अमेरिकेत Modernaच्या कोरोना लसीला मंजुरी मिळण्याची शक्यता; "इतकी" असणार किंमत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2020 04:57 PM2020-12-16T16:57:38+5:302020-12-16T17:07:08+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोना लसीवर संशोधन सुरू असून लसीसंदर्भात महत्त्वाची माहिती समोर येत आहे.

जगभरातील कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. अमेरिकेत ही कोरोनाचा विस्फोट झाला आहे. जगभरातील सर्वाधिक रुग्णांची आणि मृतांची संख्या हे अमेरिकेत आहे.

कोरोनामुळे महासत्ता असणारी अमेरिका हतबल झाली आहे. लाखो लोकांना आतापर्यंत आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोना लसीवर संशोधन सुरू असून लसीसंदर्भात महत्त्वाची माहिती समोर येत आहे.

ब्रिटननंतर आता अमेरिकेनेही अमेरिकन कंपनी फायझर आणि जर्मन फार्मा कंपनी बायोएनटेकद्वारे विकसित करण्यात येत असलेल्या कोरोना लसीच्या आपत्कालीन वापरास परवानगी दिली आहे.

अमेरिकेने कोरोनावरील लस तयार करणारी कंपनी मॉडर्नाकडूनही 100 दशलक्ष डोस विकत घेण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, शुक्रवारी अमेरिकन सरकारच्या सल्लागार समितीने फायझरच्या कोरोना लसीच्या आपत्कालीन वापरास परवानगी दिली.

फायझरनंतर आता अमेरिकेत आणखी एका लसीला परवानगी मिळण्याची दाट शक्यता आहे. मॉडर्नाने विकसित केलेली लस वापरण्यास परवानगी मिळणार असल्याची माहिती मिळत आहे.

शुक्रवारी अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाच्या (FDA) बैठकीत याबाबत निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मॉडर्ना कंपनीने करोनाला अटकाव करणारी लस विकसित केली आहे.

कोरोनाविरोधात लढण्यास लस सुरक्षित आणि सक्षम असल्याचा दावा करण्यात आला आहे. मॉडर्नाने जवळपास 30 हजार स्वयंसेवकांवर लस चाचणी केली होती. चाचणीत 94.1 टक्के लस प्रभावी असल्याचे दिसून आले आहे.

कोरोना लस दिल्यानंतर मात्र काही जणांना त्रास झाल्याचे दिसून आले. यामध्ये सौम्य स्वरुपाचा ताप येणे, डोकेदुखी आणि थकवा जाणवणे आदी लक्षणे आढळून आली.

लसीच्या साईडइफेक्टमुळे चिंता करण्याची आवश्यकता नसल्याचं शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे. कोरोना लसीला मंजुरी मिळाल्यानंतर अमेरिकेत लसीकरण सुरू करण्यात येईल.

मॉडर्ना कंपनीचे सीईओ स्टीफन बॅसेंल यांनी सर्व प्रक्रिया सुरळीतपणे पार पडल्यास आणि लसीला मंजुरी दिल्यास 21 डिसेंबरपासून लस बाजारात उपलब्ध होईल असं म्हटलं आहे.

लस चाचणी दरम्यान सर्व प्रकारचे शास्त्रीय निकषांचे पालन करण्यात आल्याचा दावा कंपनीने केला आहे. फायजरच्या लसीप्रमाणे मॉडर्नाच्या लशींनाही अतिशय कमी तापमानात ठेवावे लागते.

मॉडर्नाच्या लसीची किंमत ही 32 ते 37 डॉलर प्रति डोस असण्याची शक्यता आहे. लसीची मागणी वाढल्यास किंमती आणखी कमी होण्याची शक्यता आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

सध्या फायझरच्या लसीला मिळालेली परवानगी ही अंतरिम परवानगी आहे. कंपनीला अमेरिकेत लसीची विक्री करण्यासाठी आणखी एकदा अर्ज करावा लागणार आहे. या लसीमुळे सध्या जो फायदा होणार आहे तो या लसीच्या संभावित दुष्परिणामांपेक्षा अधिक आहे.

फायझरच्या लसीच्या आपत्कालीन परिस्थितीतील वापरास ब्रिटन, कॅनडा, बहरिन आणि सौदी अरेबियाने मंजुरी दिली होती. भारतातही यासाठी कंपनीने परवानगी मागितली आहे.