Mango: हापूस, केशर नाही तर हा आहे जगातील सर्वात महागडा आंबा, अशी आहेत खास वैशिष्ट्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2021 04:22 PM2021-06-13T16:22:53+5:302021-06-13T16:28:10+5:30

Mango: मान्सूनच्या सुरुवातीसोबतच आता आंब्यांचा हंगाम जवळपास संपत आला आहे. भारतामध्ये सर्वात महागडे आंबे म्हणून हापूस आणि केशर या आंब्यांचा उल्लेख केला जातो. दरम्यान, सध्या जगात असा कुठला आंबा आहे जो सर्वाधिक चविष्ट आणि महागडा आहे याची चर्चा सुरू आहे.

मान्सूनच्या सुरुवातीसोबतच आता आंब्यांचा हंगाम जवळपास संपत आला आहे. भारतामध्ये सर्वात महागडे आंबे म्हणून हापूस आणि केशर या आंब्यांचा उल्लेख केला जातो. दरम्यान, सध्या जगात असा कुठला आंबा आहे जो सर्वाधिक चविष्ट आणि महागडा आहे याची चर्चा सुरू आहे.

भारताचा विचार केल्यास भारतात हापूस आंबा हा सर्वात महाग समजला जातो. सुमारे ३०० ग्रॅमपर्यंत वजन असलेले हापूसचे फळ हे खूप सुगंधी आणि चविष्ट असते. त्यामुळे हापूस आंब्याला जीआय टॅगसुद्धा मिळाला आहे. हापूसला आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी मागणी असते. गेल्या हाही वर्षांत यूरोप आणि जपानबरोबरच अमेरिका आणि ऑस्ट्रेलियातही हापूसला असलेली मागणी वाढली आहे.

बाजारात हापूसचा दर इतर आंब्यांच्या तुलनेत अधिक असला तरी जागतिक पातळीवर हापूस हा जगातील सर्वात महागडा आंबा नाही. हे वाचून तुम्हाला धक्का बसेल, पण हे खरे आहे. जगातील सर्वात महागड्या आंब्याचा मान हा जपानमधील आंब्याच्या एका प्रजातीला मिळालेला आहे.

ताईयो नो तामागो (taiyo no tamago) नावाचा हा आंबा जगातील सर्वात महाग आंबा समजला जातो.

जपानमधील मियाजारी प्रांतात या आंब्याची पैदास होते. या आंब्यामध्ये गोडव्याबरोबरच अननस आमि नारळाची हलकी चव असते. या आंब्याची देखभाल खास पद्धतीने केली जाते. आंब्याला एक एक फळ येताच ही फळे जाळीदार कपड्याने बांधली जातात. फळावर पूर्णपणे उन पडेल, अशा पद्धतीने ही बांधणी होते.

या आंब्याच्या वास आणि चवीप्रमाणे त्याची किंमतही बऱ्यापैकी चढी असते. हा आंबा मार्केटमध्ये फळांच्या दुकानांत मिळत नाही. तर हा आंबा खरेदी करण्यासाठी बोली लावली जाते. लिलावात सर्वाधिक बोली लावणाऱ्याला हा आंबा मिळतो. २०१७ मध्ये या प्रकारचे दोन आंबे तब्बल २ लाख ७२ हजार रुपये किमतीला विकले गेले होते.

ताईयो नो तामागो आंब्याला जपानी कल्चरमध्ये खूप मान्यता मिळालेली आहे. या आंब्याला एग ऑफ द सन असेही म्हणतात, कारण हा आंबा सूर्याच्या उजेडात तयार होतो. तसेच लोक हा आंबा भेट म्हणून एकमेकांना देतात. ही भेट घेणाऱ्याचे नशीब सूर्याप्रमाणे उजळते. त्यामुळे जपानमध्ये सण किंवा खास प्रसंगी हा आंबा दिला जातो. मात्र भेट म्हणून हा आंबा स्वीकारणारे तो आंबा खात नाहीत तर संरक्षित करून सजवून ठेवतात.

जपानी आंब्याची ही प्रजाती आतापर्यंत तिथेच तयार होत होती. मात्र आता याबाबत वेगवेगळ्या बातम्या समोर येत आहेत. मध्य प्रदेशमधील जबलपूर येथे अशा प्रकारच्या आंब्याची शेती होत असल्याचे सांगण्यात येत आहे.