भारताशी पंगा घेणाऱ्या नेपाळच्या पंतप्रधानांचा पगार किती? आकडा वाचून हैराण व्हाल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2020 09:32 AM2020-06-30T09:32:55+5:302020-06-30T09:38:55+5:30

भारत आणि नेपाळचे संबंध अतिशय जुने आहेत. मात्र नेपाळकडून सध्या सुरू असलेलं राजकारण आणि चीनच्या पाठिंब्यामुळे त्यांच्याकडून सुरू असलेल्या कुरघोड्या पाहता हे संबंध अतिशय बिघडले आहेत.

बऱ्याच वस्तूंसाठी भारतावर अवलंबून असलेल्या नेपाळनं थेट भारताच्या भूभागांवर दावा सांगितला आहे. हा दावा अधिक मजबूत करण्यासाठी नेपाळ सरकारनं नवा नकाशा प्रसिद्ध केला आणि त्याला संसदेची मंजुरीदेखील मिळवली.

नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी भारताविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. चीनचा पाठिंबा असल्यानं ओली भारताला अप्रत्यक्षपणे आव्हान देऊ लागले आहेत. आपल्याला पंतप्रधानपदावरून दूर करण्याचे प्रयत्न होत असल्याचे आरोपही त्यांनी भारतावर केले आहेत.

भारताला आव्हान देण्याची, भारताच्या जमिनीवर दावा करण्याची भाषा करणाऱ्या नेपाळी पंतप्रधानांना मिळणारं वेतन भारतातल्या आमदारांपेक्षा कमी आहे. त्यांना मिळणारे भत्ते तर आणखी कमी आहेत.

नेपाळी पंतप्रधानांना मिळणारं वेतन आशियातील कोणत्याही देशाच्या प्रमुखाला मिळणाऱ्या वेतनापेक्षा कमी आहे. नेपाळी पंतप्रधानांना ७७,२८० रुपये इतका पगार मिळतो.

भारताच्या चलनाचं मूल्य अधिक आहे. भारताचे १०० रुपये म्हणजे ६२.४४ नेपाळी रुपये. त्यामुळे ७७,२८० नेपाळी रुपयांचं रुपांतर भारतीय चलनात केल्यास ४८,२५७ रुपये होतात. नेपाळमधील ओएसनेपाळ संकेतस्थळानं ही माहिती दिली आहे.

नेपाळच्या पंतप्रधानांना १० हजार रुपयांचे विविध भत्ते मिळतात. त्यामध्ये ५ हजार रुपयांच्या मोबाईल भत्त्याचा समावेश आहे.

नेपाळी पंतप्रधान राजधानी काठमांडूच्या बाहेर गेल्यास त्यांना प्रतिदिन ३ हजार रुपये भत्ता मिळतो. याशिवाय त्यांच्या सरकारी वाहनासाठी दर महिन्याला ३०६ लीटर पेट्रोल/डिझेल मिळतं.

नेपाळी पंतप्रधानांचा पगार कमी असला, तरी त्यांना ४५ सल्लागार ठेवण्याचा अधिकार असतो. त्यांचा पगार सरकार देतं. यासोबतच नेपाळी पंतप्रधान ३५ कर्मचारी ठेऊ शकतात. त्यात त्यांचा छायाचित्रकार, चालक, लेखापाल अशा व्यक्तींचा समावेश होतो. त्यांचा पगारदेखील सरकार देतं.

नेपाळच्या राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींचं वेतन पंतप्रधानांपेक्षा अधिक असल्याची माहिती नेपाळमधील सर्वात मोठं इंग्रजी वृत्तपत्र असलेल्या 'द हिमालयन टाईम्स'नं दिली आहे. नेपाळी राष्ट्रपतींना जवळपास दीड लाख, तर उपराष्ट्रपतींना जवळपास १ लाख इतकं वेतन मिळतं.

भारताच्या पंतप्रधानांना दरमहा ५० हजार रुपये बेसिक वेतन मिळतं. याशिवाय त्यांना दरमहा ३ हजारांचा भत्ता मिळतो. यासोबतच प्रतिदिन २ हजार रुपयांचा भत्ता मिळतो. या माध्यमातून त्यांना महिन्याला ६२ हजार रुपये मिळतात. लोकसभा मतदारसंघ भत्ता म्हणून आणखी ४५ हजार रुपयेदेखील पंतप्रधानांना मिळतात.