Mansa Musa: गेट्स, अदानी, अंबानींच्या एकूण संपत्तीपेक्षा जास्त श्रीमंत; पृथ्वीवर एक धनकुबेर होऊन गेला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2021 03:06 PM2021-06-01T15:06:37+5:302021-06-01T15:18:04+5:30

Mansa Musa, world richest man. Half of gold in his Empire: 2012 मध्ये अमेरिकेच्या एका सेलिब्रिटी वेबसाईटने मुसाची संपत्ती 400 अब्ज डॉलर्स म्हणजेच 300 खरब एवढा अंदाज लावला होता. मात्र, इतिहासकारांनुसार मुसाची संपत्ती मोजण्याच्या पलिकडची होती, असे म्हटले आहे.

बिल गेट्स, जेफ बेजोस आणि एलन मस्क हे अब्जाधीश उद्योगपती नेहमी त्यांच्या संपत्तीवरून चर्चेत असतात. आपल्याकडचे अदानी असतील किंवा अंबानी. या साऱ्यांची संपत्ती एकत्र केली तरी देखील आफ्रिकेचा राजा मुसाच्या संपत्तीशी ते बरोबरी करू शकत नाहीत. (Mansa Musa, the 14th Century West African ruler who was richer than anyone could describe.)

होय, आताच्या काळात ते तर्कसंगत नसले तरीदेखील इतिहासकारांच्या मते पृथ्वीवर असा धनकुबेर होऊन गेला आहे, जो आताच्या कुबेरांना खूप भारी पडेल.

कॅलिफोर्निया विश्वविद्यालयाचे इतिहासचे प्राध्यापक रुडोल्फ बुच वेयर यांनी बीबीसीला याची माहिती दिली होती. राजा मुसाच्या संपत्तीचे समकालीन विवरण एवढे धक्कादायक आहे की ते समजणे जवळपास अशक्य आहे. जॅकब डेव्हिडसन यांनी सांगितले की, मुसा पृथ्वीवरील सर्वात श्रीमंत व्यक्ती होता.

2012 मध्ये अमेरिकेच्या एका सेलिब्रिटी वेबसाईटने मुसाची संपत्ती 400 अब्ज डॉलर्स म्हणजेच 300 खरब एवढा अंदाज लावला होता. मात्र, इतिहासकारांनुसार मुसाची संपत्ती मोजण्याच्या पलिकडची होती, असे म्हटले आहे.

14 व्या शतकात पश्चिमी आफ्रिकेचा राजा मनसा मुसाचा जन्म 1280 मध्ये झाला होता. त्याचा भाऊ मनसा अबू बक्रने 1312 पर्यंत साम्राज्य सांभाळले. 14 व्या शतकात सिरियाई इतिहासकार शिबाब अल-उमरीनुसार अबू बक्रला अटलांटिक मगासागर आणि त्याच्या पलिकडे असलेल्या जगाची मोठी उत्सुकता होती.

मनसा अबू-बक्रने कथितपणे 2000 जहाजे आणि हजारो पुरुष आणि स्त्रीया व दासींचा ताफा घेऊन तिकडे जाण्याचा निर्णय घेतला. परंतू तो कधी परतला नाही. यानंतर मनसा मुसाने 1312 मध्ये राजगादी ताब्यात घेतली आणि त्याच्या शासनकाळात माली साम्राज्याचा सुवर्णाक्षरात इतिहास लिहिला गेला.

मुसाने 24 हून अधिक शहरांचा ताबा घेतला. त्याचे साम्राज्य तेव्हा 2000 मैलांपर्यंत पसरले होते. मुसाच्या साम्राज्यात सोने आणि मीठाची कोषागरे होती. ब्रिटिश संग्रहालयानुसार मुसाकडे प्राचीन जगापैकी जवळपास निम्मे सोने होते. याचे मुख्य कारण म्हणजे सोने आणि अन्य साहित्याचा व्यापार करणारी जगातील मुख्य केंद्रे त्याच्याच राज्यात होती.

मुसा अशा ऐनवेळी सत्तेत आला जेव्हा युरोपियन देश गृहयुद्धात ढकलले गेले होते. अन्नधान्य, वस्तूंच्या टंचाईमुळे या देशांमध्ये संघर्ष सुरु होता. यामुळे जगाच्या बाजारपेठेचा केंद्रबिंदू माली साम्राज्याकडे वळला. जगाला मुसाच्या ताकदीचा तेव्हा अंदाज आला जेव्हा त्यांने हजला जाण्याचा निर्णय घेतला होता.

इतिहासकारांच्या दाव्यानुसार मुसा हजला जाण्यासाठी 60000 लोकांना सोबत घेऊन निघाला होता. यामध्ये 12000 गुलाम होते. वाटेत सहारा वाळवंट आणि मिस्त्र देश आला. तीन महिने कैरोमध्ये राहिल्यानंतर मुसाने या क्षेत्रात एवढे सोने वाटले की, मिस्त्रमधील सोन्याचा दर धडामकण कोसळला होता. यामुळे त्या क्षेत्रातली अर्थव्यवस्था पुढील 10 वर्षे सावरू शकली नव्हती.

मुसा अनेक इस्लामिक स्कॉलरना घेऊन मक्केहुन परतला होता. यामध्ये अबू अस हक देखील होते. त्यांनीच Djinguereber मशीदीची रचना केली. मुसाने या कवीला 200 किलो सोने दिले होते. आज त्याची किंमत 8 दशलक्ष डॉलर होते.

जगातील अशा या गोल्डन किंगचा मृत्यू 57 वर्षांचा असताना 1337 मध्ये झाला. त्याच्या मुलाने साम्राज्य हाती घेतले मात्र, त्यानंतर हे साम्राज्य कोसळले. युरोपियन राजवटीने एवढा मोठा डोलारा नेस्तनाभूत केला. आता माली जगातील सर्वात गरीब देशांमध्ये गणला जातो.