गँगरेपने पाकिस्तान हादरलं; पंतप्रधान इम्रान खाननं थेट बॉलिवूडलाच जबाबदार धरलं

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2020 01:34 PM2020-09-16T13:34:00+5:302020-09-16T13:38:39+5:30

भारताची राजधानी दिल्ली ही जगात बलात्कारांची राजधानी बनली आहे असं पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी मंगळवारी म्हटलं आहे. यासाठी इम्रान खानने बॉलिवूड चित्रपटात दाखवल्या जाणाऱ्या अश्लीलतेला जबाबदार धरले. पाकिस्तानला बॉलिवूडच्या दुष्परिणामांपासून वाचवण्यासाठी आपल्या देशात इस्लामिक मालिका दाखवत असल्याचे इम्रान खान यांनी म्हटलं आहे.

पाकिस्तानच्या कराची शहरात झालेल्या सामूहिक बलात्कारामुळे लोक हादरले आहेत, त्यांनी सरकारविरोधात रस्त्यावर उतरुन आंदोलन केले आहे. सोमवारी एका खासगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी महिलांवरील वाढती गुन्हेगारी आणि त्यांच्या सुरक्षेसंदर्भातील मुद्द्यांविषयी भाष्य केले

इम्रान खान म्हणाले, जगाचा इतिहास दर्शवितो की जेव्हा समाजात अश्लिलता वाढते तेव्हा दोन गोष्टी घडतात - एक म्हणजे लैंगिक गुन्हे वाढतात आणि कौटुंबिक व्यवस्था बिघडू लागते. असे गुन्हे थांबविण्याची जबाबदारी केवळ कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांवरच नव्हे तर समाजावरही आहे.

पाश्चात्य देशांशी पाकिस्तानच्या कौटुंबिक व्यवस्थेची तुलना करतांना इम्रान खान म्हणाले, आमची कौटुंबिक व्यवस्था मजबूत आहे आणि आम्ही न्यायालयीन व्यवस्था सुधारू शकतो परंतु जर आमची कुटुंब व्यवस्था स्वतःच कोसळली तर आम्ही पुन्हा उभं राहू शकणार नाही.

इम्रान खान यांनी भारताचा उल्लेख केला आणि सांगितले की, बॉलिवूड चित्रपटांमध्ये दाखवल्या जाणाऱ्या अश्लीलतेमुळे नवी दिल्लीमध्ये लैंगिक गुन्हे वाढले आहेत. ४० वर्षांपूर्वी बॉलिवूडमध्ये ज्या पद्धतीचे चित्रपट बनवले जात होते ते आता बनत नाहीत. याचा वाईट परिणाम भारतीय समाजावर होत आहे. दिल्ली ही जगातील बलात्कारांची राजधानी बनली आहे असा खोटा दावा त्यांनी केला.

पाकिस्तानमध्ये बॉलिवूडचा प्रभाव कमी करण्यासाठी त्यांनी तुर्कीची ब्लॉकबस्टर मालिका एर्तरुल प्रसारित केली. आम्ही भारतातील विध्वंस पाहिला आहे. आमच्या देशात असा विनाश नको. जेव्हा पाकिस्तानच्या अधिकृत टीव्ही वाहिन्यांवरून मी एर्तरुल प्रसारित केले तेव्हा लोक म्हणाले की, पाकिस्तानात फक्त बॉलिवूड पाहतात. परंतु माझा विश्वास होता की आम्ही अशा गोष्टी पाकिस्तानी लोकांना दाखवल्या पाहिजेत ज्यात इस्लामिक मूल्ये, इस्लामिक इतिहास जे कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र बसून ते पाहू शकतात.

लोक आपल्या संस्कृतीशी जवळीक साधून त्याची नैतिक मूल्ये शिकू शकतील अशी आमची इच्छा आहे. जर समाजात अश्लीलता वाढत गेली तर गुन्हेगारीत वाढ होते आणि आपल्याला हे समजून घेण्याची गरज आहे असंही इम्रान खान म्हणाले.

भविष्यात पुन्हा अशा प्रकारच्या गुन्ह्यांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून फर्स्ट डिग्री आणि सेंकेंड डिग्री अशी विभागणी केली पाहिजे. रेपिस्टचं केमिकल कैस्ट्रेशन व्हायला हवं, बर्‍याच देशात असे घडते गंभीर लैंगिक गुन्हेगारांना भर चौकात फाशी देण्यात येते.

यानंतर इम्रान खान म्हणाले की, बलात्कार करणार्‍यांना जाहीरपणे फाशी देणे आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्य नाही आणि असे केल्याने युरोपियन युनियनकडून पाकिस्तानला देण्यात आलेला विशेष दर्जा काढून घेतला जाऊ शकतो.

मोटारवे बलात्कार प्रकरणाने संपूर्ण देश हादरला आहे कारण लोकांना असे वाटते की त्यांच्या पत्नी आणि मुलींसोबतही असं होऊ शकतं. एखादा व्यक्ती लैंगिक छळाच्या अनेक प्रकरणांमध्ये आरोपी असेल तर त्याचा रेकॉर्ड वेगळा ठेवावा असं इम्रान खान म्हणाले.