही ब्रिटिशांच्या वसाहतवादी वर्चस्वाखाली वावरणाऱ्या देशांसाठी प्रेरणादायक ठरू शकतो. ज्या देशांत अद्यापही ब्रिटनची महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांची सत्ता आहे, ते देशही यापुढे ब्रिटिश सत्ता नाकारण्याची शक्यता निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे.

ब्रिटनची महाराणी एलिजाबेथ द्वितीय अद्याप १५ देशांच्या राष्ट्राध्यक्ष आहेत. यामध्ये युनायटेड किंगडम शिवाय ऑस्ट्रेलिया, कॅनडा आणि जमैका यांचाही समावेश आहे. बार्बाडोसने महाराणी एलिझाबेथ यांना राष्ट्राध्यक्ष पदावरून हटवत एक नवी सुरुवात केली आहे.