चीनची धमकी! भारताने रक्तरंजित संघर्षासाठी तयार रहावे; हद्द पार केली

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2020 04:38 PM2020-09-08T16:38:17+5:302020-09-08T16:46:39+5:30

India china faceoff: एकीकडे चीनचे सैन्य भारतीय जवानांन उकसविण्याचा प्रयत्न करत आहे, तर दुसरीकडे चीनची सरकारी यंत्रणाही देशासह जगभरात अफवा पसरविण्याचे काम करत आहे.

चीन भारतीय़ हद्दीत घुसखोरी करण्यासाठी हरतऱ्हेने प्रयत्न करत आहे. सोमवारी रात्री चिनी सैनिकांनी अडविल्यानंतर हवेतच फायरिंग केली. एलएसीवर गोळीबार हा चार दशकांनंतर झाला आहे. यातच चीनने आज भारतानेच गोळीबार केल्याचा आरोप करत मोठी धमकी दिली आहे.

चीनचे सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सने भारताने रक्तरंजित संघर्षाला तयार रहावे अशी धमकी दिली आहे. उलट चीनचे लष्करच भारतीय जवानांना उकसविण्याचा प्रयत्न करत आहे.

भारतीय सैन्याने सांगितले की, आमच्या जवानांनी कोणताही गोळीबार केला नाही. चीनच्या सैनिकांनी भारताच्या सीमेवर घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. भारतीय जवानांनी त्यांना रोखले असता चीनच्या सैनिकांनी हवेत गोळीबार केला.

एकीकडे चीनचे सैन्य भारतीय जवानांन उकसविण्याचा प्रयत्न करत आहे, तर दुसरीकडे चीनची सरकारी यंत्रणाही देशासह जगभरात अफवा पसरविण्याचे काम करत आहे. चीनच्या सरकारी वृत्तपत्राने तर भारताला थेट धमकीच दिली आहे.

ग्लोबल टाईम्सने छापलेल्या संपादकीयमध्ये ही धमकी पहिल्याच पानावर देण्यात आली आहे. ''भारतीय सैन्याचा दुस्साहसाने भरलेला डाव उलटा पडणार'', असे शीर्षक देण्यात आले आहे. (Indian border troops’ bravado will backfire)

ग्लोबल टाईम्सने चीनने भारतावर लावलेल्या आरोपांचाही उल्लेख केला आहे. भारतीय सैन्याने सोमवारी पेंगाँग झीलच्या दक्षिणेकडील किनाऱ्यावर शेनपाओ पहाडी भागात एलएसी बेकायदा पार केली. तसेच गस्तीवर असलेल्या चिनी सेनिकांच्या समोर येत फायरिंग केले आहे. यामुळे चिनी सैनिकांना मजबूर होऊन प्रत्यूत्तर द्यावे लागले.

भारताने एकही गोळी झाडणार नाही हा समझोता तोडला आहे. जर असे वागत असेल तर चीन आणि भारताला एलएसीवर रक्तरंजित लढाईच्या नव्या पर्वासाठी तयार रहावे लागेल, असे ग्लोबल टाईम्सने म्हटले आहे.

भारतीयांच्या चीनविरोधी भावनांवर कोणतेही नियंत्रण नाहीय. भारत सीमावादावर आक्रमक होत आहे. भारत दावा करत आहे की, पेंगाँग झीलवरील दोन उंच जागांवर ताबा घेतला असून जवानांच्या रायफलींच्या टप्प्यात आला चीनचे सैनिक आले आहेत, असेही म्हटले आहे.

भारताने हद्द पार केली आहे. तुमच्या सैन्याने लाईन क्रॉस केली आहे. राष्ट्रवादाची भावना बेकाबू झाली आहे. चीनविरोधातील नीती हद्दीपेक्षा पुढे गेली आहे. असे करणे आता डोंगरावरील झुलत्या दगडावर डोक्याच्या बाजुने उभे राहण्यासारखे ठरेल, असा इशारा भारताला दिला पाहिजे असे ग्लोबल टाईम्सने म्हटले आहे.

भारताने दोन जागा बळकावल्याने त्याचा काय फरक पडणार आहे, आधुनिक लष्करी यंत्रणेला याची काही फरक पडेल का? याचा भारताने दोनदा विचार करावा. भारत आणि चीनमध्ये कोणाकडे जास्त शस्त्र आहेत? कोणाचे बजेट जास्त आहे याचा विचार केला पाहिजे असे म्हटले आहे.