स्पर्म डोनेट करून 'हा' व्यक्ती बनला 1000 मुलांचा पिता!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2021 02:28 PM2021-06-14T14:28:54+5:302021-06-14T14:39:19+5:30

अमेरिकेत राहणाऱ्या एका महिलेने स्पर्म (शुक्राणू)डोनेशनमुळे जन्मलेल्या आपल्या 63 भावंडांचा शोध घेतला होता, अशी काही दिवसांपूर्वी एक बातमी आली होती. याचबरोबर, अभिनेता आयुष्मान खुराना याच्या विकी डोनर या चित्रपटाद्वारे स्पर्म डोनेशनच्या संकल्पनेविषयी बर्‍याच लोकांना माहिती झाली.

दरम्यान, जवळपास 8 दशकांपूर्वी एका व्यक्तीने स्पर्म डोनेशनच्या मदतीने 1000 मुलांना जन्म दिला होता. हफिंग्टनपोस्टच्या अहवालानुसार, 1940 च्या दशकात डॉ. बर्टोल्ड वाइजनर यांनी त्यांची पत्नी डॉ. मेरी बार्टन यांच्यासोबत मिळून एक फर्टीलिटी क्लिनिक सुरू केले होते.

बार्टन क्लिनिक असे या क्लिनिकचे नाव होते. लंडनमधील या क्लिनिकला बर्‍याच वादाचा सामना करावा लागला. दरम्यान, या क्लिनिकमध्ये अशी घोषणा केली गेली की, या क्लिनिकमध्ये केवळ अत्यंत हुशार लोकांना स्पर्म डोनर म्हणून स्वीकारले जाईल.

या क्लिनिकमध्ये बहुतेक उच्च मध्यमवर्गीय आणि उच्चवर्गातील व्यक्तींना डोनर बनविले जात होते. यामुळे हे क्लिनिक बरेच वादात सापडले होते. मॅरी बॉर्टन यांनी 1959 मध्ये एका मुलाखतीत सांगितले होते की, आम्ही केवळ डोनर्स घेतो जे सरासरीपेक्षा बुद्धिमान आहेत. तुम्ही एखाद्या मुलाला जन्म देण्यासाठी जात आहात, अर्थात ही मोठी जबाबदारी आहे आणि यासाठी कोणत्याही व्यक्तीचे प्रमाण सामान्यापेक्षा चांगले असले पाहिजे.

दरम्यान, या क्लिनिकसंदर्भातील वादांची मालिका थांबली नाही आणि बरेच लोक हे क्लिनिक बंद करण्याची मागणी करू लागले. त्यामुळे या जोडप्याच्या शैक्षणिक वर्तुळात उपस्थित फक्त जवळचे मित्र स्पर्म डोनर बनू लागले.

वादाच्या भोवऱ्यात असूनही, या क्लिनिकमुळे लोकांमध्ये चांगलीच लोकप्रियता वाढली आणि डोनर्सची मागणी लक्षणीय वाढत होती. त्यानंतरच डॉक्टर बर्टोल्ड वाइजनर यांनी निर्णय घेतला की, ते स्वतः स्पर्म डोनेशनसाठी आपले नमुने देतील.

दरम्यान, डॉक्टर बर्टोल्ड वाइजनर यांच्या पत्नीला याबद्दल काहीही माहिती नव्हती. 2001 मध्ये हे उघडकीस आले होते की, या क्लिनिकशी संबंधित न्यूरो केमिस्ट आणि डॉक्टर बर्टोल्ड वाइजनर यांचे दोस्त डेरेक रिचटरने कमीत कमी 100 मुलांसाठी स्पर्म डोनेट केले होते.

संडे टाईम्सच्या अहवालानुसार, सन 2007 मध्ये 18 जणांची डीएनए टेस्ट्स घेण्यात आली होती. ज्यामध्ये असे दिसून आले की 1943 पासून ते 1962 पर्यंत या क्लिनिकच्या स्पर्म डोनेशनपासून जन्मलेल्या मुलांपैकी एक तृतीयांश मुले ही डॉक्टर बर्टोल्ड वाइजनर यांची होती.

डॉक्यूमेंटरी फिल्ममेकर बॅरी स्टीव्हन्स आणि बॅरिस्टर डेव्हिड गोलांज यांचा असा दावा आहे की, डॉक्टर बर्टोल्ड वाइजनर यांनी 600 ते हजार मुलांना जन्म देण्यासाठी स्पर्म डोनेट केले होते. खरंतर, बॅरी आणि डेव्हिड यांना हे समजले होते की त्यांचे बायोलॉजिकल वडील डॉक्टर बर्टोल्ड वाइजनर आहेत. त्यानंतर त्यांनी हा तपास सुरू केला.

संडे टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत बॅरी यांनी म्हटले होते की, त्यांच्याबद्दल संशोधन केल्यावर मी असे म्हणू शकतो की, ते दरवर्षी किमान 20 वेळा स्पर्म डोनेशन करत होते. तर स्टीव्हन्स यांना आपल्या संशोधनात आढळले की बार्टन यांनी सुमारे 1000 मुलांसाठी नमुने दिले होते.

डॉक्टर बार्टन यांच्या मृत्यू 1972 मध्ये झाला होता. अहवालानुसार, त्यांनी आपल्या क्लिनिकची सर्व वैद्यकीय नोंदी नष्ट केली. यामुळे, संशोधकांना त्यांच्या वास्तविक मुलांची संख्या शोधणे खूप आव्हानात्मक आहे.