France Fuel Protest: इंधन दरवाढीमुळे फ्रान्समध्ये हिंसक आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2018 01:03 PM2018-12-03T13:03:14+5:302018-12-03T15:54:32+5:30

फ्रान्समध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून पेट्रोल-डिझेलवरील करवाढीच्या निषेधार्थ सरकारविरोधी हिंसक आंदोलन चांगलेच चिघळले आहे. (Image Credit : Twitter)

जाळपोळ आणि तोडफोडीच्या घटनांमुळे फ्रान्समध्ये भयानक अशांतता पसरली असून, दंगल उसळू नये, म्हणून सरकारचा आणीबाणी लागू करण्याचा विचार आहे.

फ्रान्समधील आतापर्यंतच्या हिंसाचारात सुरक्षा दलाच्या 23 जणांसह 133 जण जखमी झाले असून, 412 जणांना अटक करण्यात आली आहे.

पेट्रोल-डिझेल महाग असताना, त्यावरील कर वाढविण्यात आल्याच्या विरोधात मोठ्या संख्येने लोक पिवळा अंगरखा, जाकीट घालून रस्त्यावर उतरल्याने, पोलीस आणि निदर्शकांत चकमकी झाल्या.

संतप्त आंदोलकांनी 190 ठिकाणी आगी लावल्या. रस्त्यावर उभी असलेली अनेक वाहने पेटवून दिली, शिवाय 5 इमारतींनाही आग लावली.

फ्रान्समध्ये निदर्शकांना पांगविण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुरासोबत पाण्याचा मारा केला.

रविवारी सकाळीही निदर्शकांनी दक्षिण फ्रान्सस्थित नरबॉनजीकचा एक टोलनाका पेटवून दिला, तसेच पूर्व फ्रान्समधील लिऑननजीक उत्तर-दक्षिण प्रमुख मार्गावर रस्तारोको केला.

फ्रान्समध्ये डिझेलच्या किमती गेल्या वर्षभरात 23 टक्के वाढल्या आहेत. तिथे 1.51 युरो (120 रुपये) प्रति लीटर एवढा डिझेलचा भाव आहे. सरकारने त्यावर आणखी कर वाढविला आहे आणि 1 जानेवारीपासून त्यावर आणखी कर लावला जाणार आहे.