जपानमध्ये पुन्हा 'प्रलय'; ७.६ रिश्टरचा हाहाकार, इशिकावा किनारपट्टीवर त्सुनामीच्या लाटांची भीती, भूकंपाने रस्ते खचले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 23:30 IST2025-12-09T23:22:15+5:302025-12-09T23:30:58+5:30

Japan Earthquake: जपानमध्ये पुन्हा एकदा शक्तिशाली भूकंप झाला असून, त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे.

जपानची भूमी पुन्हा एकदा भूकंपाच्या जोरदार धक्क्याने हादरली आहे. जपानच्या उत्तरेकडील किनाऱ्यापासून दूर समुद्रात सोमवारी शक्तिशाली भूकंप झाला, ज्यामुळे अनेक शहरांमध्ये तीव्र झटके जाणवले.

जपान हवामान विज्ञान एजन्सीने या भूकंपाची तीव्रता ७.६ रिश्टर स्केल इतकी नोंदवली आहे. भूकंपानंतर जपानच्या ईशान्येकडील किनारपट्टीसाठी त्सुनामीची तातडीची धोक्याची सूचना जारी करण्यात आली आहे.

भूकंपाचा केंद्रबिंदू समुद्राच्या आत असल्यामुळे त्सुनामीचा धोका लक्षणीय वाढला आहे. जेएमएने दिलेल्या माहितीनुसार, त्सुनामीच्या लाटांची उंची १० फुटांपर्यंत वाढू शकते. इशिकावा प्रांत आणि त्याच्या आसपासच्या भागांना त्सुनामीचा सर्वाधिक धोका असल्याचे हवामान विज्ञान एजन्सीने स्पष्ट केले आहे.

काही वर्षांपूर्वी याच भागात मोठी त्सुनामी आल्यामुळे प्रशासनाने नागरिकांना त्वरित सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आवाहन केले आहे. या भूकंपाचे धक्के इतके तीव्र होते की, त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले आहेत.

भूकंपाच्या जोरदार धक्क्यांमुळे जपानमधील रस्त्यांचा काही भाग पूर्णपणे तुटून आणि नुकसाग्रस्त झालेला दिसत आहे. दुकानांमध्ये आणि घरांमध्ये ठेवलेले टीव्ही, पंखे आणि इतर वस्तू वेगाने हलू लागल्या आणि खाली पडल्या.

अनेक दुकानांची अवस्था खूपच वाईट झाली असून, भिंती आणि सामान तुटलेले दिसत आहे. अनेक लोक त्यांच्या घरातील सामान वाचवण्याचा प्रयत्न करताना कॅमेरात कैद झाले आहेत.

प्रशासनाने नागरिकांना किनारी भागापासून दूर राहण्याचे आणि सुरक्षित उंच ठिकाणी आश्रय घेण्याचे निर्देश दिले आहेत. या भूकंपाने झालेल्या नुकसानीचा आणि संभाव्य त्सुनामीच्या धोक्याचा अंदाज घेत जपानमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.