तालिबानी राज्यात काबूल विद्यापीठातील पहिला क्लास; तरुणींना बुरख्यात बोलावून दिली शरिया कायद्याची शपथ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2021 11:27 PM2021-09-11T23:27:08+5:302021-09-11T23:36:30+5:30

या कार्यक्रमावेळी सर्व मुलींचा (विद्यार्थिनींचा) चेहरा बुरख्याने झाकलेला होते. यावेळी त्यांना शरिया कायद्याचे पालन करण्याची शपथही देण्यात आली.

तालिबान शरिया कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी किती आतूर आहे, हे शनिवारी काबूल विद्यापीठात दिसून आले. तालिबानी नेत्यांनी येथे शरिया विषयावर व्याख्यानाचे आयोजन केले होते. विद्यापीठात शिकणाऱ्या 300 मुली या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. (First class at Kabul University in Taliban state and give sworn of Sharia law to girls )

महत्वाचे म्हणजे या कार्यक्रमावेळी सर्व मुलींचा (विद्यार्थिनींचा) चेहरा बुरख्याने झाकलेला होते. यावेळी त्यांना शरिया कायद्याचे पालन करण्याची शपथही देण्यात आली. या कार्यक्रमादरम्यान, प्रत्येक मुलीच्या हातात तालिबानचा झेंडा होता.

तालिबानने त्यांच्या राजवटीत, महिलांसाठी हा ड्रेस कोड जारी केला आहे. यापूर्वी, महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये क्लास दरम्यानही मुले आणि मुलींना स्वतंत्रपणे बसण्याचे फर्मान जारी करण्यात आले आहे.

तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केल्यापासून महिला आणि मुले सर्वाधिक त्रस्त आहेत. विशेषतः काम करणाऱ्या आणि शिकणाऱ्या महिला बंदूकीच्या धाकात जगत आहेत.

आपल्या हक्क आणि अधिकारांसाठी काही दिवसांपासून महिला सातत्याने निदर्शने करत आहेत. नुकत्याच एका निदर्शनादरम्यान तालिबान्यांनी गोळीबारही केला होता आणि मारहाणही केली होती. एवढेच नाही, तर अनेक महिलांच्या तोंडावर बंदुकीनेच वार केले होते.

तालिबानच्या हायर एज्युकेशन मिनिस्ट्रीने एक आदेश जारी केला आहे. यात महाविद्यालयांत मुले आणि मुलींचे वर्ग वेगळे असावेत, तसेच हे शक्य नसेल तर दोघांमध्ये पडदे असावेत, असे म्हणण्यात आले आहे. तालिबानच्या या आदेशानंतर अफगाणिस्तानातील एका महाविद्यालयाचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

यापूर्वी, तालिबानच्या कार्यकाळात महिलांच्या शिक्षणावर आणि नोकरी करण्यावर निर्बंध घालण्यात आले होते. मात्र, आता मुलींना शिक्षण घेण्यास शाळा कॉलेजांमध्ये जाऊ दिले जात आहे, हा एक सकारात्मक बदल असल्याचे एका शिक्षकाने म्हटले आहे.

१९९६ ते २००१ या काळात तालिबानचा अफगाणिस्तावर कब्जा होता. त्यावेळी महिलांचे अधिकार आणि स्वातंत्र्य हिरावून घेण्यात आले होते. यामुळेच, आताही महिलांमध्ये भीतीचे वातावरण आहे. परंतु आता तालिबानने आपण महिलांच्या अधिकारांचे संरक्षण करणार असल्याचे म्हटले आहे. मात्र, असे असले, तरीही काही महिला आपल्या हक्कासाठी संघर्ष करताना दिसत आहेत.