India China Face Off: भारताला धडा शिकवायला गेला अन् चीनचा जनरल झाओ दुसऱ्यांदा तोंडघशी पडला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2020 03:43 PM2020-06-23T15:43:43+5:302020-06-23T15:54:44+5:30

आज परराष्ट्र मंत्र्यांच्या चर्चेत चीनने पूर्व लडाखमधून माघार घेण्याचे मान्य केले आहे. भारतीय जवानांवरील हल्ला ते गलवान सीमेवरील घुसखोरी हे सारे चीनचा पश्चिम कमांडचा जनरल झाओ जोंगकी यांचा भारताला धडा शिकविण्याचा डाव होता. मात्र, तो त्यांच्यावरच उलटला. झाओ यांची ही पहिलीच वेळ नाही तर तीनवेळा त्यांनी चीनला तोंडघशी पाडले आहे.

गेल्या आठवड्यात भारत-चीन सीमावादावेळी भारतीय जवानांवर जिवघेणा हल्ला करण्याचे आदेश देणाऱ्या जनरल झाओ जोंगकी याने चीनला प्रत्येक वेळी शरमेने मान खाली घालायला भाग पाडले आहे. चीनवर एवढी तोंडघशी पडण्याची वेळ आणूनही झाओ आजही सुरक्षित आहे, कारण तो चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्या अत्यंत जवळचा आहे.

आज परराष्ट्र मंत्र्यांच्या चर्चेत चीनने पूर्व लडाखमधून माघार घेण्याचे मान्य केले आहे. भारतीय जवानांवरील हल्ला ते गलवान सीमेवरील घुसखोरी हे सारे चीनचा पश्चिम कमांडचा जनरल झाओ जोंगकी यांचा भारताला धडा शिकविण्याचा डाव होता. मात्र, तो त्यांच्यावरच उलटला. झाओ यांची ही पहिलीच वेळ नाही तर तीनवेळा त्यांनी चीनला तोंडघशी पाडले आहे.

जनरल झाओ जोंगकी हा एक महत्वाकांक्षी अधिकारी आहे. तो 2016 पासून नवीनच निर्माण केलेल्या पश्चिमी थिएटर कमांडचे नेतृत्व करतोय. त्याने करिअरमध्ये कोणालाही न जमलेले यश मिळविले आहे. झाओने तब्बल 20 वर्षे तिबेटच्या पठारावर घालवली आहेत. यामुळे त्याला चीनच्या कम्युनिस्ट पार्टीच्या निर्णायक सेंट्रल मिलिट्री कमिशनमध्ये सहभागी करण्यात आले आहे.

1979 मध्ये व्हिएतनाम युद्धावेळी झाओवर भीषण हल्ला झाला होता. मात्र, तो वाचला होता. 2016 मध्ये झाओ भारत दौऱ्यावर आला होता. झाओ हा राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांच्या खूप जवळचा मानला जातो. त्याला चीनच्या लष्करामध्ये अत्यंत क्रूर जनरल म्हटले जाते.

गलवान घाटीमध्ये भारतावर हल्ला करून त्याने चीनी सरकारला कामाचा व्य़क्ती असल्याचे दाखविले. याच कारणातून त्याने 2017मध्ये डोकलाममध्ये जागा हडपण्याचा प्रयत्न केला होता.

महत्वाची बाब म्हणजे सीपीसी आणि शांक्शी प्रांतामध्ये जेव्हा क्रांती झाली होती तेव्हा जिनपिंग आणि झाओ तेथील क्रांतीकारक हिरो होते. यामुळे दोघांमधील मैत्री कशी असेल हे सांगणे उचित नाही. या एका कारणामुळेच ते एकमेकांचे साथीदार आहेत.

झाओ हा आधीपासून वादग्रस्त होता. व्हिएतनाम युद्धावेळी नियोजन करता न आल्याने वाद खूप वाढला होता. 2017 मध्येही डोकलाममधून 72 दिवसांनी चीनी सैनिकांना माघार घ्यावी लागली होती. यानंतर झाओ यांना मोठ्या टीकेचा सामना करावा लागला होता. याच रागातून झाओ यांनी भारत द्वेश सुरु केला होता.

आता गलवान घाटीतही भारतीय जवानांना म्हणजेच भारताला धडा शिकविण्याच्या उद्देशाने भ्याड हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामध्ये भारताचे 20 जवान शहीद झाले तर चीनचेच 40 हून अधिक सैनिक मारले गेले. यामध्ये दोन अधिकारी होते हे देखील चीनने मान्य केले आहे. आज अखेर चीनला माघार घ्यावी लागली आहे. यासही हा झाओच कारणीभूत आहे.

गेल्या आठवड्यात भारतीय जवानांवर चीनने काटेरी लाठ्या, दगड घेऊन हल्ला केला होता. सायंकाळी 4 वाजता सुरु झालेला हा हल्ला रात्रभर सुरु होता. मात्र, भारतीय जवानांनी वेळीच सावध होत चीनचा हा हल्ला परतवून लावताना त्यांचे ४० सैनिक मारले होते. यावर चीनने भारतानेच पहिला हल्ला केल्याचे आरोप लावणे सुरु केले आहे. मात्र, अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेने चीनची पोलखोल केली आहे. चीन लष्कराच्या जनरल रँकच्या अधिकाऱ्यानेच गलवानमध्ये तैनात असलेल्या सैनिकांना भारतीय जवानांवर हल्ला करण्याचे आदेश दिले होते. यामुळे तिथे हिंसक घटना घडली, असा दावा केला आहे.

झाओ हे भारतद्वेष्टे समजले जातात. त्यांनी या आधीही भारताविरोधात अनेकदा कारवाई केली आहे. त्यांचे म्हणणे असे आहे की, अमेरिका आणि त्याच्या मित्र राष्ट्रांसमोर चीन दुबळा पडता नये. याच विचारातून भारतावर हल्ला करण्याची चाल खेळली गेली. मात्र, त्यांना वाटत होते तसे घडलेच नाही. उलट चीनच्या लष्कराचेच मोठे नुकसान झाले आहे.